सोनं लकाकतंय

    दिनांक :16-Sep-2019
शुध्दता, लकाकी, लवचिकता, दीर्घकाळ आहे त्या अवस्थेत राहण्याचा गुणधर्म या आणि अशा बर्‍याच गुणवैशिष्ट्यांमुळे सोनं हा एक मौल्यवान धातू अशी ओळख राखून आहे. अगदी पूर्वीपासूनच सोन्याच्या संचयाचा संबंध सधनता आणि संपन्नेतेशी जोडला जातो. व्यक्तीपासून वैश्विक पातळीपर्यंत हा संदर्भ लागू पडतो हे विशेष. सोन्यामधली गुंतवणूक उत्तम परतावा मिळवून देते शिवाय समाजातली पत वाढवण्यासाठी सोन्याची मालकी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 
 
 
 
म्हणून सोनेखरेदीकडे व्यापार्‍याप्रमाणेच सर्वसामान्यांचाही मोठा ओढा असतो. हौसेपोटी दागदागिने खरेदी करणार्‍यांपासून या बाजारात गुंतवणूक करणार्‍या मोठ्या व्यापार्‍यांपर्यंत सर्वांच्याच निर्णयावर या बाजारातल्या घडामोडींचा थेट परिणाम पडत असल्यामुळे सोन्याच्या दरातला चढउतार हा नोंद घेण्याजोगा मुद्दा ठरतो. या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराणमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ होणं हा सध्याचा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा बनला आहे. कच्चं तेल आणि सोन्याच्या भावाचा परस्परांशी निकटचा संबंध आहे. अमेरिकेतल्या फेडरलसह अन्य बँका आणि अमेरिकन सरकारमधल्या तणावामुळे लोक आता सोन्यामध्ये गुंतवणूक करायला लागल्याने त्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोने आणखी महागण्याची शक्यता आहे.
 
आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यातल्या तणावाचा सरळ परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे भारतात सोनं 37 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम या दरावर पोहोचण्याची शक्यता आहे. सोनं 1500 डॉलरच्या पुढे गेलं तर पुढच्या वर्षी या दरात आणखी 10 टक्के वाढ होऊ शकते. त्यामुळे 2020 मध्ये सोनं 39,000 ते 41,000 रुपये प्रती दहा ग्रॅम या दरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा कल लक्षात घेता सोन्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा जास्त असण्याची शक्यता आहे.