लालाजींचे जीवन म्हणजे रामाच्या जीवनातील आदर्शांची अभिव्यक्तीच - प्रा. रवींद्र भुसारी

    दिनांक :14-Sep-2019
चिखली,
स्व. भगवानदासजी गुप्त उपाख्य लालाजी यांचे जीवन म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवनातील आदर्शांची अभिव्यक्ती आहे. असे भावपूर्ण गौरवोद्गार रा. स्व. संघाचे भूतपूर्व क्षेत्र प्रचारक प्रा. रवींद्र भुसारी यांनी काढले. ते स्व. भगवानदासजी गुप्त उपाख्य लालाजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दि.१४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री रामायण भावकथेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
 
 
स्व. भगवानदासजी गुप्त उपाख्य लालाजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदर्भभूषण, गोरक्षक, रामायणाचार्य ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांच्या अमृतवाणीतून त्रिदिवसीय भव्य श्रीरामायण भावकथेचे तसेच गाथा भजन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज संपन्न झाले. याप्रसंगी श्री. ष. ब्र. १०८, वेदांताचार्य, शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, प. पू. परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरि चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज हे उपस्थित होते.