वैनगंगेत तरुणाने घेतली उडी, दक्ष नागरिकांमुळे वाचले प्राण

    दिनांक :16-Sep-2019
देसाईगंज,
काही दिवसांपूर्वी देसाईगंज शहरातील एका तरुणीने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच त्याचप्रकारची घटना घडली आहे. काल रविवारी (१५ सप्टेंबर) दुपारी एका तरुणाने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच असलेल्या तरुणांनी हे पाहताच त्याचे प्राण वाचविण्यासाठी प्राणांची पर्वा केली नाही त्यामुळे त्याचे प्राण वाचले असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

 
  
देवेंद्र करसुंगे असे या युवकाचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही कामानिमित्त तो देसाईगंज येथे आला असता कौटुंबिक व आर्थिक गोष्टीला कंटाळून देवेंद्र करसुंगे याने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु घटनास्थळावरून जात असलेल्या अमोल पेंदाम व आसिफ शेखानी या दोन तरुणांना देवेंद्र नदीपात्रात उडी घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच देसाईगंज पोलिसांना घटनेची माहिती दिली व त्या दोन तरुणांनी तात्काळ देवेंद्रला वाचविण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु नदीपात्रात उडी घेणे शक्य नसल्याने त्यांनी देसाईगंज शहरातील हेटी वार्डमधून सरळ नदीपात्र गाठले व इतक्यात देवेंद्र हा पाण्याच्या प्रवाहात वाहून येताना दिसताच त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान पाण्याच्या प्रवाहात उतरून देवेंद्रला ओढत पाण्याच्या बाहेर काढले. इतक्यात देसाईगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले व देवेंद्रला आपल्या ताब्यात घेऊन तात्काळ ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे उपचारार्थ दाखल केले.
 
 
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी देसाईगंज शहरातील रेल्वे भूमिगत पुलाखाली एका वेडसर महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला होता त्याघटनेत सुद्धा अमोल पेंदाम या तरुणाने सर्वप्रथम मदतीसाठी धाव घेऊन त्या महिलेला रुग्णालयात पोहोचविण्यात सहकार्य केले होते. अश्या या धाडसी व शौर्य तरुणावर शहरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.