तीन महिन्यात 'या' मनमोहक तलावाचे पुनरूज्जीवन

    दिनांक :18-Sep-2019
- हजारो नागरिक, वन्यजीवाना होणार लाभ
भंडारा,
हिंदुजा फाऊंडेशनच्या अशोक लेलँडतर्फे सामाजिक बांधिलकी निधीतून भंडारा जिल्हयातील किन्‍ही-गडेगाव येथील तलाव पुनर्जिवित करण्यात आला. या मनमोहक तलावाचे तीन महिन्याच्या अल्प कालावधीत पुनरूज्जीवन करून तो गावकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आला. 
 
 
पुनरूज्जीवित झालेल्या तलावाचे जलपुजन व हस्तांतरणाचा छोटेखानी कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी भंडाराचे तहसिलदार अक्षय पोयाम, सरव्यवस्थापक एम.एन. लखोटे, उपाध्यक्ष टी. शशीकुमार तसेच हिंदुजा फाऊंडेशनचे संचालक नियती सरीन उपस्थित होते.
 
 
जलजीवन कार्यक्रमांतर्गत सीएसआर प्रकल्पान्वये या तलावाचे पुनरूज्जीवन करण्यात आले. मे 2019 मध्ये या तलावाच्या पुनरूज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले होते. अवघ्या तीन महिन्यात सुमारे 53 हेक्टर परिसरातील या तलावावर 60 लाख रुपये खर्च करून पुनरूज्जीवीत करण्यात आले. या तलावामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांसह वन्यजीव आणि प्राणी अभयारण्यालाही लाभ मिळेल. या तलावाच्या काठावर 500 वृक्षरोपटे लावण्यात आली आहेत. यामुळे पर्जन्यक्षमतेत 65 टक्के वाढ होणार आहे. यंदाच्या पावसाळयात याचा अनुभवही आल्याने परिसरातील शेतकरी आनंद व्यक्त करीत असल्याचे तहसिलदार अक्षय पोयाम यांनी सांगितले. एम.एन.लखोटे यांनी समाज व समाजातील घटकांसाठी पाण्याचे महत्व लक्षात घेता तलावाच्या पुनरूज्जीवनाचे लक्ष्य पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले.
 
 
या तलावाच्या निवडीने इएफआयने महत्वाची भूमिका वठविली. ही योजना दीर्घकाळ जलक्षमता कायम ठेवत उन्हाळयात पाणीसंकटाचा सामना करण्यास पुरेशी ठरेल असा दावाही त्यांनी केला. किन्‍ही-गडेगाव परिसरातील जवळपास साडेतीन ते चार हजार लोकसंख्येला याचा लाभ होणार असल्‍याचे अशोक लेलॅण्ड सीएसआरचे एचआर उपाध्‍यक्ष शशिकुमार यांनी सांगितले.