विनोबांचे विचारपाथेय...

    दिनांक :15-Sep-2019
विदर्भातील ऋषितुल्य विनोबा भावे यांच्या जयंतीचे 125 वर्ष 11 सप्टेंबरपासून सुरू झाले. विनोबा आचार्य कुळीचे. अध्ययन आणि अध्यापनाचा हा मूळ िंपड, म्हणूनच आचार्य. विनोबांनी शंकराचार्य, ज्ञानदेव आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे ऋृण सदैव जोपासले. या विचाराच्या सूक्ष्म अवलोकनातून त्यांनी ‘साम्यसूत्र-अभिधेय परम’ अशी परमसाम्यांची एक क्रांतिकारी अभिनव संकल्पना जगाला दिली. 108 साम्यसूत्रे सांगत, एक सच्चा समन्वयवादी विचार अन्‌ विचारांना एक नवी दिशा दिली.
 
 
 
विनोबा म्हणजे ज्ञानतपस्वी. त्यांच्या ज्ञानगंगेचा ओघ वर्धेच्या आश्रमातून, उपनिषदे, शंकराचायार्र्ंचे गीताभाष्य, गीताप्रवचने यातून सतत प्रवाही व्हायचा तो त्यांच्या प्रवचनातून! विनोबांचे बोलणे वैशिष्ट्यपूर्ण. सहज सोपं पण तेवढंच भारदस्त अन्‌ अर्थवाही. त्यांची विद्वत्ता, त्यांचं शब्दप्रभुत्व अन्‌ अनपेक्षित वाटणारा एक वेगळाच गहन विचार ते चिकित्सकपणे मांडत असत. संशोधन, शोधन कलेचा त्यांचा स्थायी स्वभाव ‘हंसपुरुषा’प्रमाणे होता.
 
 
पण, आपल्या आत्मनिवेदनात विनोबा विनम्रपणे म्हणतात- ‘‘मी मूळचा फार कठोर मनुष्य आहे. मी एक ओबडधोबड पाषाण आहे. या पाषाणाला शंकराचार्यांनी मजबूत केले, गांधीजींनी त्यावर कारागिरी करून त्याला आकार दिला. पण, माझ्या जीवनाला आणि हृदयाला कुणी गोडी आणली असेल आणि या पाषाणातून पाणी काढण्याचा, त्याला पाझर फोडण्याचा पराक्रम कुणी केला असेल तर तो मात्र ज्ञानदेवानेच!’’
 
 
विनोबांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते जे बोलले तेच ते स्वत: जगलेत. त्यांनीच सांगितलेल्या स्थितप्रज्ञातील दर्शनानुसार. या स्थितप्रज्ञ आचार्याने, लोकशिक्षकाने दोन निष्ठा समाजामध्ये जागवल्यात. गीतेत म्हटल्याप्रमाणे, ‘लोकेस्मिन द्विविधा निष्ठा:’ एक ज्ञाननिष्ठा अन्‌ दुसरी कर्मनिष्ठा.
 
 
विनोबांची अथांग ज्ञाननिष्ठा म्हणजे त्यांनी निर्माण केलेले अक्षरलेणे. वेद, उपनिषद, रामायण, शांकरभाष्य, भागवत, संत वाङ्मय, कुराणसार, ख्रिस्तधर्म आणि गीताई व गीताप्रवचने किती सांगितले अन्‌ तेही किती अनाग्रही वृत्तीने. गीताईच्या 269 आवृत्त्या निघाल्यात, गीता प्रवचनाची 23 भाषांमध्ये रूपांतरे व्हावीत! हे सगळे चतुरस्र लिखाण केवळ संग्राह्यच नाही, तर अक्षय मार्गदर्शन करणारे साहित्य म्हणजे ‘सा विद्या या विमुक्तयेत’ या धारणेचे आहे. कारण विनोबा स्वत: म्हणत की, ‘गीताई’ आणि ‘गीताप्रवचने’ करताना मी समाधिस्थ होतो!
 
