दुबईत अडकलेले २५ युवक सुखरूप परतणार

    दिनांक :17-Sep-2019
रोजगारासाठी दुबईला गेलेले २५ युवक सुखरुप
- जिल्हा पोलिसांची माहिती
- कायदेशीर प्रक्रियेनंतर १० दिवसात येणार परत
गोंदिया,
समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून तिरोडा तालुक्यातील २५ युवक दुबईत अडकल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, यासंदर्भात पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात तिरोडा पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते युवक सुखरुप असून, सुरु असलेल्या पाठपुराव्यामुळे कायदेशीर कारवाईनंतर येत्या १० ते १२ दिवसात ते युवक परत येणार असल्याचे पोलिस प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
 

 
 
तिरोडा येथील आर. जी. इन्सोलेंस प्रशिक्षण केंद्राचे राज सोनवने याने तालुक्यातील २५ युवकांना रोजगाराचे आमिष देऊन प्रत्येक ४५ हजार रुपये घेऊन मुंबईच्या सिगल इंटरनॅशनल कंपनीमार्फत १० सप्टेंबर रोजी दुबई येथील इंटरमास स्कॉयस्टार कंपनीत पाठविले होते. दरम्यान दुबईत गेल्यावर सांगितलेले काम न देता अन्य काम मिळाल्याने तसेच जेवन व राहण्याची आबाळ होत असून आपल्याला इथून काढा, असा संदेशाचा व्हिडीओ त्या युवकांनी माध्यमसमुहावर टाकला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीस अधीखक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात तिरोडा पोलिसांनी राज सोनवाने, मुंबईची सिगल इंटरनॅशनल कंपनी व दुबईच्या इंटरमास स्कॉयस्टार कंपनीशी संपर्क साधून चौकशी केल्यानंतर त्या युवकांना निवास व भोजणाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून त्यांना भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत दुबईच्या इंटरमॉस स्कॉयस्टार कंपनीशी बोलणी झाली असून त्यासाठी लागणारी पेनल्टी मुंबईची सिगल इंटरनॅशनल कंपनी भरणार आहे. येत्या १० ते १२ दिवसात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या युवकांना परत आणले जाणार आहे. दरम्यान, पोलीस युवकांचे कुटुंब, राज सोनवाने व दोन्ही कंपन्याच्या संपर्कात असून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.