पूर्णा नदीपात्रात चार बुडाले

    दिनांक :13-Sep-2019
वाठोडा शुकलेश्वर व गौरखेडा येथील घटना
 
अमरावती,
गणरायाच्या विसर्जनासाठी पूर्णा नदीपात्रात उतरलेले चार भक्त बुडल्याची घटना गुरुवारी रात्री वाठोडा शुकलेश्वर व गौरखेडा येथे उघडकीस आली. रात्री उशिरापर्यंत चौघांचाही शोध लागला नव्हता.
सतीश सोळंके, ऋषिकेश वानखडे, संतोष वानखडे, सागर शेंदूरकर अशी बुडालेले चारही व्यक्तींची नावे आहे. हे चौघेही गौरखेडा येथील रहिवासी आहे. गावातल्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी हे चौघे वाठोडा शुकलेश्वर येथून वाहणाऱ्या पूर्णा नदीवर गेले होते. पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे सध्या उघडे असल्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. विसर्जनाच्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाहिले एक तरुण बुडाला त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचा सहकारी पात्रात उतरला लगेच तोपण बुडाला याच पद्धतीने आणखी दोघे असे एकूण चौघे नदीत पात्रात बुडाले. घटना इतरांच्या लक्षात येताच धावपळ सुरू झाली. पोलिस व महसूल प्रशासनाला माहिती देण्यात आली. शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी चौघांचाही शोध घेतला पण, अंधार असल्याने यश मिळाले नाही. शुक्रवारी सकाळी शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.