 
अगदी संक्षेपाने ही ग्रंथसंपदाच बघा- ‘महाराष्ट्रधर्म यातील उपनिषदावरील प्रदीर्घ लेख’ एक प्रातिभदर्शन आहे. याचे महाराष्ट्रधर्म या मासिकातून 222 लेख प्रसिद्ध झाले. पैकी निवडक चाळीस लेखांचे सुरेख प्रारूप म्हणजे ‘मधुकर’: वेदाचे अध्ययन करून ‘ऋृग्वेदसार’ लिहिले. यात विनोबांनी निवड करून 250 ऋृषींचे मंत्र असून त्यात 19 स्त्रियांच्या मंत्रांचा समावेश आहे. ‘अष्टदिशी’ हा ब्रह्मसूत्रांत शंकराचार्यांच्या उपनिषदातील भाष्यावरील हा ‘सारग्रही ग्रंंथ’ आहे. विनोबांनी एकादशस्कंदातील 306 श्लोक निवडून ‘भागवत धर्मसार’ तयार केले. ‘एकनाथांच्या भागवताने’ गीतेच्या दुधात मधाची भर घातली, हा विनोबांचा अभिप्राय प्रसिद्धच आहे! याशिवाय कारावासात असताना, ज्ञानदेवांची भजने, तुकारामांच्या अंभगांची निवड करून संतांचा प्रसाद, एकनाथांची भजने, रामदासांची भजने तयार केलीत. रामदासांचे मनाचे श्लोक त्यांना अपौरुषेय वाटायचे!
 
 
विनोबांच्या ज्ञानदातृत्वाचा परीघ इतका व्यापक नि सर्वस्पर्शी आहे की, त्यांत गुरुनानकांचा ‘जपुजी’ ग्रंथ म्हणजे गुरुवाणीचा हरिपाठच! आसामचे शंकरदेव, माधवदेव, संतपुरुष त्यांचे ‘नामघोषसार’ तसेच शंकराचार्यांच्या निवडक चारशे श्लोकांचे ‘गुरुबोधसार’ आणि प्रसिद्ध ‘एकादशव्रते’ ही ग्रंथसंपदा म्हणजे अभ्यासकांसाठी देणगीच! कुराणातील सारभूत 1065 वचनांचे कुराणसार, ख्रिस्तधर्मसार, बुद्धाच्या धम्मपदांची रचना, जैन धर्मीयांचे समणसूत्र ही सगळी प्रेरक ज्ञानसंपदा विनोबांचे केवढे अपूर्व ज्ञानभंडार आहे!
 
 
विनोबांनी लिहिलेले ‘स्वराजशास्त्र’ आणि ‘परमसाम्य’ हे मुळातून वाचायला हवे. विनोबांनी विचारांचा एक नवा ‘पॅराडाईम’ विचार सूत्ररूपाने मांडला आहे. ‘परमसाम्या’ची कल्पना अनेक दृष्टीने विचारवंत महत्त्वाची नि वैशिष्ट्यपूर्ण मानतात. परमसाम्य कल्पनेत प्राप्तव्यवादी (साध्यवादी) आणि कर्तव्यवादी (साधनवादी) अशा दोन्ही प्रकारच्या अन्वयाची अपेक्षा विनोबांना आहे. स्वराज्यशास्त्रातही राजनीती लोकनीतीकडे विनोबा नेतात. विनोबांनी समाजातील ‘तिसर्‍या’ शक्तीला म्हणजे सज्जन शक्तीला प्रबोध शक्ती दिली. समाजावर सत्ता असावी, सत्तेेतून समाजपरिवर्तन होते, असे मानणारा गट म्हणजे ‘सत्ताधारी.’ दुसरा याच्या विरुद्ध विचाराचा, पण सत्तालोलूप असलेला गट म्हणजे ‘सत्ताकांक्षी’, ज्याला आपण विरोधी पक्ष म्हणू. पण, हे दोन्ही गट मर्यादित प्रमाणातच समाजपरिवर्तन घडवू शकतात. खरे समाजपरिवर्तन समाजातील ‘तिसरी शक्ती’ म्हणजे सज्जन शक्तीचा समाज! जो सत्तानिरपेक्ष, पैसानिरपेक्ष राहतो तसेच खरे परिवर्तन घडवतो, तो ‘स्वराज्य’ प्राप्त करतो, असे विनोबांचे सारगर्भ सांगणे आहे.
 
