तिवस्याचे रुग्णालय ‘व्हायरल फिव्हर’ने हाऊसफुल

    दिनांक :14-Sep-2019
एका बेडवर दोन रुग्ण
अनेक रुग्णांवर खाली उपचार
अखेर नवनिर्मित ट्रामा केअरचे लोकार्पण
तिवसा,
‘व्हायरल फिवर’मुळे तिवसा तालुक्यात अनेक आजारांची लागण सुरू झाली. त्यामुळे तिवसा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी मेगाभरती सुरू झाली असून रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण झोपून तर बेडच्या खालीही रुग्ण ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ ग्रामीण रुग्णालयाच्या यंत्रणेवर आली आहे.
 
तिवसा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असून एका डॉक्टरवर रुग्णालयाचे काम चालू आहे. परिणामी रुग्णांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांतुन नवीन रुग्णालयाची इमारत तयार झाली. मात्र, आरोग्य खात्याच्या मत्र्यांकडून लोकार्पणासाठी तारीख मिळत नसल्याने अखेर रुग्णांची उपचारवाचून गैरसोय होऊ नये,याकरिता शनिवार 14 सप्टेंबर रोजी पायल निंभोरकर,ज्योती ठाकरे, गोदाबाई दहिवाडे, संगीता भलावी, आशिष दिवाकर निळे या 5 रुग्णांच्या हस्ते साधेपणाने नवीन रुग्णालय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
 
 

 
अलीकडच्या 15 दिवसापासून तिवसा ग्रामीण रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला अश्या अनेक आजारांनी ग्रासलेले रुग्ण येत आहे. मात्र रुग्णालयात केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने दिवसभर तेच रुग्णांवर उपचार करीत रुग्णालयाचा कारभार सांभाळत आहे. यातच अनेक रुग्णांना उपचारार्थ दाखल करावयाचे झाल्यास येथील बेड क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याने एका बेडवर दोघे तर काहींना थेट खाली फरशीवर गादी टाकून उपचार करण्याची वेळ वाढत्या रुग्णासंख्येमुळे आली आहे. दररोज 40 ते 50 रुग्ण भरती करावे लागत असून बाह्य रुग्णालयात दररोज 200 रुग्णांवर उपचार करावे लागत असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन मालसुरे यांनी दिली.
 
रुग्णालयात भरती करण्यासाठी रुग्णांकरिता जागा उपलब्ध नसल्याने प्रकृती जास्त असलेल्या रुग्णांना जागेअभावी घरी जाण्याची वेळ येत आहे. तालुक्यात अतिसाराची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात रुग्णासाठी बेड अत्यंत कमी असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये,याकरिता कुठल्याही मंत्र्यांच्या तारखेची व लोकार्पण कार्यक्रमाची प्रतीक्षा न करता नगराध्यक्ष वैभव वानखडे,युवक काँग्रेस व संभाजी बिग्रेड कार्यकर्ते व नागरिक यांच्या उपस्थितीत साधेपणाने रुग्णाच्या हस्ते फीत कापून या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकही उपस्थित होते. 15 सप्टेंबरपासून रुग्णांची उपचारासाठी गैरसोय होणार नाही, असे सांगण्यात आले आहे.