ब्रम्हपुरीतील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी २४.९८ कोटी रुपये मंजूर

    दिनांक :16-Sep-2019
माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या प्रयत्नांना यश.
ब्रम्हपुरी,
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत ब्रम्हपुरीतील वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर मागील ऑक्टोबर महिन्यापासून मागणी करत आहेत. सदर मागणीला अखेर आता यश आले आहे. दि.११.०९.२०१९ रोजी झालेल्या राज्य समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून यासाठी २४.९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
 
मागली ३ ऑक्टोबर २०१८ रोजी माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी नागपूर तेलंगखेडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात मुख्य अभियंता यांची भेट घेऊन ब्रम्हपुरी नगर परिषद क्षेत्रातील वाढीव पाणी पुरवठा योजने बाबत सविस्तर चर्चा केली होती. वाढीव पाणीपुरवठा योजनेची फाईल नागपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात प्रलंबित होती, व ती फाईल पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्यवर्ती नियोजन संकल्प चित्र व सनियंत्रण कक्ष, कोपरी, ठाणे (पूर्व) यांच्या कडे त्वरित पाठविण्याचे सांगितले होते. या संबंधी माजी आमदार देशकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली होती. अखरे देशकर यांच्या या मागणीला यश आले आहे. सदर योजनेत इनटेक वेल, रॉ वॉटर पंपिंग मशीन, ५.५० एमएलटी क्षमता असलेले वॉटर ट्रीटमेंट प्लांट, शहरातील सर्व प्रभागात नव्याने पाणीपुरवठा पाईपलाईन व अन्य बाबींचा समावेश आहे यामुळे ब्रम्हपुरी वासीयांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे.