स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती द्वेषाची कारणे...

    दिनांक :15-Sep-2019
उदय माहुरकर
थोर क्रांतिकारक आणि ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेवरून निखळ हिंदुत्वाची ज्यात चर्चा आहे अशा ‘हिंदुत्व’ नामक पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची निंदानालस्ती करण्याची आपल्या देशात एक प्रथाच पडली आहे. सावरकरांसाठी आधी देश होता. देशापुढे कुठलीही गोष्ट, अगदी रिलिजनही नव्हता. असे असले तरीही समाजातील काही घटकांनी त्यांचा अतिशय द्वेषच केला. एवढ्यातच, कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी शाखा- एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या सावरकरांच्या पुतळ्याला विद्रूप केले.

आश्चर्य म्हणजे, सावरकरांवर लागत असलेल्या क्षुद्र आरोपांपासून त्यांचा बचाव करणार्‍यांपैकी बहुतेक जण त्यांचा बचाव, सावरकरांच्या क्रांतिकारक भूमिकेच्या आधारे करीत असतात. खरेतर, सावरकरांचा बचाव करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग, त्यांचे विचार आणि त्यांच्या मान्यतेच्या आधारावर करणे होय.\
 
 
असे जर केले तर, आपल्या धार्मिक आणि वैचारिक लक्ष्यपूर्तीसाठी ज्यांना भारत सतत खंडित ठेवायचा आहे अशा विश्वव्यापी इस्लामवादी, विश्वव्यापी ख्रिश्चनवादी आणि कम्युनिस्ट- या सावरकरांवर हल्ले करणार्‍या तीन प्रमुख गटांचा मनसुबा आपल्या लक्षात येईल. या तीन शक्ती, व्होटबँक राजकारणाचे एक उपकरण म्हणून छद्म-सेक्युलर असलेल्या राजकीय पक्षांच्या सावरकरविरोधी विचारांना उचलून धरत आहेत. गंमत म्हणजे, ज्या सावरकरांची स्तुती कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेत्या इंदिरा गांधींनी केली, तीच कॉंग्रेस आता सावरकरांची निंदा करीत आहे. यावरून हे दिसून येते की, गेल्या तीस वर्षांत, सावरकरांबाबतच्या द्वेषाने मूळ धरले आहे आणि राजकीय पक्षांमधील वाढत्या मुस्लिम तुष्टीकरणासोबत हा द्वेषही वाढला आहे. सावरकरांची बदनामी केली की, अल्पसंख्यकांची मते मिळण्याची शाश्वती होते, असे या पक्षांना वाटते.
 
 
हिंदूंचे कन्व्हर्शन करून तसेच इतरही मार्गांनी, भारताचे इस्लामी देशात रूपांतर करण्याचे वैश्विक इस्लामीवाद्यांचे, तसेच ख्रिश्चन देश करण्याचे वैश्विक ख्रिश्चनवाद्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या समाजात असे स्वप्न बघणार्‍यांचे प्रमाण फार कमी असले, तरी भारतात अशांचा प्रचंड प्रभाव आहे. कारण, या मंडळींमागे या दोन धार्मिक विचारांच्या आंतरराष्ट्रीय प्रमुख पात्रांचे भक्कम पाठबळ आहे.
 
 
आपल्या रिलिजनमधील सर्वसमावेशी वृत्तीच्या असंख्य भाऊबंदांना भ्रमित प्रचाराच्या माध्यमातून प्रभावित करण्यासाठी ही मंडळी आपली पूर्ण शक्ती वापरत असतात. भारताचा आकार आणि त्याची अंत:स्थ शक्ती बघता, या देशाला एका झटक्यात गिळंकृत करणे शक्य नाही, याची त्यांना जाणीव आहे. म्हणून त्यांना भारत सतत विभाजित, खंडित राहावा असे वाटते. जेणेकरून, हळूहळू भारताला तुकड्या-तुकड्यात गिळता येईल. सौम्य व कट्‌टर कम्युनिस्टांचेही असेच वैचारिक कारस्थान आहे.
 
