शोध अमरनाथ गुहेचा

    दिनांक :14-Sep-2019
आपल्याकडे अमरनाथ यात्रेला मोठं महत्त्व आहे. बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भक्तमंडळी उत्सुक असतात. अमरनाथाच्या पवित्र गुहेत शंकराने पार्वतीला अमरकथा सांगितली होती, असे मानले जाते. अमरनाथची ही यात्रा कशी लोकप्रिय झाली? या गुहेचा शोध नेमका कोणी लावला, याविषयीची ही रंजक माहिती... अमरनाथ गुहेचा शोध सोळाव्या शतकात एका मुस्लीम मेंढपाळाने लावला, असं जाणकारांचं म्हणणं आहे. यानंतर या स्थानी भक्तमंडळींचा वावर सुरू झाला. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की, हा मेंढपाळ मेंढ्यांना चरायला घेऊन गेला होता. मेंढ्या चारता चारता तो खूप दूर, निर्जन स्थळी पोहोचला. 
 
 
 
या ठिकाणी त्याची भेट एका साधूसोबत झाली. या साधूने त्याला कोळशाने भरलेली टोपली दिली. ही टोपली घेऊन मेंढपाळ घरी आला. त्याने टोपली उघडली. या टोपलीतल्या कोळश्यांचं रूपांतर सोन्यात झालं होतं. मेंढपाळाला भरपूर सोनं मिळालं. या घटनेचं त्याला खूपच आश्चर्य वाटलं. गरीब मेंढपाळ हरखून गेला. त्याने दुसर्‍या दिवशी साधूला भेटायचं ठरवलं. तो त्याच ठिकाणी साधूला भेटायला गेला. पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. तिथे त्याला एक भव्य गुहा दिसली. हीच अमरनाथाची पवित्र गुहा असं मानलं जातं. त्यानंतर या गुहेला तीर्थस्थानाचा दर्जा मिळाला. बाबा अमरनाथाची गुहा म्हणून लोकप्रियता मिळाली. त्यामुळे बाबा अमरनाथला भक्तांनी दिलेल्या दानातला काही हिस्सा या मुस्लीम मेंढपाळाच्या वंशजांना दिला जातो. हिंदुधर्मीयांच्या अत्यंत पवित्र अशा या स्थानाचा शोध एका मुस्लीम मेंढपाळाने लावला आहे, हे ऐकून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल.