केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे...

    दिनांक :15-Sep-2019
आग्र्‍याच्या दरबारातील अपमान सहन न झाल्याने स्वाभिमानी शिवाजीराजांनी बाणेदारपणे केलेली िंसहगर्जना आपण मागील लेखात बघितली. सुदैवाने औरंगजेबाने कुठलीही कारवाई न करता रामिंसहाला सूचना केली की, त्यांस तुझ्या हवेलीवर घेऊन जा व त्याची समजूत घाल. पुढे काही दिवस रामिंसह व रजपुतांचे लोक राजांची समजूत काढत होते. वेळ लागला पण आता राजे जरा शांत झाले. इथे औरंगजेबाचीही भूमिका पडताळून पाहणे अगत्याचे ठरेल. त्याने राजांच्या राजगड-आग्रा प्रवासाची चोख व्यवस्था केली होती, त्यासाठी निधीही दिला होता, शाहजाद्याप्रमाणे स्वागताच्या सूचना दिलेल्या होत्या. पण, त्याच्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आणि रामिंसहाच्या हलगर्जी स्वभावामुळे शिवाजीराजांना वारंवार मनस्ताप सहन करावा लागला होता. मुख्य म्हणजे संभाजी हा दरबारचा पंचहजारी मनसबदार असून सीवा बादशाहच्या नोकरीमध्ये नाही, हेतर सगळेच सपशेल विसरले होते िंकवा त्यांचा गैरसमज झालेला होता, हे निश्चित! त्यामुळे जयिंसहाच्या आश्वस्त करणार्‍या शब्दांच्या विपरीत या सर्व अधिकार्‍यांचे आणि दुर्दैवाने रामिंसहाचेही वर्तन होते. 22 ऑगस्ट 1666 च्या ‘अखबारा’त एक नोंद आढळते की, ‘मुहम्मद अमीनखानास बादशाहने हुकूम केला आहे की, यापूर्वी तू असा अर्ज केला होतास की, सीवा अतिशय विश्वास दाखविणारा पण ***जादा आहे (इथे राजांसाठी औरंगजेबाने शिवी वापरली आहे, ज्याचा उल्लेख आम्ही करू शकत नाही). त्या वेळी बादशहांनी त्यावर विश्वास ठेवला नव्हता पण आता ते खरे झाले.’ याचा अर्थ ‘शिवाजी दगाबाज आहे’ यावर औरंगजेबाचा पूर्वी विश्वास नव्हता म्हणजे किमान 12 मेपर्यंत तरी त्याच्या मनात किल्मिष नव्हते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11 मे रोजी राजांच्या स्वागतासाठी कुणी महत्त्वाची व्यक्ती गेलेली नव्हती, 12 मे रोजी रामिंसहाची अन्‌ महाराजांची चुकामुक झाली अन्‌ त्यामुळे दरबारात जायला उशीर झाला. यामुळे दरबारचे रीतिरिवाज काय असतात, मानसम्मान कसा असतो, कोण कसे न कुठे उभे राहते, या सगळ्या गोष्टींचा विस्तृत तपशील राजांना मिळाल्याची शक्यता कमी आहे. शिवाय औरंगजेब स्वतः कार्यक्रमाच्या तयारीमध्ये व्यग्र असल्यामुळे इतर मान्यवरांसारखेच शिवाजीचेही स्वागत- सत्कार आपल्या अधिकार्‍यांनी सूचनेप्रमाणे केले असेल, असा त्याचा समज होणे स्वाभाविक होते. पण, रामिंसहाचा गलथानपणा, अधिकार्‍यांची हलगर्जी, जयिंसहाने दिलेली आश्वासने, औरंगजेबाला त्याची नसलेली कल्पना, त्यामुळे भेटीबद्दल राजे व औरंगजेब यांच्या परस्परविरोधी कल्पना या सर्व गोष्टींमुळे गैरसमज वाढत गेले. दोघांमध्येही अनावश्यक कटुता उत्पन्न झाली आणि तिने भविष्यातील राजकारणाची दिशाच बदलवून टाकली.
