पुरामुळे आयुष्य उध्वस्थ झालेल्यांना आरमोरीतील गृहिणींचा 'मदतीचा हात'

    दिनांक :16-Sep-2019
 
दौलत धोटे
आरमोरी,
यंदाचा संततधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे भामरागड येथील कित्येक नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. काही लोकांना खायला अन्न नाही तर अंथरूण-पांघरूण यासाठी पुरेसे कपडे पण नाहीत. या गंभीर बाबीची दखल घेत आरमोरी येथील शक्तिनगर, लक्ष्मी वसाहत, आयडिया टावर व ताडूरवार तयेथील काही महिलां गृहिणी एकत्र येऊन, भामरागड पूरग्रस्तांसाठी खारीची मदत व्हावी यासाठी, वार्डात घरोघरी फिरून प्रत्येक घरातून स्वइच्छेने मिळेल ते अन्नधान्य, राशन, साहित्य, कपडे व पैसे गोळा केले. 

 
 
महिलांनी गोळा केलेले साहित्य भामरागड येथील पूरग्रस्तांना तहसिलदार मार्फत आज पाठवण्यात आले. याकरिता सौ.विद्या चौधरी, सुरेखा फुलबांधे, गीता राऊत, कल्पना सिडाम, सुमित्रा चिळगे, अंजू सहारे, मनीषा दामले, अर्चना ढोबळे या होतकरू महिला गृहिणीनी प्रत्येक घरातून मिळेल ती मदत घेऊन तहसीलदार आरमोरी यांच्या आपत्तीग्रस्त पुरवठा वाहनाने सदर अन्नधान्य, राशन, साहित्य व निधी प्रशासनाला सुपूर्द केला. शक्तिनगर, लक्ष्मी वसाहत, आयडिया टावर, या परिसरातून जवळपास ७ हजार रुपये व २२ पूरग्रस्त किट ची मदतीचा हात म्हणून भामरागड पूरग्रस्तांना पाठवण्यात आली आहे.
 
याप्रसंगी गृहिणी म्हणाल्या की, कितीही आस्मानी संकट भामरागड वासीयांना आले असले तरी, त्यांनी खचून जाऊ नये. आरमोरी येथील महिला गृहिणी आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीर उभ्या आहेत. त्यामुळे भामरागड वासीयांना संयमाने धीर ठेऊन परिस्थितीचा सामना करावा, आम्ही आपल्या सोबत आहोत. यानंतरही वेळीच लागलेली मदत आरमोरी येथील महिलां गृहिणीकडून पुरवण्यात येईल.