5 ऑगस्टनंतरचा पाकिस्तान...

    दिनांक :15-Sep-2019
जम्मू-काश्मीरला (देशविघातक) विशेष दर्जा देणारे कलम 370 निष्प्रभ करून नरेंद्र मोदी सरकारने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. त्यातील बहुतांश पक्षी पाकिस्तानातील आहेत. हे कलम निष्प्रभ केल्यानंतर पाकिस्तानच्या ज्या वेळोवेळी प्रतिक्रिया आल्यात, त्यावरून पाकिस्तानमधीलच एक ज्येष्ठ राजकीय व त्यातल्या त्यात बरेचसे समतोल विश्लेषक नजीम सेठ यांनी पाकिस्तानचे वर्णन ‘मुंडके छाटलेले कोंबडीचे पिलू’ असे केले होते. अशा स्थितीत कुठे जावे आणि काय करावे, हेच पाकिस्तानातील सत्ताप्रतिष्ठानांना समजत नव्हते. तेव्हा नजीम सेठ यांची ही प्रतिक्रिया अतिरंजित वाटली होती. परंतु, आता एक महिन्याहून अधिक कालावधी गेल्यावर नजीम सेठ यांचे म्हणणे वास्तव वाटू लागले आहे.
 
 
 
 
एक गोष्ट नक्की की, भारताच्या या पावलानंतर पाकिस्तानला फार मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान सरकार व लष्कर हवालदिल झालेच आहेत; परंतु सर्वसामान्य जनतादेखील दिङ्‌मूढ झालेली आहे. 5 ऑगस्टनंतर पाकिस्तान टीव्हीवरील दररोज होणार्‍या विविध चर्चा ऐकल्यानंतर पाकिस्तानची ही अशी सैरभैर अवस्था स्पष्टपणे लक्षात येते. पाकिस्तान सरकार, मंत्री, लष्कराचे प्रवक्ते, सामान्य जनता यांच्या ज्या भारतविरोधी जहाल भाषेतील प्रतिक्रिया ऐकल्या की, त्यांनी उसने अवसान आणले असल्याचे लक्षात येते. या सर्व प्रतिक्रिया बाजूला ठेवून पाकिस्तानात गेल्या महिनाभरापासून जे विचारमंथन सुरू आहे, त्याकडे नीट लक्ष दिले तर ध्यानात येईल की, मोदी सरकारने हे जे पाऊल उचलले आहे त्याने नजीकच्या काळात पाकिस्तानचे घरगुती तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण पुरते बदलून जाणार आहे. तसे संकेत प्राप्त होत आहेत. हा बदल भारताच्या हिताचा असेल की नसेल, याचे उत्तर मात्र येणारा काळच देऊ शकेल.
 
 
सर्वप्रथम म्हणजे, भारत कलम 370 ला हातदेखील लावणार नाही, याची पाकिस्तानला ठाम खात्री होती. भारताने सुमारे 40 हजार अतिरिक्त सुरक्षा जवान काश्मिरात तैनात केले, काश्मिरातील पर्यटकांपासून वैष्णोदेवीच्या भाविकांना तत्काळ राज्याबाहेर काढले इत्यादी घटना घडत असतानाही, पाकिस्तानला कलम 370 ला मोदी सरकार हात लावेल, असे स्वप्नातही वाटले नाही. भारत हे सर्व करीत असताना, पाकिस्तानची शक्तिशाली आयएसआय गुप्तचर संघटना काय करत होती? तिला या डावपेचाचा सुगावा का लागला नाही? असे प्रश्न पाकी नागरिक विचारू लागले आहेत. काहींनी तर असाही आरोप केला की, हे सर्व पंतप्रधान इम्रान खान यांना माहीत होते आणि त्याने भारताशी सौदा केला आहे. अमेरिकेत जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामार्फत हा सौदा झाला आहे. आधीच सर्वसामान्य पाकी जनता अमेरिकेला आपला शत्रू मानते. त्यातच ट्रम्प यांनी काश्मीरप्रकरणी मध्यस्थता करण्याची तयारी दाखविली आणि नंतर जी-7 परिषदेच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या हो ला हो लावून मध्यस्थतेची काही गरज नसल्याचे जाहीर केले. यातून पाकिस्तानी जनतेचा संशय बळावला आहे. लोक अजूनही इम्रान खान यांना, किती पैसे घेतले, असे प्रश्न विचारत असतात.
 