दरबारामध्ये राजे इतके आवेशात कडाडले, मोगलांच्या दृष्टीने तर ही दरबारची तौहीन (अपमान) होती. त्यामुळे आज आपण जसे पाहतो की, साधारण प्रत्येकच संस्था िंकवा कंपनीमध्ये नेतृत्वाचे कान भरणारे राजकारणी असतात. यांचे स्वतःचे कर्तृत्व काहीही नसते, पण आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी ते कर्तृत्ववान माणसांविरुद्ध सातत्याने नेतृत्वाचे कान फुंकत असतात. इथेही तेच झाले, भर दरबारात राजांनी ज्याचा अपमान केला तो जसवंतिंसह, सुरतेचे उत्पन्न जिच्या नावावर होते ती औरंगजेबाची बहीण जहॉंआरा बेगम आणि शाहिस्ताखानाचा नातेवाईक वजीर जाफरखान हे तिघे मिळून औरंगजेबाचे कान भरू लागले. बादशाहने लगेच काही हालचाल तर केली नाही, पण नंतर राजंदाजखानाच्या हवेलीमध्ये राजांना हलविण्याचा हुकूम सोडला. हा राजंदाजखान बादशाहच्या खास मर्जीतला व आग्रा किल्ल्याचा किल्लेदार होता. राजांना खानाच्या तावडीमध्ये देण्याचा डाव लक्षात आल्याबरोबर रामिंसहाने मोहम्मद अमीनखान मीर बक्षीद्वारे बादशाहला निरोप पाठविला की, तुम्ही असे करणार असाल तर आधी मला ठार मारा. याचाच अर्थ असा होता की, शिवाजीला हात लावायचा असेल तर आधी आमच्याशी युद्ध करा. राजपूतांशी वाकड्यात शिरण्यात अर्थ नाही, हे जाणून असलेल्या औरंगजेबाने तूर्तास आपला हुकूम मागे घेतला व रामिंसहाला शिवाजीचा जामीन राहण्यास सांगितले. ही चाल व्यर्थ गेल्यावर औरंगजेबाने रामिंसहाला सांगितले की, शिवाजीसोबत तुला काबूलच्या स्वारीवर जायचे आहे. शिवाजी आग्र्‍यापासून दूर जातोय हे कळल्याबरोबर रामिंसह खूष झाला. पण, इतक्यात त्याला कळले की, आपल्यासोबत राजंदाजखानाचीही नियुक्ती झाली आहे. हे लक्षात येताच स्वतः शिवाजीराजांनी कबूलला जायला नकार दिला.
औरंगजेबाला वाट होती जयिंसहाच्या पत्राची. दक्षिणेतील राजकारण काय वळण घेते, यावर शिवाजीराजांचे भवितव्य अवलंबून होते. जर दख्खनमध्ये जयिंसहाला निर्णायक विजय मिळाला, तर शिवाजीला जिवंत ठेवण्यात औरंगजेबाला स्वारस्य नव्हते. पण, जर जयिंसह नापास झाला तर दख्खनचा उत्तम माहितगार असलेल्या शिवाजीला हाताशी घेऊन सारा िंहदुस्थान आपल्या कवेत घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. राजांचे जीवित असे लोलकाप्रमाणे अधांतरी लोंबकळत होते. याची कल्पना राजांनाही बव्हंशी आली असल्याने व रामिंसहाकडून काही विशेष होऊ शकेल याची खात्री नसल्याने राजांनीच आपल्या पद्धतीने काम सुरू केले. पंचतंत्रामध्ये एक महत्त्वाचा श्लोक येतो,
 
