अखेर 'या' गावातील घरे दिव्यांच्या प्रकाशाने उजळली

    दिनांक :18-Sep-2019
मंगरुळनाथ,
वाशीम जिल्ह्यातील प्रसिद्ध नाथपंथीय देवस्थानाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावरगाव येथील घरांमध्ये तीन दिवसांनंतर दिव्यांचा प्रकाश पडला आहे. अतिरिक्त भारामुळे रोहित्र जळाल्यामुळे मागील तीन दिवसांपासून गावाचा वीज पुरवठा खंडित होता. वीज वितरणा कंपनीच्या अधिकार्‍यांनी गावकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन आज बुधवारी सकाळी तातडीने वीज पुरवठा चालू करून गावकर्‍यांची अडचण दूर केली. 

 
 
सावरगाव कान्होबा येथील रोहित्र जळण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही काही महिन्याच्या अंतराने संबंधित रोहित्र अतिरिक्त भारामुळे बिघडून तब्बल तीन वेळा जळलेले आहे. यामुळे गाव पूर्णपणे काळोखात निघून गेले होते. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी अधिकार्‍यांनी सावरगाव कान्होबा येथील अवैध वीज चोरी आणि अनधिकृत हिटर, शेगडी यांचा अनिर्बंध वापर रोहित्र बिघाडास कारणीभूत असल्याचे सांगितले. सावरगाव कान्होबा येथील अनधिकृत वीज घेणार्‍या काही व्यक्तींवर विद्युत वीज वितरण कंपनीने कारवाईही केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
 
 
रोहित्र बिघडण्याचे मुख्य कारण हे अनधिकृतपणे धोकादायक पद्धतीने विजेच्या तारावर आकडे टाकून वीज घेणे हे असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी सहकार्य करावे तथा अनधिकृतपणे धोकादायक पद्धतीने सावरगाव कान्होबा येथील नागरिकांनी आकडे टाकून वीज घेऊ नये त्यामुळे जीवितहानी होण्याचे दाट शक्यता असल्याचे वीज वितरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.