 
एके ठिकाणी विनोबा स्वत:बद्दल सांगताना म्हणतात- ‘‘मी ‘सुप्रीम सिमेिंटग फॅक्टर’ आहे, कारण मी कोणत्याच पक्षात नाही. सर्व पक्षांमध्ये जे सज्जन आहेत त्यांच्यावर माझे प्रेम आहे. जी व्यक्ती हृदय-परिवर्तनाच्या प्रक्रियेने क्रांती होईल असे काम उचलेल, ती एका देशाकरताच नव्हे, तर सगळ्या देशाकरिता ‘सिमेंिंटग फॅक्टर’ होईल. मी लुई पाश्चरचे एक चित्र पाहिले होते. त्याच्या खाली एक वाक्य लिहिले होते-‘‘मी, तुमचा धर्म काय आहे, हे जाणून घेऊ इच्छित नाही. तुमची मते काय आहेत, तेही जाणून घेऊ इच्छित नाही. केवळ तुमची दु:खे काय आहेत हेच जाणून घेऊ इच्छितो. ती दूर करण्याकरिता मदत करू इच्छितो! माझाही असाच प्रयत्न असतो.’’
 
 
विनोबा जसे अथांग ‘ज्ञानयोगी’ होते तसेच ते अद्वितीय ‘कर्मयोगी’ होते. विनोबांच्या प्रज्ञेने आणि प्रतिभेने नेहमीच ‘पुढचे’ पाहिले. समाजाला सजग केले. जागृतीची ध्वजपताका आपल्या रुंद खांद्यांवर घेऊन त्यांनी तेरा वर्षे पदयात्रा करून भूदानयज्ञाचे आंदोलन केले. लोकांच्या गरिबीचे, विषमतेचे मूळ विनोबांना भूमीच्या विषम वाटपात दिसले. तेलंगणातील पोचमपल्ली या गावातून त्यांनी भूदानयात्रेला प्रारंभ केला. जी जी गोष्ट ईश्वर वा निसर्गनिर्मित आहे, त्यावर मानवाने आपला अधिकार सांगणे हा केवळ अहंकार आहे. यामुळे ‘सर्व भूमी गोपाल की’ हा भूदानाचा महामंत्र बनला.
 
 
भूमिवाटपाच्या समग्र पुनर्रचनेची निकड विनोबांना दूरदर्शित्वाने आकळली. विशेष असे की, याच वेळेला कम्युनिस्टांनी आंध्रात 1940 पासूनच भूमी आंदोलन छेडले होते. सामंतशाहीविरुद्ध भूमिहिनांची, दलित-पीडितांची, शोषित-वंचितांची जी चळवळ उभी केली होती त्याला क्रांतीचे उग्र रूप प्राप्त झाले होते. संघर्ष आणि िंहसाचार वाढला होता, पण प्रश्न संघर्षातून, िंहसाचारातून सुटणारा नव्हता, हे विनोबांनी ओळखले. विनोबांनी भूमिका घेतली की प्रश्न संघर्षातून, वर्गसर्ंघषातून नव्हे, तर वर्गनिराकरणातून सुटेल. समता साधेल ती साम्यवादातून नव्हे, साम्ययोगातून समविभागाणीने होईल. भूमीचे वितरण एकाचे बळकावून दुसर्‍याला देणे या प्रयोगातून नव्हे, तर दानातून होईल. हा या भूमीचा, प्राचीन काळापासून चालत आलेल्या, परंतु विस्मृत झालेल्या सनातन तत्त्वज्ञानाचा विचार त्यांनी नवा आशय व नव्या संदर्भाने मांडला.
भूदान, ग्रामदान, संपत्तिदान या चढत्या क्रमाने या दानयज्ञातून त्यांनी अखिल भारताला ‘ईशावास्य वृत्ती’चे कार्यप्रवण असे प्रयोग दिले. ईशावास्य वृत्तीची भारत पुन्हा एकदा प्रयोगभूमी बनली, ती केवळ विनोबांमुळे! तरुण भारतचे आद्य संपादक कै. भाऊसाहेब माडखोलकरांनी याच अर्थाने विनोबांना ‘भौमर्षी’ असे सार्थपणे म्हटले होते.
 
