चांद्रयान-2 अपयशातून यशाकडे...

    दिनांक :15-Sep-2019
चांद्रयानातील विक्रम लॅण्डर सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरण्यात अयशस्वी ठरले. पृष्ठभागापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर हे लॅण्डर विक्रम पोहोचले असतानाच त्याच्याशी संपर्क तुटला. या घटनेमुळे भारतीय अवकाश संशोधनातील संशोधकांबरोबरच कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांच्या मनात क्षणभर अपयशाची भावना निर्माण झाली. ती तशी निर्माण होणे साहजिकच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तिथे हजर होते. त्यांनाही क्षणभर निराशा लपवता आली नाही. सुदैवाने लवकरच सर्व जण सावरले. भावनांचा बहर ओसरल्यावर ज्या वेळी त्याच्यावर विचार सुरू झाले, त्या वेळी सर्वांना हे अपयश नसल्याची जाणीव झाली. खुद्द पंतप्रधानांनी सर्व संशोधकांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना धीर दिला. अपयशातून यशाकडे जाण्याचा हाच एक मार्ग असतो, याची सर्वांना प्रचीती आली. चांद्रयान-2 या मोहिमेची ही सर्वात मोठी उपलब्धी म्हणता येईल.
 

 
 
अवकाश मोहिमांचा जगभराचा इतिहास हेच सांगतो. नासा ही अवकाश संशोधनातील अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेने आखलेल्या चांद्रमोहिमेच्या यशाचे प्रमाण साठ टक्क्याहून कमी आहे. त्या संस्थेने एकूण 109 मोहिमा आखल्या. त्यातील फक्त 60 यशस्वी झाल्या. काही अशंतः यशस्वी झाल्या. त्यांच्याशी तुलना करता चांद्रयान-2 ही मोहीम 95 टक्के यशस्वी झाली, असे म्हणता येईल. या जागतिक मोहिमांमध्ये काही खाजगी कंपनीने आखलेल्या मोहिमांचा समावेश आहे. 1958 ते 2019 या कालावधीत अमेरिका, रशिया, जपान, युरोपियन युनियन, चीन आणि इस्रायल यांनी चांद्रमोहिमा आखल्या आहेत. अमेरिकेने आखलेली पहिली चांद्रमोहीम पायोनियर-शून्य ही अयशस्वी झाली. त्यानंतर रशियाने चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आखलेली लुना-1 ही मोहीम यशस्वी झाली. यात हे यान फक्त चंद्राच्या कक्षेत स्थिरावले. एका वर्षाच्या कालावधीत रशिया आणि अमेरिकेने एकूण 14 मोहिमा आखल्या. त्यातल्या रशियाच्या लुना-1, 2 आणि 3 या मोहिमा फक्त यशस्वी झाल्या. या घटना 1958 ते 1960 या दरम्यान घडल्या. त्यानंतर 1964 मध्ये अमेरिकन यान रेंजर-7 हे चंद्राजवळ पोहचले. तोपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरता आले नव्हते. तो मान प्रथम रशियाने मिळवला. या देशाने लुना-9 हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून पृष्ठभागाचे प्रथमच जवळून छायाचित्रे घेतली. या काळात अमेरिका आणि रशिया यांच्यात अवकाश मोहिमांबाबत चढाओढ लागली होती. अमेरिकेने त्याच वर्षी सर्व्हेयर-1 हे यान चंद्रावर उतरवले. या मोहिमांचा कळस अमेरिकेने गाठला. अपोलो-11 हे यान मानवाला घेऊन प्रथमच चंद्राच्या कक्षेत गेले. त्याच मोहिमेत नील आर्मस्ट्रॉंग या अवकाशयात्रीने प्रथम चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास रचला. 1958 ते 1980 या कालावधीत अमेरिका आणि रशिया यांनी एकूण तब्बल 90 मोहिमा पार पाडल्या. या संशोधनात जपान, युरोपियन युनियन, चीन आणि भारत या देशांनी नंतर प्रवेश केला. चांद्रयानाच्या यशापयशाचा विचार करताना ही पार्श्वभूमीही विचारात घेणे आवश्यक आहे. उशिरा या संशोधनात प्रवेश केलेल्या देशासमवेत 2000 ते 2009 या कालावधीत एकूण 6 मोहिमा पार पाडल्या. या मोहिमांमध्ये युरोपची स्मार्ट-1, जपानची सेलेन, चीनची चेंज-1 आणि भारताची चांद्रयान-1 आणि अमेरिकेच्या दोन मोहिमांचा समावेश आहे. 2009 ते 2019 या कालावधीत एकूण 10 अवकाश मोहिमा आखण्यात आल्या. त्यापैकी पाच भारताने आखलेल्या होत्या. तीन अमेरिकेने आणि दोन इस्रायलने आखल्या होत्या. 1990 पासून आतापर्यंत अमेरिका, जपान, भारत, युरोपियन युनियन, चीन आणि इस्रायल यांनी मिळून 19 मोहिमा आखल्या आहेत.
 
