आणि 'ती' बस भिवापूर नाल्यावरच अडकली...

    दिनांक :18-Sep-2019
वर्धा,
वायगाव जवळ असणाऱ्या भिवापूर या गावातून आज सकाळी निघालेली मनसावळी ते वर्धा जाणारी बस सकाळची 5.45 वाजता निघणारी बस वर्धा ते हिंगणघाट या मार्गाचे काम सुरू असल्यामुळे भिवापूर मार्गे टाकण्यात आली. पण रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव व भिवापूरच्या मधोमध असणाऱ्या नाल्याला पूर आला. त्यामुळे त्या नाल्यावरच अडकून पडली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले तर कोणी मुलाखतीतुन बाद झाले आहे. 
 
 
खरं तर नाल्यावरील पुलांची उंची रस्त्यापेक्षा कमी असल्यामुळे थोडाही पाऊस पडला तर पुलावर पाणी साचते. हे दृश्य आणि वास्तव संपूर्ण ग्रामीण भागातून शहराला जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक रस्ताच्या पुलाचे असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे की कानाडोळा करणे सुरू आहे, हे मात्र कळेनासे झालेले आहे. एकीकडे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी वेगवेगळ्या व अनोख्या योजना देशात आखल्या जात असताना डिजिटल व्हिलेजकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही का? असा आक्षेपार्ह सवाल या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. निम्मे दिवसावरती विधानसभा निवडणुक येऊन पोहचली असून यात प्रत्येक पक्षाच्या वेगवेगळ्या आशीर्वाद यात्रा मत मागण्यासाठी काढल्या जात आहे मात्र ग्रामीण भागातील समस्येचा कळकळा यांना कळणार की नाही? यावर जनतेला विचार पडलेला आहे.
 
 
आजच्या सारख्या रोज भेडसावणाऱ्या परिस्तिथीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, काही विद्यार्थ्यांची आज परीक्षा होती तर काही मुलांचे प्रॅक्टिकल व मुलाखत, या सगळ्यांना आज महाविद्यालयात जाता आलं नाही. याकडे लक्ष द्यायला हवे अशी बसमधून रोज ये जा करणाऱ्या विद्याथ्यांची मागणी आहे.