कुटलेख्यैर्धनोत्सर्गैर्दूषयेच्छत्रुपक्षजयम्‌।
प्रधान पुरुषं यद्वद्विष्णूगुप्तेन राक्षस:।।
 
शत्रुपक्षातील जो सर्वात महत्त्वाचा पुरुष असेल त्याला कुटलेख, धनाचे वितरण इत्यादी अनेक प्रयासांनी वश करावे. विष्णुगुप्ताने राक्षसाला जाळ्यात पकडताना जसा या सर्वांचा उपयोग केला तसा आपणही करावा. बहिर्जी जाधवांमार्फत राजांनी मोगलांचे महत्त्वाचे लोक, त्यांचे आपापसातील संबंध, मोगलांचे कच्चे दुवे इत्यादी माहिती काढायला सुरुवात केली. राजांचे प्रखर मुत्सद्दी रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर, निराजी रावजी आदींच्या माध्यमातून बड्याबड्या उमरावांशी संधान बांधले. अन्‌ 16 मे या दिवशी सदिच्छा भेटीच्या रूपाने राजांचा पहिला छापा पडला तो थेट मुघलिया सल्तनतीचा वजीर (प्रधानमंत्री) जाफरखान याच्यावर. राजांचे बोलणे तर प्रभावी होतेच, शिवाय त्यांनी भेटीदाखल दिलेले उपहारही अत्यंत मौल्यवान होते. या सर्वांचे निष्पन्न असे झाले की, कालपरवापर्यंत ‘शिवाजीला जिवंत ठेवू नका’ असे म्हणणारा हा वजीर बादशाहपुढे शिवाजीचा माफीचा अर्ज ठेवत होता. 27 मे रोजी राजे अमीनखानला भेटले व त्यालाही भरपूर मौल्यवान भेटी देऊन बादशाहपुढे आपला अर्ज ठेवण्यास बाध्य केले. या अर्जात राजे म्हणत होते की, ‘‘बादशहांनी माझे घेतलेले सर्व किल्ले परत केलेत, तर मी 2 कोटी रुपये त्यांना देईल. माझा मुलगा आपल्या चाकरीमध्ये ठेवेन व माझी गरज पडेल तेव्हा मी ससैन्य आपल्याला सामील होईल.’’ इथे आपल्या लक्षात एक विलक्षण गोष्ट येते की, राजे किती थोर मुत्सद्दी असतील की, स्वतःच्या मुक्ततेसाठी ते थेट शहंशाहलाच 2 कोटी रुपयांचे आमिष दाखवताहेत. पण, ज्याच्याशी टक्कर आहे आहे तोही शेवटी औरंगजेब आहे, त्याने या अर्जाकडे दुर्लक्ष केले. त्याला हेही लक्षात आलेले होते की, सीवा आपल्या महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेतो आहे, त्यामुळे त्याने (सीवाने) आता असे काही करू नये, अशीसुद्धा ताकीद देण्यात आली. याच आदेशान्वये 29 मे रोजी राजांच्या छावणीभोवती चौकी पहारे बसविण्यात आले आणि राजे नजरकैदेत अडकले.
 
 
31 मेच्या अखबारातील एक नोंद अशी आहे की, बादशाहने गाझीबेग गुर्झबार्दारास विचारले की, सीवाने इमामवर्दीकडून किती हत्ती विकत घेतले आहेत ते पाहावे. 12 जूनच्या एका पत्रामध्ये औरंगजेबाने हुकूम केला आहे की, कदाचित सीवा पळून जाऊ शकतो, तरी सर्व चौक्यांनी सतर्क राहावे. काहीही अनुचित घडले तर केंद्राला सूचना द्यावी. इथे हे लक्षात येते की औरंगजेब गाफील नाही तो अत्यंत सावध आहे. आणि सावध शत्रूसोबत मुकाबला हा नेहमीच कठीण ठरत असतो. रामिंसहाला आपल्या जामिनातून मुक्त करावे व आपणही त्याच्या बंधनातून मुक्त व्हावे. यासाठी राजांनी औरंगजेबाला अर्ज केला की, माझ्यासाठी एका वेगळ्या हवेलीची तरतूद करा. अर्थात हा अर्जही औरंगजेबाने फेटाळून लावला. पुढे राजांनी अजून एक अर्ज केला की, ‘‘मी आपणास (बादशहास) माझे सर्व किल्ले बिनशर्त देतो. त्याचे आदेश देण्यासाठी मला दख्खनमध्ये जाऊ देण्यात यावे.’’ औरंगजेबाने पत्राद्वारे उत्तर दिले की, ‘‘तुझी स्वतः जाण्याची काय गरज? तू पत्र दे, तेच पुरेसे आहे.’’ काही काळाने राजांनी एक आश्चर्यजनक अर्ज केला की, ‘‘आता मला राजकारणात स्वारस्य उरले नाही. आपण मला मुक्त करावे. मी संन्यास घेऊन कशीला निघून जातो.’’ धूर्त औरंगजेबाला कळले की, शिवाच्या मनात काय आहे ते. तो पत्र पाठवतो की, ‘‘संन्यासच घ्यायचा आहे तर मी तुमची व्यवस्था अलाहाबादला करतो.’’ अलाहाबादला औरंगजेबाचे मोठे कारागृह व टॉर्चर डिपार्टमेंट होते. अर्थात, चर्चा इथेच संपली. पुन्हा काही दिवसांनी राजे अर्ज करतात की, मलातर आपण ठार मरणारच आहात, माझ्या लोकांना तरी जाऊ द्या. शिवाजीची शक्ती या कारणाने कमी होऊ शकेल व आपण त्याला आरामात मारू शकू, या योजनेतून औरंगजेबाने या अर्जाला मात्र तत्काळ मंजुरी दिली. राजांच्या लोकांसाठी परवाने (लायसेन्स) तयार होऊन तुकड्या तुकड्यांमध्ये हे लोक आग्र्‍यातून बाहेर पडले. आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा अर्ज राजे करणार होते. त्याच्या मंजुरी/ नामंजुरीवर राजांचे जीवित सुरक्षित की असुरक्षित, हे ठरणार होते.
 
 
पण, इथे आपल्या लक्षात येते की, प्राणांतिक संकटांमध्येसुद्धा राजे हतबल होत नाहीत की निराशा त्यांना स्पर्शून जात नाही. ते सातत्याने प्रयत्न करत राहतात. समर्थ रामदास स्वामी म्हणत असत, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे, यत्न तो देव जाणावा.’ सामान्य मुंगीलासुद्धा माहिती असते की, पावसाळ्यात मला काहीही मिळणार नाहीये, त्यामुळे ती आपल्या खाण्यापिण्याची सोय फार आधीपासून लावत असते. सतत मेहनत करून कोणत्या घरात जायचे, तिथे स्वयंपाकघर कुठे आहे आणि त्यातही साखरेचा डबा िंकवा गोड पदार्थ कुठे आहे, याचा बरोबर शोध घेत असते. अपयश आले तरी निराश न होता ते पचवत असते. सोहनलाल द्विवेदींची अप्रतिम कविता हेच सांगते,
 
 
‘नन्ही चींटी जब दाना लेकर चलती हैं,
चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती हैं,
मन का विश्वास रगों में सहस भरता हैं,
गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न अखरता हैं,
आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती।।’
 
 
एक राजा दोन माणसांना मृत्युदंड देतो. पहिला माणूस घाबरून जातो, तर दुसरा डोक्यावर हात मारून खाली बसतो आणि म्हणतो, ‘‘अरे देवा, आता मी माझ्या घोड्याला कसे उडवणार?’’ राजा म्हणतो काय म्हणालास? माणूस म्हणतो, ‘‘मी एक प्रयोग करतोय ज्याद्वारे माझा घोडा दोन वर्षांत उडायला लागेल.’’ राजाला आश्चर्य वाटतं व तो म्हणतो, ‘‘तू माझ्या घोड्याला उडवू शकशील?’’ माणूस म्हणतो, ‘‘हो, का नाही.’’ राजा त्याला प्रयोग करण्यासाठी मुक्त करतो. मृत्युदंड दिलेला दुसरा माणूस विचारतो की, ‘‘तू खोटे का बोललास, त्याने काय होणार आहे?’’ पहिला माणूस म्हणतो की, ‘‘मी खोटे बोललो म्हणून माझा मृत्यू दोन वर्षे पुढे ढकलला, आता या दोन वर्षात कदाचित घोडा खरंच उडेल, नाहीतर कदाचित राजाचे राज्य त्याच्या हातून जाईल, नाहीतर कदाचित राजा स्वतःच मरेल.’’ मित्रांनो, माणसाने हातपाय गाळायचे नसतात. आपल्याला वाटतं की, संकटे फक्त माझ्यावरच आहेत, संकटे सर्वांवरच येत असतात. आपल्या हाती आहे रस्ते शोधून काढणे. न जाणो अचानक एखादा मार्ग सापडून जावा. आर्थिक स्थिती डबघाईला आली असेल, कर्जाचा बोजा वाढत असेल, एखादा पेपर निघत नसेल, नोकरी प्राप्त करण्यात अडचणी असतील, बढती मिळत नसेल, आपल्याला आवडतं ते काम करायला मिळत नसेल, तरी माणसाने हातपाय गाळून बसू नये. नशिबावर खापर फोडू नये, माणसाने कार्यमग्न राहावे, एक ना एक दरवाजा नक्की उघडतोच. शिवाजीराजांचे किती अर्ज औरंगजेबाने केराच्या टोपलीकडे वळविलेत. राजे हताश, निराश झाले नाहीत. पण, आता राजांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेतून निघालेला एक अफलातून अर्ज औरंगजेबाकडे जाणार होता. हा एक अर्ज शिवाजीराजांचे जीवित सुरक्षित राहते की मृत्यू त्यांच्यावर झडप घालतो, ते ठरविणार होता. आणि महाराजांकडून तो अर्ज औरंगजेबाकडे निघाला. (क्रमशः)
••• डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490