 
या ‘भौमर्षी’ने सतत तेरा वर्षे पदयात्रा करून एक क्रांती घडविली. लोकांना सशस्त्र संघर्षाने नव्हे, तर हृदयस्थ भावनांना आवाहन करून, दानाचे महत्त्व पटवून देऊन, परावृत्ती जागवून, अंत:करणातील भक्ती फुलवून, स्वामित्वाचे नवे दर्शन, नवा आलोक, नवा संदर्भ विनोबांनी समाजाला दिला. सर्वोदयाच्या खर्‍या तत्त्वज्ञानाला कर्मभूमीचे अधिष्ठान देऊन सिद्ध केले. केवढे महान कार्य नि केवढे कठीण पण अभिनव कार्य विनोबा करत होते.
 
 
भूदान चळवळीप्रमाणेच विनोबांनी एक अपूर्व कार्य केले ते म्हणजे चंबळच्या डाकूंचे हृदयपरिवर्तन आणि त्यांचे आत्मसमर्पण. या शापित पुत्रांची कहाणी अशीच दुनियेला धक्का देणारी! डाकूगिरीस प्रवृत्त झालेल्या चंबळघाटीच्या या शापित पुत्रांना विनोबांनी जीवन जगण्याची एक नवी दृष्टी दिली, दृष्टिकोन दिला. विनोबा म्हणायचे, मी डाकूंच्या नव्हे तर सज्जनांच्या क्षेत्राकडे जात आहे. विनोबा म्हणायचे, आपण सगळेच बागी, बंडखोर. फक्त प्रत्येकाची बंडखोरी वेगवेगळी आहे. बंडखोरी ही आत्म्याच्या शक्तीने करता आली पाहिजे, शस्त्रांच्या नव्हे! प्रेम, करुणा आणि निर्भयता हीच शक्ती तुम्ही शापित पुत्रांनी संपादावी! विनोबांचे केवढे हे धीरोदात्त मार्गदर्शन होते. याचा परिणाम म्हणजे, कितीतरी डाकू आत्मसमर्पण करते झाले. विनोबा काश्मीरच्या पदयात्रेत होते. फाशीची शिक्षा झालेला डाकू तहसिलदारिंसह नैनी जेलमधून पत्र पाठवितो आणि बाबांच्या दर्शनाची अंतिम इच्छा व्यक्त करतो. विनोबांकडून तो न्यायाची अपेक्षा करतो, शासनदरबारी मध्यस्थीची अपेक्षा करतो. काय आहे या ‘न्याया’मागे? ही केवळ व्यक्तिगत भूमिका नाही, तर या न्यायाच्या मागणीमागे एक सामाजिक न्यायाची अपेक्षा डाकू तहसिलदारिंसह व्यक्त करतोय्‌!
 
 
विनोबा म्हणायचे, सज्जनांचे क्षेत्र हे डाकूग्रस्त का झाले त्याची कारणे शोधा. शोषक आणि शोषित, ही विकृती निर्माण करणारी कारणपरंपरा शोधा ,ती कारणे दूर सारा. आज दिल्लीतही सफेदपोश डाकू आहेत, नफेबाज व्यापारी हादेखील डाकूच आहे. असे सांगून विनोबा, खोट्या सभ्यतेचा बुरखा परदाफास करायचे. आत्म्याच्या विशुद्ध शक्तीने समस्येचे निराकरण करण्याची दृष्टी विनोबांनी या सार्‍यांना दिली.
 