 
चांद्र मोहिमांसोबत इतर अनेक मोहिमा अवकाशात जाण्यासाठी आखल्या गेल्या आहेत. आंतररष्ट्रीय अवकाश स्थानकाचा यात समावेश आहे. ही संशोधन प्रयोगशाळा दोन दशकांहून अधिक काळ अंतराळात आहे. या स्थानकात अनेक प्रकारचे संशोधन करता येते. यात प्राणी, वनस्पती, मानव, जीवाणू, पेशी यांच्यावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यात येतो. स्फटिकीकरण, पाण्याचा पृष्ठीय ताण त्याचप्रमाणे निरनिराळ्या पदार्थांच्या निर्मिती याचाही अभ्यास केला जातो. अमेरिकन आणि रशियन अंतराळवीर या स्थानकात 3 ते 6 महिन्यांचा काळ व्यतीत करतात. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी या स्थानकात दोनदा वास्तव्य केले आहे.
 
 
अवकाश मोहिमांतील काही अपघातात जीवितहानी झाली आहे. स्पेस शटल चँलेजरला 1986 साली अपघात झाला. त्यापूर्वी या यानाने 9 वेळा यशस्वी उड्‌डाण केले होेते. दहाव्या वेळी उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच त्याचा स्फोट झाला. या अपघातात सर्व सात अवकाशयात्रींचा मृत्यू झाला. त्यात एका शालेय शिक्षकाचा समावेश होता. साध्या ओरिंगमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडून आला. त्यानंतरचा मोठा अपघात 2003 साली झाला. यातही सात अवकाशयात्रींना आपला जीव गमवावा लागला. यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांचा समावेश होता. हे यान यापूर्वी 28 वेळा अवकाश सफर करून आले होते. या यानाच्या बाह्य भागात उष्णतारोधक लहान चौकोनी पट्‌ट्या बसवलेल्या असतात. यान हवेतून जमिनीकडे येत असताना घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. उष्णतारोधक आवरणामुळे बाहेरील तपमान वाढले असले तरी आतील भागात त्याची झळ पोहोचत नाही. या आवरणाचा टवका उडाल्यास अवकाशयात्री दुरुस्त करीत असत. अपघाताच्या वेळी बाह्य भागाला झालेले नुकसान नेहमीच्या तुलनेत मोठे होते. दुर्दैवाने त्याची दखल घेण्यात आली नाही. हे टवका उडालेले यान हवेत शिरल्यानंतर बाहेरील उष्ण वायूंनी आत प्रवेश केला. त्यामुळे यानाने पेट घेऊन ते समुद्रात कोसळले. यात ब्राऊन, हजबंड क्लार्क, चावला, अँडरसन, मॅकूल आणि रामोन या अवकाशयात्रींचा समावेश होता. या अपघातानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. त्यांनी या अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. या दुःखामुळे खचून जाऊन आम्ही आमचे प्रयत्न सोडणार नाही. अवकाशमोहिमा भविष्यातही चालूच राहतील. त्यांचा हा ठाम निर्धार संशोधकांमध्ये विश्वास निर्माण करणारा होता. चांद्रयान-2 च्या मोहिमेत आलेले अपयश या तुलनेत अगदीच किरकोळ आहे, असे म्हणावे लागेल. त्याचा ऊहापोह करताना भारतीय संशोधकांच्या प्रयत्नांचा विचार करावा लागेल.
 
