विद्युत प्रवाहाने आदिवासी दांपत्याचा मृत्यू

    दिनांक :17-Sep-2019

नांदगाव पेठ,
मुलींच्या भेटीसाठी आलेल्या आई वडिलांचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे 6 वाजता उघडकीस आली. राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल नजीक असलेल्या हटवार यांच्या शेताच्या प्रवेश मार्गावर ही घटना उघडकीस आली असून नांदगाव पेठ पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दसरू आहाके (65), कमला आहाके (58) रा. चिखलार, मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे आहेत.
 

 
 
येथील शेतकरी नितीन हटवार यांच्या शेतामध्ये मृतकाच्या दोन मुली व जावई सोकारी म्हणून काम करतात. यातील एक जावई विजू धुर्वे हे एक वर्षांपासून याठिकाणी काम करतात तर दुसरे जावई राजू पंदराम हे गत आठवड्यापासून कामासाठी येथे आले होते. मंगळवारी पहाटे दोन्ही जावई शेतात फेरफटका मारत असतांना सासू सासरे पडलेल्या अवस्थेत दिसल्याने जावायांनी त्यांना झोपडीजवळ नेले, मात्र त्यांचे शरीर थंड पडल्याने व कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे शेतमालक नितीन हटवार यांना फोनवरून माहिती देऊन पाचारण केले. हटवार यांनी तातडीने नांदगाव पेठ पोलिसांना पाचारण केले व घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे कारण सांगून त्यांना उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले.
 
 
याबाबत नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, आम्हाला घटनेची माहिती मिळताच शेतात पोहचलो तेव्हा दोन्ही मृतदेह झोपडी जवळ होते. त्यामुळे नेमका विद्युत प्रवाहाचा धक्का हा झोपडीत लागला की, बाहेर हे सांगणे कठीण आहे. विद्युत विभागाला याबाबत माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.