आरमोरी तहसील कार्यालयाची पुरपीडितांना मदत

    दिनांक :13-Sep-2019
आरमोरी, 
येथील तहसील कार्यालयच्या वतीने अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या आपदग्रस्तांना धनादेशाचे वितरण नुकतेच आरमोरी तहसील कार्यालयाच्या सभागृहात वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, तर उदघाटक म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाभाऊ गजबे,प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, स्वच्छता व आरोग्य सभापती भारत बावनथडे,आरमोरी तहसील चे नायब तहसीलदार वाय.टी. चापळे,भाजपा तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
 
 
 
यावेळी आमदार कृष्णाभाऊ गजबे यांच्या हस्ते देशपूर येथील कौशल्या लोमेश उंदीरवाडे यांचे पती पुरामध्ये वाहून गेल्याने जीवितहानी झाल्याबद्दल त्यांना ४ लक्ष रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. तसेच किटाळी येथील सुकरू लक्ष्मण मानकर यांचा बैल व गाय यांची जीवितहानी झाल्याबद्दल त्यांना ३५ हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. आरमोरी तालुक्यात अंशतः प्रमाणत एकूण ७४८ घरांची पडझड झाली आहे.तर पूर्णतः पडझड झालेले एकूण ७ घरे आढळून आले आहेत. तालुक्यातील जनावरांच्या ५० गोठयांचे नुकसान झाली आहे. त्याबद्दल आरमोरी येथील तालुक्यातील ५१ कुटुंबांना धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले.
यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जवळपास ७५० घरांची पडझड झाल्याबद्दल येता एका महिन्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे आरमोरी तालुक्यात घरे पडलेल्यांची पंचनामे तलाठी व ग्रामसेवक यांच्या हस्ते युद्धपातळीवर सुरू असून सर्वांना शासन स्तरावर मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या कुटुंबियांना ५१ कुटुंबीयांना आमदार कृष्णा गजबे, आरमोरी तहसिलदार कल्याणकुमार डहाट व मान्यवरांच्या यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून गौरीशंकर ढेंगे यांनी केले आहे. यावेळी आरमोरी तालुक्यातील तलाठी,मंडळ अधिकारी व अतिवृष्टीमुळे आपदाग्रस्त झालेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.