उपचाराविना रुग्ण जिल्हा रुग्णालयातून वापस

    दिनांक :15-Sep-2019
गिरड गावातील कुटुंब हैरान
विलास नवघरे
गिरड,  येथील दीर्घकाळ आजाराने त्रस्त मनोरुग्ण असलेल्या पुष्पा कवडू सोरटे (३५) या महिलेला स्थानीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि महिला बचत गटांच्या पुढाकारातून उपचारासाठी पाठविल्यावर जिल्हा रुग्णालयातून उपचाराविना परत यावे लागले.हा प्रकार शुक्रवारी ता.१३ घडला.या रुग्णाविषयी गावातील महिला मंडळीनी पुढाकार घेत उपचारासाठी कुटुंब सदस्यांच्या संमतीने पाठविले.यासाठी स्थानीय आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णाची तपासणी करून उपचार केला.आणि रुग्णवाहिका उपलब्द करून दिली. मात्र जिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांने रुग्णाची तपासणी न करताच सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याचा सल्ला दिला.दरम्यान शासकीय रुग्णवाहिकेतून आलेल्या रुग्णाला खाजगी वाहनाने घरी परत यावे लागले.यामुळे रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
 
 
गावातील वार्ड क्रमांक ४ मधील ३५ वर्षीय रुग्ण दीर्घकाळापासून आजारी असल्यामुळे शेजारच्यांना त्रास होवू नये किंवा रोगराई पसरू नये.यासाठी गावातील महिला मंडळाने पुढाकार घेवून आरोग्य अधिकाऱ्यांकडे हि बाब सांगितली. आरोग्य अधिकाऱ्यांनी याविषयी गावातील सरपंच विजय तडस ,पंचायत समिती सदस्य शेख इस्राइल,ठाणेदार श्री.निंबाळकर,महिला बचत गटातील महिलांशी बैठक घेवून रुग्णाच्या उपचाराबाबत कुटुंबातील सदस्यांना सल्ला दिला.दरम्यान कुटुंबातील सदस्यांनी उपचारासाठी नेण्यासाठी संमती दर्शविली.दरम्यान याविषयी पंचायत समिती सदस्य शेख इस्राइल यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याशी बोलणी करून रुग्णवाहिका पाठविण्याचे सांगितले.वेळीच दुसरे रूग्ण पोहचवायचे असल्याने दुसऱ्या दिवशी या रुग्ण महिलेला उपचारासाठी पोहचविण्याचे सांगितले.येथील रुग्णाविषयी प्रशासकीय पातळीपर्यंत माहिती गेल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरु झाला होता. मात्र जिल्हा रुग्णालयातून संबधित अधिकाऱ्यांनी कुठलेही दखल घेतली नसल्याने आल्या पावली उपचाराविना रुग्णासह कुटुंबातील सदस्यांना परतावे लागले या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.