 
भूदानामधील भूमिसुधाराची भूमिका असो, की डाकूंच्या आत्मसमर्पणाची, राष्ट्राचे एक सामाजिक मन नव्या दिशेने सुधारणा करणारे विनोबा नि त्यांची अद्भुत किमया याने जग विस्मित झाले.
 
 
जगातील विचारवंत आणि पत्रकारांनी भारताकडे धाव घेतली. विनोबांच्या पदयात्रेत, प्रवचनात ते सामील झालेत. विनोबा नावाचा हा संत, योगी, प्रेषितांचे काम कसे करतो, क्रांतिकारी प्रेरणा देतो, ते प्रत्यक्ष स्वसाक्षीने नोंदविते झाले, हे या चळवळीचे बोलके मौन होते. त्यामुळे त्याच्या भविष्यातील यशापयशाचा, चिकित्सेचा, मूल्यमापनाचा प्रश्न हा अलहिदा ठरला.
 
 
विनोबांनी वरील दोन कार्यांप्रमाणेच तिसरे महान व मूलगामी कार्य केले ते म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचे. केवळ आत्मज्ञान वा केवळ विज्ञान अशी एकांंगी भूमिका घेणार्‍या या जगाला विनोबांनी एक समन्वयवादी नवं तत्त्वज्ञान दिलं. परमसाम्याची उकल करून एक द्वंद्व व द्वैताच्या निराकरणाची नवी दिशा दिली. या संदर्भात निरिश्वरवादी जॉफ्रे ऑष्टर्गार्ड या तत्त्ववेत्त्याची प्रतिक्रिया खूप मार्मिक आहे. तो म्हणतो, ‘‘या संदर्भात अधिक विचार केल्यानंतर मला असे जाणवले की, सर्व संकल्पना नीट समजावून घ्यायच्या असतील, तर त्या भारतीय अध्यात्माच्या चौकटीतून समजावून घेणे आवश्यक आहे. व्यक्ती, समाज, निसर्ग आणि सारी सृष्टी यांचे अंत:स्थ नाते आहे. त्यातील एकात्म भावनेची जी धारणा आहे ती तात्त्विक असून विनोबांनी त्या धारणेचा एक नवा अन्वय लावला आहे, हे विशेष!’’
 
 
विनोबा मानवाच्या प्रगतीचे टप्पे सांगत. अन्नं ब्रह्मेति, प्राणो ब्रह्मेति, मनो ब्रह्मेति, विज्ञानं ब्रह्मेति आणि आनंद ब्रह्मेति, या उत्क्रांतीच्या अवस्था मानव जगतो. विनोबांना आत्मज्ञानाच्या अनुशासनात ‘विज्ञान’ अभिप्रेत आहे. तसे प्रयोग, ते दर्शन जे मनाच्या पातळीच्या वर उठून ‘विज्ञान-ब्रह्मेति’ नि नंतर ‘आनंद ब्रह्मेति’ ही अनुभूती प्राप्त करतील तीच खरी प्रगती, तोच खरा विकास!
 
 
‘आनो भद्रा क्रतवो यन्तु विश्वत:’च्या प्रार्थनेप्रमाणे, त्यांनी प्रत्यक्ष चरितार्थ केले. मराठी भाषेला आणि साहित्याला ज्ञानदेवांनंतर, ज्ञानदेवांच्या प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी ‘गीताई’ आणि ‘गीताप्रवचने’रूपाने एक देशीकार लेणे चढविले. भारतातीलच नव्हे, तर जगातील प्रमुख भाषा आत्मसात करून अमर, अक्षर अशा साहित्याची निर्मिती केली. त्यांचं साहित्य म्हणजे अमृताचे कल्लोेळ नि प्रातिभदर्शन घडविणारे विदग्ध! म्हणूनच विनोबा व्यक्तिरूपाने आज आपल्यात नसले, तरी बोधरूपाने त्यांचे साहित्य एक चिरंतनाचे पाथेय ठरते. अशा या चिरंतनाचे पाथेय देणार्‍या या आनंदयात्रीला 125 व्या जयंतिनिमित्ताने शत शत अभिवादन!
••
• डॉ. कुमार शास्त्री