पेयजल योजनेच्या खाजगीकरना वरून संतप्त नागरिकांचा पालिकेवर मोर्चा

    दिनांक :13-Sep-2019
पेयजल योजनेच्या खाजगीकरना वरून संतप्त नागरिकांचा पालिकेवर मोर्चा.
 
सिंदी, मागील १५ दिवसांपासून घुमसत असलेला पेयजल योजनेचा विरोध दिनांक १२ सप्टेंबरला उफाळून आला. शहरातील स्त्री-पुरुष नागरिकांनी पालिकेचा हा डाव हाणून पाडण्यासाठी स्वयंमपूर्तीने भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चेकरांनी सलग पाच तास नगर पालिका प्रशासनाला वेठीस धरले होते. सायंकाळी ५.०० वा. खजगिकरणाचा ठराव रद्द करण्यात आला. अशी घोषणा नगराध्यक्षा व मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी जाहीर केला. या निर्णयाचे जनतेने प्रचंड स्वागत केले.
 
 
 
गुरुवारी सकाळी शहरातील प्रत्येक वार्डातील हजारोच्या संख्येने स्थानिक गांधी चौकात गोळा झाले होते. तेथून संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून पालिका कार्यालयावर धडकले. याआधी मोर्चेकरातील शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात जाऊन निवेदनाद्वारे मोर्चाची परवानगी मागितली. नुकत्याच नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनूणे यांनी आल्याआल्या नगर पालिका कार्यालयात पोचताच मोर्चेकरांना बाहेरच अडविले. त्यावेळी सोनूणे यांनी आपल्या खाकी वर्दीचा रुबाब दाखवत आमजनतेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त नागरिकांनी ज्यात महिलांची संख्या सर्वाधिक होती. त्यांनी "वंदनाताईची" चांगलीच जिरवली. काही महिलांनी पोलिसांचा गराडा तोडून नगर पालिका कार्यालयात प्रवेश केला. संतप्त महिलांनी थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा संगीता शेंडे यांच्या दालनात प्रवेश करून त्यांची चांगलीच भत्सना केली. पोलिसांचा सुद्धा यावेळी नाईलाज झाला. संतप्त मोर्चेकरी महिलांनी नगराध्यक्षा यांनी दालनातून बाहेर येऊन आमचे निवेदन स्वीकारून पाणी पुरवठा खाजगीकरणाचा घेतलेला ठराव रद्द करावा अशी मागणी केली. त्यावेळी दालनात बसून असलेल्या नगराध्यक्षा शेंडे यांनी पोलीस सौरक्षणात जनतेसमोर आल्या. व मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले. यावर नगराध्यक्षा यांनी म्हटले की, मी तुमच्या निवेदनावर आज होणाऱ्या बैठकीत विचार करीन. परंतु मोर्चेकरांनी बैठक संपेपर्यंत आम्ही येथेच बसून वाट पाहतो असे म्हणून ठिय्या आंदोलन केले.