अनिमिया आणि कुपोषण मुक्तीसाठीचा पोषण वॉक यशस्वी

    दिनांक :17-Sep-2019
ॲनिमिया व कुपोषण मुक्तीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड
गडचिरोली,
गडचिरोली जिल्हयातील पोषण अभियानाचा एक भाग म्हणून आणि कुपोषणमुक्त व अनिमियामुक्त गडचिरोलीचा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी जनजागृतीपर पोषण वॉक आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना युवा पिढीने गडचिरोली जिल्हा ॲनिमिया मुक्त व कुपोषण मुक्त करण्यासाठी हातभार लावून देशाला सुद्रूढ बनविण्यासाठी योगदान द्यावे असे आव्हान केले. यावेळी अतिरीक्त पोलीस अधिक्षक डॉ.मोहित गर्ग उपस्थित होते.
 

 
 
केंद्र शासनातर्फे समग्र पोषणावर आधारित पोषण अभियान कार्यक्रम चालवला जात आहे. त्यामध्ये सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा केला जातोय. यात संपूर्ण महिन्याभरात अंगणवाडी, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन, समाजात आरोग्य व योग्य पोषणाबाबत जाणीवजागृती करणे, अभियानात लोकांचा सहभाग वाढवणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गांधी चौकातून पोषण वॉकची सुरुवात सकाळी 8:30 वा. झाली. महिला रुग्णालयातील स्तनदा माता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरवात केली.  सदर पोषण वॉकचा समारोप कृषी महाविद्यालय , गडचिरोली येथे करण्यात आला. समारोप प्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे जगदिश मेश्राम यांनी पोषण वॉक मध्ये सहभागी झालेल्यांना पोषणाची शपथ दिली.