भक्तांना समृद्ध करणारी यात्रा

    दिनांक :17-Sep-2019
बाबा अमरनाथ... म्हणजे भोेळा सांब शिवशंकर. भक्तांना अनेक संकटातून तारून नेणारा हा महादेव हिमालयात वास्तव्याला येतो. हिमालयातल्या गुहेत बर्फाचं शिवलिंग साकारतं. या बाबा बर्फानीचं दर्शन घ्यायला देशाविदेशातले भक्त काश्मीरमध्ये दाखल होतात. अमरनाथ यात्रा ही अत्यंत खडतर आहे. ती सुरू होत आहे. निसर्गाचा चमत्कार मानल्या गेलेल्या या शिवलिंगाच्या दर्शनासाठी अनेक फूट उंचीवर चढाई करावी लागते. अमरनाथ यात्रा पुण्यदायी समजली जाते. त्यामुळे खडतर असूनही भक्तमंडळी मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात. काश्मीरमधली वाढती अस्थिरता, अमरनाथ यात्रेकरूंवर होणारे हल्ले, या यात्रेवर असणारं दहशतीचं सावट या पार्श्वभूमीवरही भक्तमंडळी मागे हटत नाहीत. भगवान शंकरावर असणारा दृढ विश्वास आणि अमरनाथ यात्रेकरूंच्या रक्षणासाठी तैनात असणार्‍या जवानांच्या शक्तीवरील पूर्ण श्रद्धा भक्तांना या ठिकाणी खेचून आणते. एकमेकांच्या साथीने, ‘बम बम भोले’ म्हणत, एकमेकांना दिलासा देत ही यात्रा पूर्ण केली जाते. 
 
 
या यात्रेदरम्यान भक्तांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तब्येेतीच्या तक्रारी उद्भवतात. निसर्गाची आव्हानं असतात. उंच स्थानी ऑक्सिजनची कमतरता जाणवते. पण या सगळ्यांवर मात करत ही यात्रा पूर्ण करायची, असा चंग बांधून भक्तमंडळी रवाना झालेली असतात. प्रतिकुलतेतही त्यांचा निर्धार डळमळत नाही. जून-जुलै हा अमरनाथ यात्रेचा काळ. याच काळात हिमालयातल्या पवित्र गुहेत बर्फाला शिवलिंगाचा आकार मिळतो. या शिवलिंगाच्या दर्शनाची ओढ भाविकांना स्वस्थ बसू देत नाही. 
 
एकीकडे महाराष्ट्रात वारी सुरू आहे. तिकडे पुरीला जगन्नाथाची यात्रा सुरू आहे. प्रत्येकालाच आपल्या आराध्याला भेटण्याची आस लागली आहे. भगवंताला भेटण्यासाठी कोणी पायपीट करत आहेत तर कोणी हिमालयात चढाई करायला सज्ज झाले आहेत. परमेश्वर प्राप्तीसाठी किती संघर्ष करावा लागतो, हेच या यात्रांमधून दिसून येतं. देवाला प्रसन्न करुन घेणं सोपं नाही, त्याला प्रसन्न करुन घ्यायचं असेल तर भक्तांनाही थोडे कष्ट घ्यावे लागतात. भगवंताचं दर्शन वाटतं तितकं सहजसाध्य नाही, याचं प्रतीक म्हणजेच ही अमरनाथ यात्रा. आयुष्यात एकदा तरी या यात्रेला जावं. भगवंताच्या या पांढर्‍या शुभ्र, नैसर्गिक रूपाला डोळे भरून पाहावं, अशी इच्छा प्रत्येक शिवभक्ताच्या मनात असते. अमरनाथ यात्रेतला अनुभव ‘न भुतो न भविष्यती’ असा आणि भक्ताला समृद्ध करून जाणारा असतो यात शंका नाही.