राष्ट्रवादीचे नेते दीपक जयस्वालांची पोलिस कोठडीत रवानगी

    दिनांक :18-Sep-2019
चंद्रपूर, 
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैधपणे दारूतस्करी केल्याप्रकरणी अटकेतील चंद्रपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता दीपक जयस्वाल यांच्यासह दोघांना आज न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 
 
नागपूर महामार्गावरील वडगाव परिसरातील गजानन मंदिरासमोर दीपक जयस्वाल यांचे घर आहे. या घरासमोर असलेल्या त्यांच्या मालकीच्या वाहनतळावर एम. एच. 31-सीएम-6030 या क्रमांकाच्या वाहनातून दारूसाठा काढण्यात येत असून, त्याची इतरत्र साठवणूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळावर धाड टाकून 30 पेट्या देशी, तर 18 पेट्या विदेशी दारूसाठ्यासह एक कार असा एकूण 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी दीपक जयस्वाल यांच्यासह राजेश लहेरीया व राकेश चिल्लुरवार रंगेहाथ अटक करण्यात आली होती. आज बुधवारी पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर करीत आहेत.