अप्परचे ५, लोअर वर्धाचे ३१ दरवाजे उघडले

    दिनांक :17-Sep-2019
 पर्यटकांची गर्दी वाढली
मोर्शी/धामणगाव रेल्वे, 
विदर्भातील मोठे समजले जाणारे मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरण सध्या 100 टक्के भरले आहे. त्यामुळे मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता या धरणाचे आणखी 2 दरवाजे उघडण्यात आले. यापूर्वीच धरणाचे तीन दरवाजे उघडले होते. आता ही सं‘या पाचवर पोहचली आहे. तसेच वर्धा नदीवरच असलेल्या लोअर वर्धा धरणाचे (बगाजी सागर) 31 दरवाजे सोमवारी रात्री 12 वाजता उघडण्यात आले.
 
 

 
 
अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे हे 10 सेमीने उघडण्यात आले असून यातून 86 घन मीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी देखील गर्दी केली आहे.
 
अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या अप्पर वर्धा धरणात मागील दोन वर्षापासून पाण्याची पातळी खालावली होती. मोर्शी तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे जून महिन्यात पातळी अकरा टक्क्यावर येऊन पोहोचली होती. गेल्या तीस वर्षात या वर्षी प्रथमच अप्पर वर्धा धरणाची पाण्याची पातळी खालावली होती. कधीकाळी पाण्याखाली डुबलेली गावे धरणात पाणी नसल्यामुळे प्रथमच उघडी पडली होती. या पावसाळ्यात सुद्धा अप्पर धरण भरेल किंवा नाही अशी शंका परिसरातील नागरिकांना होती. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या कार्यक्षेत्रात येत असणार्‍या वर्धा, जाम, माडू, नळ, दमयंती या नद्यांना महापूर आला व अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याच्या साठ्यात दररोज वाढ होत गेली. त्यामुळेच अप्पर वर्धा धरण 100 टक्के भरले आहे.
 
दरम्यान वर्धा नदीवरच असलेल्या लोअर वर्धा (बगाजी सागर) या धरणाचे 31 दरवाजे पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोमवारी रात्री उघडण्यात आले. प्रत्येकी 3 सेमीने उघडण्यात आलेल्या या दरवाज्यातून 90 घनमिटर प्रतिसेंकदाने विसर्ग सुरू आहे. येथेही नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर दरवाजे उघडल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून हजारो पर्यटक पाण्याचा विसर्ग बघण्याकरिता येत आहेत.