धारणीत वीज पडून 10 जखमी

    दिनांक :17-Sep-2019
एकावर अमरावतीत तर चौघांवर धारणीत उपचार
धारणी,
मंगळवारी दुपारी धारणी जवळ वीज पडून 10 जण जखमी झाल्याने एकच खळबळ माजलेली आहे. कुसूमकोट गावानजीक एका झाडाखाली उभ्या असलेल्या 10 जणांवर वीज पडली. पन्नालालला गंभीर अवस्थेत अमरावतत स्थलांतरित करण्यात आले तर ग्रामसेवक  प्रितम मावस्करसह इतर तिघांवर धारणीतच उपचार सुरु आहे.
धारणीपासून 4 किमी अंतरावर 17 सप्टेंबर मंगळवारी 1 वाजताच्या दरम्यान आकाशात मेघ दाटून आले तर विजेचा कडकडाट सुरु होऊन पाऊस पण पडू लागला होता. यावेळी कासमार, घुटी गावाकडून येणार्‍या युवकांनी वडाच्या झाडाखाली आश्रय घेतलेला होता. यावेळी 10 जण झाडाच्या आडोशात उभे असतानाच आकाशातून अचानक वीज झाडावर पडली. मोक्यावर उभे असलेले लोक फुटाण्यासारखे उडू लागले व जमिनीवर आदळले. अनेकांना जखमा झाल्या. पैकी 5 जण उपजिल्हा रुग्णालयात पोहचू शकले.
 
 
 
टिटम्बाचे ग्रामसेवक प्रितम मावस्कर (30) रा. धारणी, शैलेश देविदास आरोटकर (20) व दिनेश देविदास आरोटकर (27) रा. टिंगर्‍या, विश्वनाथ कुंजीलाल भार्वे (20) रा. घुटी तथा कासमार गावाचा पन्नालाल भिलावेकर (30) जखमी झाले तर इतर 5 जण किरकोळ जखमी झाल्याने मोक्यावरुन पळून गेले ते दवाखान्यात परतलेच नाही. यापैकी पन्नालाल भिलावेकर गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला अमरावतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
सप्टेंबर महिना अर्धा लोटलेला असला तरी पावसाचा कहर सुरुच आहे. तर जुलै महिन्यासारखे वातावरण होत असून मंगळवारी दिवसभर वीजेचा कडकडाट सुरु होता. विजेचा कडकडाट व नंतर पावसाची जोरदार हजेरी लागली. मात्र तासभरानंतर कडाक्याचे ऊन सुद्धा पडलेले होते. अशा तिरंगी वातावरणामुळे विविध प्रकारची रोगराई पसरण्याची शक्यता असते. धारणी तालुक्यातील नदी-नाले ओव्हरफ्लो झालेले असून सर्व तलावपण भरुन सांडवा वाहत आहे. तालुक्यात पाऊस सरासरी पेक्षा दुप्पट झालेला आहे. वीज पडल्याच्या घटनेमुळे धारणी, कासमार, टिंगर्‍या व घुटी गावात हळहळ व्यक्त होत आहे.