 
त्यांच्या या कारस्थानात सर्वात मोठा अडथळा कुठला असेल, तर सावरकरांचा शुद्ध राष्ट्रवादाचा विचार. या विचारानुसार सावरकरांना संपूर्ण देश, अगदी मुस्लिम व ख्रिश्चनांसह, सर्वांना समान वागणूक आणि कुणाचेच तुष्टीकरण नाही, या आधारावर एकत्र करायचा आहे. सावरकरांचे मराठी चरित्रकार धनंजय कीर यांच्या पुस्तकात दिलेल्या सावरकरांच्याहिंदू राष्ट्राच्या जाहीरनाम्यात सावरकर म्हणतात,हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना समान अधिकार असतील. याच्याही पुढे एक पाऊल जात ते म्हणतात की, जर मुस्लिम व ख्रिश्चनांच्या प्रार्थनेत कुणीही अडथळा आणला तर सरकार त्यात हस्तक्षेप करील आणि त्यांना त्यांच्या श्रद्धेनुसार प्रार्थना करता येईल, हे बघेल. परंतु त्याच वेळी सावरकर इशाराही देतात की, धार्मिक अल्पसंख्यवादाच्या नावाने राष्ट्रामध्ये आणखी एक राष्ट्र निर्माण करण्याचे, जो भारताचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास राहिला आहे, कुठलेही प्रयत्नहिंदू राष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत. मुस्लिम तुष्टीकरणाने आधी फाळणी झाली आणि नंतर, भारताला एक राष्ट्र म्हणून वर येण्यास प्रतिबंध केला. कारण, वैश्विक इस्लामीवादावर विश्वास असलेल्या तसेच इस्लामचा सौम्य चेहरा असलेल्या सूफीवादाचा निषेध करणार्‍या देवबंदी व अहले हदीस या वहाबीवादाच्या एकांगी विचारांना मुस्लिम तुष्टीकरणामुळे बळ मिळाले व ते वाढतच गेले.
 
 
सावरकरांच्या मतानुसार, कॉंग्रेसने मुस्लिम तुष्टीकरण केले नसते, तर भारताची फाळणी कदाचित टाळता आली असती. गेल्या तीन दशकांपासून दहशतवादाचा जगात सर्वात मोठा प्रवर्तक व निर्यातदार पाकिस्तान देश 1947 साली निर्माणच झाला नसता, तर कट्‌टर इस्लामने मूळच धरले नसते आणि कदाचित आज हिंदू व मुस्लिम अधिक सौहार्दाने राहिले असते.
 
 
देशसुरक्षेला प्राधान्य
भारताच्या इतिहासात, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याबाबत स्पष्ट समज असणारे सावरकर सोडले तर दुसरा कुठलाही नेता झाला नाही! या मुद्यावर कदाचित ते इतर दोन महान नेते- सरदार वल्लभभाई पटेल व सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षा दोन पावले समोरच होते. भारतीय इतिहास आणि भारताला विखंडित ठेवण्याची मनीषा असलेल्या उपरोल्लेखित तीन शक्तींच्या मानसिकतेबाबत सावरकरांची जाण, अर्वाचीन भारताच्या इतिहासात दुसर्‍या कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक उजवी होती. चरित्रकार धनंजय कीर म्हणतात की, खरेतर सावरकरांच्या सल्ल्यावरूनच सुभाषचंद्र बोस भारताबाहेर गेले आणि ‘आझाद हिंद सेना’ तयार करण्यासाठी जपान व जर्मनीशी दोस्ती केली. सावरकरांचे मत होते की, मुत्सद्देगिरीच्या प्रांतात कुणीच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. हा सल्ला त्यांनी बोस यांना दिला होता.
 
 
अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण
1937 साली, 14 वर्षांच्या कठोर सश्रम कारावासानंतर आणि 13 वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर सावरकर जेव्हा मुक्त झाले, तेव्हा कॉंग्रेस पक्षातील समाजवादी गटाने त्यांना कॉंग्रेस पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु, सावरकरांनी हा प्रस्ताव नाकारला आणि त्यासाठी त्यांनी जे उत्तर दिले ते, गेल्या 100 वर्षांत अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या ज्या समस्या निर्माण झाल्यात त्या समजण्याची एकप्रकारे गुरुकिल्लीच आहे. त्यांनी या समाजवादी गटाला सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी कुठल्याही परिस्थितीत हिंदू-मुस्लिम एकता घडवून आणण्याची जी पूर्वअट कॉंग्रेसने ठेवली ती त्यांची सर्वात मोठी घोडचूक होती.
 
 
ते म्हणाले, हिंदू-मुस्लिम एकतेशिवाय स्वातंत्र्य मिळू शकत नाही, ही जी कॉंग्रेसची समजूत होती, तिचा मुस्लिम नेत्यांनी गैरवापर करून हिंदूंच्या हक्कांचा बळी देऊन मुस्लिम समाजाला विशेष अधिकार मिळवून दिलेत. या धोरणामुळे हिंदू-मुस्लिम एकत्र तर येणार नाहीतच, उलट एकमेकांपासून दूर जातील, असे ते म्हणाले. मुस्लिम तुष्टीकरणाला ‘हिंदूंच्या हक्कांचा सौदा’ असे दूषण देताना सावरकरांनी त्या वेळी आपली भूमिका खालील वाक्यांनी अधिक स्पष्ट केली होती :
‘‘मी विश्वासघातक्यांच्या पहिल्या रांगेत उभे राहण्यापेक्षा, देशभक्तांच्या शेवटच्या रांगेत उभे राहणे अधिक पसंत करेन.’’
 