 
दुसरा धक्का असा बसला की, काश्मीरबाबत पाकिस्तानची बाजूदेखील ऐकून घ्यायला जगातील (तुर्कस्तान व चीन सोडला तर) एकही देश तयार नाही. मदत तर सोडाच, कैफियत ऐकूनही घ्यायला तयार नाही. पाकिस्तानी जनतेला बाकी जगाकडून इतकी आशा नव्हती, जितकी आखाती देशांकडून होती. सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात इत्यादी देशांकडून आपली पाठराखण होईल, याची त्यांना खात्री होती. परंतु, तिकडून सहानुभूतीचा एक शब्दही आला नाही. उलट, हा भारताचा अंतर्गत मामला आहे, असे उत्तर मिळाले. तेव्हा मात्र पाकिस्तानी जनता बावचळून गेली. याचे कारण, पाकिस्तानी जनता या अरब देशांशी भावनिकदृष्ट्या जुळली गेली आहे. या अरब देशांना ते ‘उम्मा’ (मुस्लिम बंधुभाव) मानतात. या अरब देशांच्या मर्जीवर आतापर्यंत पाकिस्तानी जनता नाचत आली आहे. अरब देशांचा शत्रू इस्रायल आहे म्हणून पाकिस्तानही इस्रायलला पाण्यात पाहतो. या अरब देशांनीदेखील पाकिस्तानचा वापर आपल्या सेवेसाठी करून घेतला आहे. त्याबदल्यात त्यांना भरमसाट पैसाही दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानला अरब देशांकडून खूप आशा होत्या. मोदींच्या एका चालीने या सर्व आशा धुळीस मिळाल्या. आता पाकिस्तानी जनता ‘उम्मा’ वगैरे प्रकार अस्तित्वातच नसतो, प्रत्येक देश आपलाच स्वार्थ बघत असतो वगैरे म्हणू लागली आहे. या अरब देशांचा भारताशी कोट्यवधी डॉलर्सचा व्यापार असल्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या हिताआधी आपला स्वार्थ पाहिला, अशी भावना पाकिस्तानात व्यक्त होत आहे.
 
 
तिसरा धक्का म्हणजे पाकिस्तानी लष्कराकडून झालेला अपेक्षाभंग. प्रत्येक पाकिस्तानी आपल्या लष्कराला जगातील श्रेष्ठ लष्कर मानतो. आण्विक अस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि सुमारे आठ लाख कडवे जवान यांच्या भरवशावर आपण भारताला कधीही नमवू शकतो, असा एक विश्वास त्यांच्या मनात निर्माण करण्यात आला आहे. भारतासोबतची चार युद्धे पाकिस्तान हरला नसून, राजकीय नेतृत्वाने मध्येच कच खाल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराला माघार घ्यावी लागली, असेच प्रत्येक पाकिस्तानी जनतेत ठसविण्यात आले आहे. त्यामुळे कलम 370 निष्प्रभ करून काश्मीर राज्याचा दर्जा एका केंद्रशासित प्रदेशाचा केल्यानंतर आपले लष्कर तत्काळ काहीतरी कारवाई करून भारताला नमते घेण्यास भाग पाडेल, याची प्रत्येक पाकिस्तानीला जवळजवळ खात्री होती. परंतु, तसे काहीही झाले नाही. पण, तरीही अजूनही कुणीही पाकिस्तानी आपल्या लष्कराला दोष देत नसल्याचे दिसून येते. त्यांचा सर्व राग आता इम्रान खान आणि त्याच्या सरकारवर निघत असतो.
 