 
 
भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाली. त्या वेळी भारत अतिशय अप्रगत अवस्थेत होता. गरिबीची समस्या बिकट होती. अन्न, वस्त्र आणि निवार्‍याचा प्रश्न बिकट होता. अशा स्थितीत अवकाश संशोधनाचा घेतलेला निर्णय सर्व जगाला अप्रस्तुत वाटत होता. भारताला मदत करण्यापेक्षा प्रगत देश भारताला हिणवण्यात धन्यता मानत होते. अशा काळात विक्रम साराभाई यांनी काही युवकांना हाताशी धरून अवकाश संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. अग्निबाण निर्मितीची प्रक्रिया पूर्णतः भारतीय बनावटीची होती. त्यासाठी इंधनाची आवश्यकता होती. भारतीय शास्त्रज्ञांनी पहिल्या टप्प्यात घन इंधनाची निर्मिती केली. त्यातूनच पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल आणि जीओ स्टेशनी लॉंच व्हेईकल असे दोन प्रकारचे अग्निबाण तयार करण्यात आले. यातही एकदम यश प्राप्त झाले असे नाही. 2010 साली जीओ स्टेशनरी लॉंट व्हेईकल (जीएनएलव्ही) उड्डाणानंतर काही क्षणातच स्फोट होऊन समुद्रात कोसळले. ही घटना अनेकांनी प्रत्यक्ष त्याचप्रमाणे दूरदर्शनवर पाहिली. या अपघातानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या क्षमतेवर शंका घेतली जाऊ लागली. शेती करणारा देश प्रगत राष्ट्रांच्या पंगतीला येऊ पाहतोय, अशा अर्थाचे व्यंग्यचित्रही प्रसिद्ध झाले. त्यातूनही खचून न जाता इस्रोने भरारी घेतली. जे देश भारताच्या क्षमतेवर शंका घेत होते, तेच देश त्यांचे उपग्रह भारतीय अग्निबाणाच्या वापर करून अवकाशात सोडू लागले. त्यानंतर भारताने चांद्रयान-1 ही मोहीम यशस्वी करून दाखवली. कमी खर्चात अवकाश मोहिमा राबवता येतात, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. पहिल्याच चांद्रमोहिमेत चंद्रावरच्या पाण्याचे अस्तित्व दाखवून दिले. मंगळ मोहिमेने भारताच्या लौकिकात भर पडली. पहिल्याच प्रयत्नात भारताने आपले यान मंगळाच्या कक्षेत पोहचवले. तेही 2017 मध्ये झालेल्या अपघातानंतर.
 
 
चांद्रयान-2 मोहिमेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यासाठी निवडलेला मार्ग वेगळा आहे. पृथ्वीभोवती फिरताना कक्षा वाढवीत नेऊन हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहे. यामुळे कमी शक्तीच्या अग्निबाणाचा उपयोग शक्य होणार आहे. त्यामुळे कमी इंधनाचा वापर होऊन खर्चाची बचत होणार आहे. या यानातील लॅण्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. त्या ठिकाणी अद्याप कोणत्याही देशाने आपले लॅण्डर उतरवलेले नाही. अशी ही मोहीम शेवटच्या टप्प्यात आली असताना त्यामध्ये अडचण आली. पृष्ठभागापासून दोन किलोमीटर अंतरावर लॅण्डर आले असताना त्याच्याशी संपर्क तुटला. त्यानंतर चांद्रयान-2 मोहिमेच्या अपयशाची चर्चा सुरू झाली. आत लॅण्डरचे छायाचित्र प्राप्त झाले असून ते सुस्थितीत असल्याचे दिसते. त्याच्याशी संपर्क जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपर्क प्रस्थापित झाल्यास ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होऊ शकेल. शेवटच्या टप्प्यात आलेल्या अडचणीमुळे खूप काही शिकता येणार आहे. भारताने जे यश या मोहिमेमुळे मिळवले आहे त्याची प्रशंसा नासाने केली आहे. भारतीय संशोधक, सरकार आणि भारतीय जनता यामुळे निराशा झालेली नाही. कारण या अपयशातूनच यशाकडे जाण्याचा मार्ग सापडणार आहे, याची प्रत्येक भारतीयाला खात्री आहे.
डॉ. पंडित विद्यासागर
••