भाजपाचा झेंडा लावाल तर घरात घुसून मारू; काँग्रेस आमदाराची धमकी

    दिनांक :13-Sep-2019
नागपूर,
सिलवाडा गावातील लोकांनी त्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावला तर त्यांना घरात घुसून मारू, अशी धमकी काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी दिली आहे. केदार यांचा हा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी केदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

 
सिलवाडा गावात एका छोटेखानी सभेला संबोधित करताना आमदार सुनील केदार यांनी ही धमकी दिली. सिलवाडा गावातील लोकांनी जास्त मस्ती करू नये. त्यांनी प्रेमाने रहावे. जास्त मस्ती केली आणि घराबाहेर भाजपाचा झेंडा लावला तर त्यांना घरात घुसून मारू. भरदिवसा त्यांना चांद-तारे दाखवू. मात्र प्रेमाने राहिल्यास दूध मागितले तर खीरही देऊ, असे केदार या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा माझा शेवटचा इशारा आहे, अशी धमकीही त्यांनी गावकऱ्यांना दिली आहे.
 
 
दरम्यान, केदार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी केदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.