असे असावे घराचे कोपरे

    दिनांक :14-Sep-2019
वास्तूशास्त्रानुसार घरातल्या दिशांचं, आणि प्रत्येक कोपर्‍याचं वेगळं महत्त्व असतं. घराच्या प्रत्येक कोपर्‍याची रचना वास्तूशास्त्रानुसार करण्यात आली तर घरात समृद्धी आणि समाधान नांदतं. फक्त एवढंच नाही तर कुटुंबातल्या सदस्यांना मानसिक शांतता लाभते. म्हणूनच घरातल्या प्रत्येक कोपर्‍याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याविषयी... 

 
 • घराचा उत्तर-पश्चिम कोपरा समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतिक असतो. घराचा हा कोपरा कधीही अंधारात असू नये. हा कोपरा अंधारात असेल तर घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो.
 • घराच्या दक्षिण दिशेचा अधिपती म्हणजे साक्षात यमराज. घराच्या या कोपर्‍यात दार किंवा तिजोरी, कपाट असू नये. या कोपर्‍यात दार किंवा कपाट असेल तर घरातल्या सदस्यांमध्ये कटूता निर्माण होऊ शकते. तसंच अपमृत्यूचं भय असतं.
 • ज्येष्ठ कुटुंबप्रमुखाची खोली घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला असू नये. या दिशेला खोली असेल तर घरात नकारात्मकता नांदते. विभक्त कुटुंबातल्या कुटुंबप्रमुखाची खोलीही या दिशेला असू नये.
 • घराच्या उत्तर-पूर्व कोपर्‍यात स्वयंपाकघर असू नये. यामुळे घराचं आर्थिक नियोजन कोलमडून आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
 • आंघोळीनंतर बाथरूम घाण ठेऊ नये. साचलेलं पाणी काढून टाकावं. सुगंध फवारावा. ओले कपडे वाळत घालावे.
 • पाणी वाया घालवणं हा खूप मोठा वास्तूदोष मानला जातो. गरजेइतकं पाणी वापरा. घरातले गळके नळ दुरूस्त करून घ्या.
 • सूर्योदयापूर्वी उठायला हवं. सूर्याची किरणं अंगावर घ्यायला हवी. सूर्योदय म्हणजे नवी सुरूवात. त्यामुळे दिवसाची सुरूवातही आनंदाने करायला हवी.
 • सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये. या वेळी दोन प्रहर एकत्र येत असतात. सूर्यास्तानंतर संपूर्ण अंधार झाल्यावरच झोपता येईल.
 • घराचं स्वयंपाकघर स्वच्छ असायला हवं. स्वयंपाक झाल्यानंतर ओटा नीट धुवून ठेवा. कचर्‍याचा डबाही स्वच्छ करा.
 • घराच्या उत्तर दिशेची भिंती निळ्या रंगाने रंगवून घ्या. या ठिकाणी निळ्या रंगाच्या काही वस्तू ठेवता येतील. या ठिकाणी लाल किंवा इतर कोणते गडद रंगा लावू नका. यामुळे घरात नकारत्मकता निर्माण होवू शकते.
 • घराचं प्रवेशद्वार नीटनेटकं आणि स्वच्छ असायला हवं. घराचं प्रवेशद्वार उत्तर, पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावं. दक्षिण -पश्चिमेला असलेल्या प्रवेशद्वारामुळे घरात नकारात्मक प्रभाव निर्माण होतो.
 • स्वयंपाकघराला लाल, केशरी किंवा गुलाबी रंग द्यावा.
 • घराच्या पश्चिम कोपर्‍याला पांढरा किंवा पिवळा रंग द्यावा. या कोपर्‍यात पैसा ठेवता येईल. घराच्या दक्षिण-पश्चिम कोपर्‍यात अभ्यासिका किंवा वाचनालय असावं.