 
इम्रान खानचीही देशांतर्गत राजकारणात मोठी कोंडी झाली आहे. भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात टाकीन, असे वचन देत इम्रान खान सत्तेत आले. घोषणेनुसार त्यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व शाहीद खाकन अब्बासी तसेच माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली जरदारी यांना तुरुंगात टाकले आहे. नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम, सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती म्हणून तिलाही तुरुंगात डांबण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या या कृतीने पाकिस्तानातील विरोधी पक्ष बिथरले आहेत. ते कुठल्याही मुद्यावर इम्रान खानला सहकार्य करण्याच्या मानसिकतेत नाही. मध्यंतरी इम्रान खानने काश्मिरी लोकांना नैतिक िंहमत देण्यासाठी शुक्रवारी 12 ते 12.30 सर्व पाकिस्तानी जनतेने रस्त्यावर उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्याची या विरोधी पक्षांनी यथेच्छ खिल्ली उडविली आणि हा कार्यक्रम कसा फसेल असेच प्रयत्न केले. म्हणजे, जो मुद्दा पाकिस्तानच्या यच्चयावत्‌ जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा होता, त्या काश्मीर मुद्यावरदेखील विरोधी पक्ष इम्रान खानला सहकार्य करण्यास तयार नाहीत.
 
अचूक वेळ, अचूक डाव
इकडे भारतानेही कलम 370 निष्प्रभ करण्याची खेळी खेळण्यासाठी जी वेळ निवडली, ती अत्यंत अचूक अशी होती. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था भिकेला लागली आहे. चीनचा वन बेल्ट वन रोड प्रकल्प अधांतरी असल्यातच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान जगभर भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहेत. युद्ध झालेच तर त्याचा खर्च पाकिस्तानला झेपणार नाही, अशी स्थिती आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत जगभर सतत दौरे करून पाकिस्तानविरुद्ध असे काही वातावरण निर्माण केले आहे की तो अगदी एकाकी पडला आहे. इतका एकाकी की, 5 ऑगस्टला कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर पाकिस्तान अरब देशांकडे मदतीची भीक मागत होता आणि संयुक्त अरब अमिरात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशात सन्मानाने बोलावून त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल करत होता. हे म्हणजे पाकिस्तानच्या जखमेवर तिखटमिश्रित मीठ चोळणेच झाले. पाकिस्तानी जनतेला खरेच काय करावे, हे समजेनासे झाले आहे. सारे जग आपल्या इतके विरोधात कसे काय गेले, याचाच ती विचार करत आहे.
 
 
यालाही कारण आहे. कारण, आतापर्यंत पाकिस्तानात कुठलेही सरकार असो, त्यांनी जनतेला सतत भ्रमात ठेवण्याचेच काम केले. काश्मीर हा तर या सरकारांचा हुकुमाचा एक्काच होता. काहीही झाले की काश्मीर प्रकरण उकरून काढायचे आणि लोकांच्या भावना भडकावून आपले ईप्सित साध्य करून घ्यायचे. हे सर्व सरकारांनी व लष्कराने केले आहे. ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ याचेच स्वप्न त्यांना आतापर्यंत दाखविण्यात आले. एक दिवस काश्मीर पाकिस्तान बनेल, या आशेवर पाकिस्तानी जनतेने 60-70 वर्षांपासून प्रसंगी अर्धपोटी राहून, तसेच गरिबी, अशिक्षण, बेरोजगारी, सर्वसामान्य नागरी सुविधांचा अभाव सहन केला आहे आणि आता अचानक ते स्वप्नच भंगले आहे.
 
