शेतकर्‍याचा मुलगा ते इस्रोचे अध्यक्ष!

    दिनांक :12-Sep-2019
नितीश गाडगे
भारताची चांद्रयान-2 मोहीम 95 टक्के यशस्वी पार पडली असताना, चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लॅण्डर केवळ 2.1 किलोमीटर दूर असताना इस्रोचा त्याच्याशी संपर्क तुटला. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इस्रो स्पेस सेंटरला भेट देत शास्त्रज्ञांना धीर दिला व त्यांचे मनोबल वाढविले. असे असले तरी विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटणे, हे शास्त्रज्ञांसाठी धक्कादायक होते. दरम्यान, इस्रोचे अध्यक्ष के. सिवन हे अत्यंत भावुक झाल्याचे आपण पहिले. पंतप्रधान मोदींनी त्यांची पाठ थोपटून त्यांना धीर दिला. चांद्रयान-2 मोहिमेच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून के. सिवन यांचे नाव माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात झळकत आहे. अत्यंत साधारण राहणीमान असलेले कैलासवादिवो सिवन यांचा इस्रोच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास अत्यंत खरतड आणि प्रेरणादायी राहिलेला आहे. जाणून घेऊ या त्यांच्या या संघर्षाबद्दल... 
 
 
तामिळनाडूमधील कन्याकुमारीजवळच्या सराकल्लविलाई गावात 14 एप्रिल 1957 ला एका गरीब शेतकर्‍याच्या घरात के. सिवन यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथील स्थानिक सरकारी शाळेत तमीळ माध्यमातून झाले. सिवन अभ्यासात हुशार होते, पण घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना बाजारात आंबे विकून शाळेची फी भरावी लागायची.
 
 
मुलगा अभ्यासात हुशार असल्याने, वडिलांनी त्यांच्या इतर मुलांचे शिक्षण थांबवून सिवन यांना पुढे शिकविण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना प्रोत्साहितही केले. त्यानंतर त्यांनी नागेरकोयल येथील एस. टी. िंहदू विद्यालयातून बी. एस्सी. केले. आज आपल्यापैकी बरेच जण सोई-सुविधांच्या अभावाने शिक्षण िंकवा आपले ध्येय अर्धवट सोडतात; पण सिवन यांनी आपल्या आयुष्यात कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदाच चप्पल खरेदी केली. सिवन, त्यांच्या परिवारात स्नातक होणारे पहिले होते! अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मधून बी. टेक. केले व नंतर आयआयटी बॉम्बेमधून एअरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएच. डी. केली. सन 1982 मध्ये सिवन यांनी भारतीय अवकाश संशोधनात काम करणे सुरू केले. पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (पीएसएलव्ही) निर्माण करण्यात त्यांचे योगदान आहे. एप्रिल 2011 मध्ये ते जीएसएलव्ही परियोजनेचे निर्देशक होते. सिवन यांचे योगदान पाहून त्यांची, जुलै 2014 मध्ये इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. इस्रोमध्ये ‘रॉकेट मॅन’ नावाने ओळखले जाणारे सिवन हे सध्या इस्रोच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. घरची परिस्थिती गरिबीची आणि बेताची असतानासुद्धा सिवन यांनी केलेल्या पुरुषार्थामुळे आज इस्रोला इतका मोठा शास्त्रज्ञ मिळाला!