नप उपाध्यक्षांची आमदारांच्या घरासमोर शिविगाळ

    दिनांक :16-Sep-2019
गोंदिया,
येथील नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या निवासस्थानासमोर रविवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास शिविगाळ केली. तसेच शर्मा यांनी कर्तव्यावर असलेल्या होमगार्डलाही शिविगाळ केल्याने या प्रकरणात त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 


 
तीन वर्षांपूर्वी शिव शर्मा यांनी आमदार अग्रवाल यांच्यावर एका हॉटेलात केलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यातील वैर सर्वांनाच माहिती आहे. असे असतानाच आता आमदार अग्रवाल हे भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असल्याने व आपली दावेदारी, याच रागातून शिव शर्मा यांनी आमदार अग्रवाल यांच्या घरासमोर जाऊन रविवारी रात्री शिविगाळ केली असावी अशी चर्चा शहरात आहेत. घटनेच्या वेळी आमदार अग्रवाल घरी नव्हते. त्यांचे कुटुंबीय घरी असताना हा प्रकार घडला. घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड धिरज याने शिव शर्मा यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता शर्मा यांनी त्यालाही शिविगाळ केली. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच आ.अग्रवाल यांचे समर्थक त्यांच्या निवासस्थानासमोर गोळा झाले. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी होमगार्ड धिरज यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी शिव शर्मा याच्याविरुध्द भादंविच्या कलम ३५३, २९४, ५०४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गवते करीत आहेत.