 
अशा रीतीने चोहोबाजूने भ्रमनिरास झालेली पाकिस्तानी जनता आता एका वेगळ्या दिशेने विचार करण्यास प्रवृत्त होत आहे. याचे संकेत दिसू लागले आहेत. काश्मीर तर हातातून गेलाच आहे. आता भारत, पाकिस्तानचे अस्तित्वच संपवेल की काय, अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळे आता भारताशी संबंध चांगले केले पाहिजे. पाकिस्तानला या गर्तेतून केवळ भारतच काढू शकतो आणि त्यासाठी त्याला शरण जाणे, हाच एक मार्ग आहे, असे विचार लोकांच्या चर्चेतून व्यक्त होताना दिसत आहेत. काही लोक मात्र, काहीही झाले, अगदी आपण नष्ट झालो तरी भारताकडे मैत्रीचा हात पुढे करायचा नाही, या विचारांचे आहेत. परंतु, कालांतराने त्यांच्याही विचारांत परिवर्तन होईल, अशी आशा आहे. इतक्या वर्षांची तयार करण्यात आलेली मानसिकता बदलायला वेळ जाऊ द्यावा लागेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मिळत असलेला मानसन्मान पाकिस्तानी जनतेला सतत खुपत असतो. असा सन्मान पाकिस्तानला का मिळत नाही, याच्यावर आता विचारविमर्श सुरू झाला आहे. काहींच्या मते, अमेरिका पाठीशी असल्याशिवाय हे शक्य नाही आणि अमेरिका आपल्याला अनुकूल असण्यासाठी अमेरिकेतील अतिशय शक्तिशाली व प्रभावी ज्यू लॉबी आपल्या बाजूने हवी, हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. परंतु, पाकिस्तान तर इस्रायलला आपला, भारतानंतर क्रमांक दोनचा शत्रू मानतो. आता त्यांच्यात विचार सुरू झाला आहे की, पाकिस्तानने इस्रायलकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. त्यांच्याशी राजनयिक संबंध सुरू केले पाहिजे. यासाठी ते अरब देशांचा दाखला देतात. ज्या अरब देशांमुळे पॅलेस्टाईनसाठी आपण इस्रायलशी वैर घेतले, तेच अरब देश आता इस्रायलशी संबंध वाढवत आहेत. त्यामुळे आपणही आपली जुनी भूमिका बाजूला ठेवून जागतिक स्तरावर नव्याने आखणी केली पाहिजे. असा विचार प्रबळ होताना दिसत आहे. थोडक्यात, पाकिस्तानने त्याच्या निर्मितीपासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर जी धोरणे राबविली, त्यापासून फारकत घेण्याची वेळ, नरेंद्र मोदी यांनी कलम 370 निष्प्रभ करून आणली आहे. अर्थात, हे सर्व कुठल्याही पाकिस्तानी सरकारला करणे इतके सोपे नाही. पाकिस्तानी जनतेला समजावून सांगून त्यांना या बदलांसाठी तयार करावे लागणार आहे. परंतु, याशिवाय पाकिस्तानला दुसरा पर्याय नाही.
 
 
सारांश, आपल्याच देशातील एका घटक राज्याला उर्वरित देशाशी अधिक एकात्म करण्याच्या अत्यंत धाडसी निर्णयाने, अन्‌ तोही रक्ताचा एकही थेंब न सांडवता, शेजारील कट्‌टर शत्रू देशाला त्यांची देशंातर्गत व आंतरराष्ट्रीय धोरणे बदलविण्यास भाग पाडणारी घटना जगाच्या इतिहासात विरळीच म्हणावी लागेल. ही घटना केवळ ऐतिहासिकच नाही, तर भारताच्या अर्वाचीन इतिहासात नरेंद्र मोदी व अमित शाह यांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहिणारी आहे. इकडे भारतातील विरोधी पक्ष जागेवर कितीही माती उडवत असले, तरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हे करून दाखविले आहे. याची जगाने नोंद घेतली आहे आणि जर पाकिस्तानने आपली धोरणे बदलून भारताशी असलेला काही दशकांपासूनचा ताणतणाव व रक्तरंजित संघर्ष संपुष्टात आणला, तर मोदी-शाह यांची नावे जगाच्या इतिहासातही अमर होतील, यात शंका नाही!
 
•श्रीनिवास वैद्य
9881717838