पाकिस्तानचा इशारा
1940 साली, मुस्लिम लीगने पाकिस्तानचा ठराव पारित केल्यावर, येणार्‍या सात वर्षांत काय घडू शकते, याचा विचार करणारे फक्त सावरकरच एकमेव होते! जेव्हा कॉंग्रेस नेते म्हणत होते की, भारताची फाळणी झालीच तर ती आमच्या मृतदेहांवर होईल, तेव्हा सावरकर म्हणाले होते की, तुष्टीकरणातून ज्या प्रकारे कॉंग्रेस पक्ष मुस्लिम लीगसमोर शरणागती पत्करत आहे आणि मुस्लिम लीगच्या दबावाखाली 1936 साली ज्या प्रकारे सिंध प्रांत मुंबई प्रेसिडेन्सीतून वेगळा करण्यात आला, हे बघता पाकिस्तानची निर्मिती टाळणे अवघड वाटत आहे. 1947 साली जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा सावरकर बरोबर असल्याचे सिद्ध झाले. या घडामोडींचे उल्लेख धनंजय कीर यांच्या ‘वीर सावरकर’ या चरित्रात सापडतात.
 
आसामबाबत भविष्यवाणी
1941 साली, पूर्व बंगालमधून प्रचंड मोठ्या संख्येत मुसलमान ब्रह्मपुत्रेच्या खोर्‍यात स्थलांतरित होऊ लागले होते, तेव्हा सावरकर हे पहिले आसामबाहेरील नेते होते की ज्यांनी इशारा दिला की, या घुसखोरांच्या लोंढ्यांमुळे नजीकच्या भविष्यात आसामची संस्कृती तसेच भारताच्या ईशान्य सीमावर्ती भागाला धोका निर्माण होणार आहे. त्याच्या उत्तरात जवाहरलाल नेहरू म्हणाले, ‘‘निसर्गाला पोकळी नामंजूर असते. म्हणजे, जिथे मोकळी जागा आहे तिथे स्थायिक होण्यास आपण लोकांना कसे काय रोखू शकतो?’’
 
सावरकरांनी ताबडतोब प्रतिहल्ला केला : ‘‘निसर्गाबाबत पंडित नेहरूंचे ज्ञान फारच अल्प आहे. निसर्गाला विषारी वायूदेखील नामंजूर असतात.’’ आज सावरकर सत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. 1941 साली, आसाममधील मुस्लिम लोकसंख्या फक्त 10 टक्के होती. आज ती 35 टक्के झाली आहे. एवढेच नव्हे, तर त्या काळी जे कुणी सूफी होते तेदेखील नंतर भारतीय छाप वहाबीवादी देवबंदी विचारांच्या प्रभावाखाली येऊन आज कट्‌टर वहाबी झाले आहेत.
 
 
चीनबाबत भविष्यवाणी
1945 साली नेहरूंनी पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला आणि म्हटले की, सहअस्तित्वाची ही पाच परस्परहिताची तत्त्वे, भारत आणि त्याच्या शेजारी देशांनी अंगीकारली तर ते बंधुत्वाच्या भावनेने राहू शकतील. सावरकरांनी पुन्हा एकदा नेहरूंच्या मुत्सद्देगिरीवर प्रश्न उपस्थित करून ऐतिहासिक भविष्यवाणी केली. ते म्हणाले, ‘‘तिबेटला गिळंकृत करण्याच्या चीनच्या प्रयत्नांनंतरही जर नेहरू चीनसमोर लोटांगण घालत असतील, तर इतरांची भूमी बळकावण्याची कम्युनिस्ट देशाची तृष्णा अधिकाधिक वाढतच जाईल आणि भविष्यात चीनने भारताची भूमी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला तर मला आश्चर्य वाटणार नाही.’’
 
सावरकरांसारखाच इशारा त्या वेळी रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनीही दिला होता. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण करून भारताचा प्रचंड मोठा भूभाग बळकावला, तेव्हा या दोघांची भविष्यवाणी खरी ठरली. पाकिस्तानबाबत सावरकर म्हणाले होते की, रिलिजनच्या आधारावर द्वेष पोसणारा देश जोपर्यंत भारताचा शेजारी आहे, तोपर्यंत भारत शांततेत झोपू शकणार नाही. हेही किती खरे ठरले, नाही!
 
