भामरागड सातव्यादा 'नॉट रीचेबल'

    दिनांक :12-Sep-2019
अहेरी,
तब्बल चार दिवस महापूराचा सामना केलेल्या भामरागडचे संकट संपता संपत नसून आज १२ सप्टेंबर रोजी सकाळपासून पुन्हा भामरागडचा संपर्क तुटला आहे. यावर्षी भामरागडचा मार्ग बंद होण्याची ही सातवी वेळ आहे. काल रात्रीपासून पाऊस आला. तसेच आताही पाऊस सुरूच असल्यामुळे आणखी पूर वाढण्याची शक्यता आहे.
 

 
 
भामरागडमध्ये प्रशासन तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. स्वच्छता अभियान राबवून साचलेला गाळ, काडीकचरा काढण्याचे काम सुरू आहे. मात्र पुन्हा मार्ग बंद झाल्याने या कार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. पर्लकोटा नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे वारंवार पुरपरिस्थिती उद्भवत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.
पावसाने भामरागड तालुक्यात नवा विक्रम स्थापीत केला आहे. आतापर्यंत भामरागड तालुक्यात २४८६.७ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याची पावसाची टक्केवारी १९०.७५ टक्के इतकी आहे. तालुक्याचे अपेक्षीत पावसाळी पर्जन्यमान ११६३.८ मी.मी असून अपेक्षीत पर्जन्यमानाच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे.