भात पिकातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

    दिनांक :18-Sep-2019
 
पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखणे खुप महत्वाचे आहे. कधी कधी अन्नद्रव्यांची कमतरता आणि पिकावर आलेला रोग यामध्ये संभ्रम निर्माण होतो. अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे ओळखून पिकांच्या गरजेनुसार मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. भात लागवडीसाठी हेक्टरी 100 कि.ग्रॅ. नत्र, 50 कि.ग्रॅ. स्फुरद, 50 कि.ग्रॅ. पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस आहे. मुख्य अन्नद्रव्य पिकांना देतांना लागवडीच्या वेळी अर्धे नत्र, पुर्ण स्फुरद, पुर्ण पालाश द्यावे. उर्वरीत नत्रामध्ये 25 कि.ग्रॅ. नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी व 25 कि.ग्रॅ. लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे. उर्वरित नत्रामध्ये 25 कि.ग्रॅ. नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी व 25 कि.ग्रॅ. स्फुरद व 50 कि.ग्रॅ. पालाश याप्रमाणे रासायनिक खतांची शिफारस केलेली आहे. माती परिक्षण करून आलेल्या अहवालानुसार रासायनिक खतांचे नियोजन करावे. 

 
 • नत्राची कमतरता : भात पिकांची खालची पाने पिवळी व पिवळसर हिरवी होतात. रोपांची वाढ खुंटते, फुटवे कमी येतात, प्रत्येक लोंबीतील दाण्याची संख्या कमी होते. दाणे पुर्ण भरत नाही. शिफारशीपेक्षा जास्त नत्र दिल्यास पीक उंच वाढते व पक्वतेच्या वेळेस लोळते, पीक कडा करपा, करपा, तुडतूडा या रोग व किडीस बळी पडते.
 • स्फुरदाची कमतरता : फुटव्याची संख्या कमी होते, वाढ खुंटते, लोंबीतील दाणे रोगट दिसतात, पिकाचे पाने हिरवी दिसली तरी कमकुवत होतात व नेहमीपेक्षा जास्त उभट होतात, खोडाचा आकार बारीक, पानाच्या खालच्या भागावर निळसर झाक दिसते व जांभळे ठिपके दिसतात.
 • स्फुरदाची कमतरता : फुटव्याची संख्या कमी होते, वाढ खुंटते, लोंबीतील दाणे रोगट दिसतात, पिकाचे पाने हिरवी दिसली तरी कमकुवत होतात व नेहमीपेक्षा जास्त उभट होतात, खोडाचा आकार बारीक, पानाच्या खालच्या भागावर निळसर झाक दिसते व जांभळे ठिपके दिसतात.
 • पालाशची कमतरता : भात पिकाची पाने गडद हिरवी दिसतात. पानाच्या कडा व टोके प्रथम पिवळसर दिसून तो भाग करपतो, दाण्यांचा आकार लहान व गुणवत्ता कमी होते.
 • लोहची कमतरता : लोह कमी असल्यास भात रोपाची हरितद्रव्य तयार करण्याची शक्ती कमी होते, नवी पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो, शिरा हिरव्या राहतात, कोवळ्या पानांची वाढ थांबते.
 • झींक ची कमतरता : पाने तपकिरी किंवा जांभळट तांबड्या रंगाची दिसतात, पानाच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. रोपांची वाढ आणि फुटवे कमी येतात. झींकची कमतरता तिव्र असल्यास रोपे मरतात त्यामुळे उत्पादन कमी मिळते. पाणी साठणार्‍या जमिनीमध्ये झींकची कमतरता जाणवते.
 • मॅग्नेशिअमची कमतरता : भात रोपाच्या पानातील हरितद्रव्य कमी होते. कोवळी पाने पातळ व ढिसूळ बनुन सुकतात. शिरांच्या मधील जागेचा हिरवेपणा कमी होतो.
 • गंधकाची कमतरता : नवीन पानांना पिवळसरपणा येतो, पानांचा आकार लहान होतो. झाडांची वाढ खुंटते.
 • कॅल्शिअमची कमतरता : भात रोपामध्ये नत्र कमी उपलब्ध होते. झाडाला होणार्‍या पाण्याची उपलब्धता कमी होते. फुलोरा गळतो, शेंड्याची वाढ होत नाही.
 • ताम्र (तांबे) ची कमतरता : भात रोपांच्या पानांना पिवळसरपणा येतो, ताम्रचा तुटवडा तीव्र झाल्यास पाने गळतात, पानाच्या कडा वाळू लागतात.
 • बोरॉनची कमतरता : भात रोपाच्या पानाची टोके फिक्कट पिवळसर होतात. रोगट झाडे तपकिरी होतात व कोमेजतात. हरितद्रव्य कमी होण्याने पानाच्या देठापासून सुरू होवून टोकाकडे वाळत जाते. पाण्याची कमतरता असलेल्या जमिनीत या द्रव्याची कमतरता आढळते.
 • नत्रयुक्त खते देतांना घ्यावयाची काळजी : पाण्याच्या निचर्‍याव्दारे होणारा र्‍हास कमी करण्यासाठी नत्र खताची मात्रा विभागून द्यावी. शेतात सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. िंनबोळीयुक्त खतांचा वापर करावा. शक्यतो दाणेदार युरियाचा वापर करावा. जमिनीची धुप कमी करण्यासाठी उपाययोजना करावी.
 • युरिया ब्रिकेट्सचा वापर : नत्रयुक्त खतांचा पिकास अधिक काळ उपयोग होण्यासाठी युरिया ब्रिकेट्सचा वापर करावा. यामध्ये युरिया आणि डायअमोनियम फॉस्फेट तयार करावे. भात पिकासाठी 170 कि.ग्रॅ. प्रति हेक्टर या प्रमाणात वापर करावा.
• गणेश खेडीकर
• डॉ. एन.एस. देशमुख
• मनोज भोमटे
कृषि विज्ञान केंद्र, हिवरा, जि. गोंदिया