क्षुद्र आरोप
सावरकरांवर दोन आरोप केले जातात : एक, तुरुंगवासातून सुटका व्हावी म्हणून त्यांनी ब्रिटिशांकडे माफीनामा पाठविला होता आणि दुसरा, त्यांच्या विचारांमुळे पाकिस्तानची निर्मिती झाली. स्पष्ट व वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे बघितले असता, हे दोन्ही आरोप म्हणजे एक कारस्थान असल्याचे लक्षात येईल. राजकीय व धार्मिक उद्देशांसाठी सावरकरांना बदनाम करण्यासाठी व व्होटबँकेचे राजकारण करण्यासाठीच ते तयार करण्यात आले आहेत. सावरकरांनी कधीही वैयक्तिक माफी मागितली नव्हती. उलट, अंदमान व निकोबारच्या सेल्युलर तुरुंगात खितपत पडलेल्या सर्व लोकांना सामूहिक माफी देण्याची विनंती त्यांनी ब्रिटिशांना केली होती. समजा त्यांनी स्वत:च्या सुटकेसाठी माफीनामा पाठविला होता असे एकवेळ मान्य केले, तरीही ते कृत्य त्यांनी एक क्रांतिकारी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे (कॉंग्रेस विचारांचे नाही) एक अनुयायी या पृष्ठभूमीवर केले होते. या अर्थाने त्याकडे बघितले पाहिजे.
 
1666 साली शिवाजी महाराज जसे औरंगजेबाच्या कैदेतून सुटले होते, तसेच सावरकरांनीदेखील ब्रिटिश कोठडीतून सुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. 1910 साली ‘देशद्रोही कारवायां’साठी लंडनमध्ये 50 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनविण्यात आल्यानंतर सावरकरांना एसएस मोरीया नामक ब्रिटिश जहाजातून भारतात आणत असताना, मार्सेलिस या फ्रेंच बंदरानजीक सावरकरांनी जहाजातून समुद्रात उडी घेतली होती.
 
आणखी काही पुरावे
हिंदू राष्ट्रात सर्व धर्मीयांना समान हक्क असतील, असे स्पष्टपणे नमूद असलेल्या त्यांच्या जाहीरनाम्याशिवाय, दोन पुरावे असे आहेत की, त्यामुळे विरोधक लावत असलेला, सावरकरांना मुस्लिम आणि ख्रिश्चनांना दुय्यम दर्जाचे नागरिक करायचे आहे, हा आरोपही निष्प्रभ होईल.
 
1938 साली, लाहोर येथे पत्रकारांनी सावरकरांना विचारले की, ते आणि जिन्ना देशाला धर्माच्या आधारावर विभागण्यासाठी इतके अडून का बसले आहेत. सावरकरांनी पुढील उत्तर दिले : ‘‘मी स्वत: आणि जिन्ना एकाच पक्ष्याचे पिसे नाही आहोत. मी समता आणि ‘कुणालाच सवलत नाही’ या बाजूने उभा आहे आणि जिन्ना समतेच्या बाजूने तर नाहीतच, शिवाय ते मुसलमानांसाठी अधिकाधिक सवलती सतत मागत असतात.’’ म्हणजे, सावरकरांनी स्पष्ट केले होते की, ते िंहदूंसाठी विशेष हक्काच्या बाजूने नाहीत. परंतु, हिंदूंच्या हक्कांचा बळी देऊन मुसलमानांना विशेष हक्क देण्याच्या विरोधात आहेत. यात ते समान हक्कांसाठी आग्रही असल्याचे दिसून येते.
 
1942 साली, लखनौच्या काही मुसलमानांनी एकत्र येऊन ठराव पारित केला की, गोहत्येत सामील मुसलमानांना, हिंदू-मुस्लिम एकतेचे शत्रू मानले पाहिजे. सावरकरांनी ताबडतोब पत्रक काढले. त्यात या मुसलमानांच्या भावनेची स्तुती करत म्हटले : ‘‘जर मुस्लिम समाजाकडून अशी वृत्ती प्रदर्शित होत असेल तरहिंदू-मुस्लिम एकता शक्य आहे.’’
 
अशा रीतीने सावरकरांचे विरोधक फक्त तेच आहेत जे, सावरकरांचा निखळ राष्ट्रवाद त्यांच्या विचारांच्या मार्गात अडथळा होतो म्हणून विरोध करीत असतात, हे लक्षात येईल.