पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला भक्तांकडून भावपूर्ण निरोप

    दिनांक :13-Sep-2019
ढोल ताशाच्या तालावर थिरकली तरुणाई
गुलालाऐवजी उधळली पुष्प
 
वाशीम, 
१० दिवसांपासून पासून मुक्कामी असलेल्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असे आमंत्रण देऊन ढोल ताशाच्या निनादात गुलाबपुष्प उधळीत सार्वजनिक गणेश मंडळाकडून आपल्या लाडक्या बाप्पाला 13 सप्टेंबर रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष... ढोलताशाचा गजर... गुलाल व फुलाची प्रचंड उधळण करीत अन ढोल ताशांच्या गगनभेदी तालावर थिरकत भावपूर्ण वातावरणात शहरात विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.
गणेश विसर्जन मिरवणूकीतील मंडळानी सकाळपासूनच आपल्या मंडळाच्या गणेशला सजविलेल्या ट्रक व ट्रॅक्टरमध्ये विराजमान करून श्री विसर्जन मिरवणूकीतील रांगेत उभे केले. सकाळी 8 वाजता स्थानिक शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचा गणपती जय शिवशंकर या मंडळाच्या गणपतीची पूजा, अर्चा माजी आमदार भीमराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, पोलिस अधिकारी पवन बनसोड, माधवराव अंभोरे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, वसंतराव धाडवे, धनंजय हेंद्रे, राहुल तुपसांडे, आदीसह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.