जनावरासाठी अपारंपरिक खाद्य

    दिनांक :18-Sep-2019
लकडे दुष्काळ वा अन्य कारणांनी जनावरांच्या चार्‍याची समस्या सातत्यानं ऐरणीवर येत आहे. आताही राज्यातील तीव्र दष्काळी स्थितीत पुरेशा चार्‍याअभावी जनावरांचे हाल होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता जनावरांसाठी अपारंपरिक खाद्याच्या वापराचा विचार गरजेचा ठरत आहे. विशेष म्हणजे खाद्याचा दर्जा कमी न करता किंवा त्याची गुणवत्ता ठराविक पातळीत ठेवण्याच्या दृष्टीने अपारंपरिक खाद्य घटकांचा समावेश करता येतो. अशाच काही प्रमुख अपारंपरिक खाद्य प्रकारांची माहिती घेऊ... 
 
 
बाभळीच्या शेंगा : बाभळीच्या शेंगा सर्वत्र आढळतात. त्या शेळ्या-मेंढ्या आवडीने खातात. या खाद्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने ते गुरांच्या आहारात पाच ते 10 टक्के वापरता येते. बाभळीच्या बियांमधील डिंकासारखा पदार्थ काढून टाकल्यानंतर त्यांचा खाद्य म्हणून वापर करता येतो. या बियांमध्ये 13.8 टक्के पचनीय प्रथिनं आणि 59 टक्के एकूण पचनीय पदार्थ असतात. या बियांचा दुभत्या गायीच्या खाद्यामध्ये 15 टक्क्यांपर्यंत वापर करता येतो. संकरित वासरांसाठी याचं प्रमाण 39-40 टक्के ठेवता येतं. यात टॅनीनचं प्रमाण पाच टक्के असतं.
 
विलायती किंवा वेड्या बाभळीच्या शेंगा : दळलेल्या शेंगांची पावडर किंवा पीठ जनावरांच्या आहारात 20 टक्के तर दुभत्या गायीसाठी 30 टक्के या प्रमाणात वापरतात. यामध्ये पचनीय प्रथिनांचं प्रमाण सात टक्के तर एकूण पचनीय पदार्थांचं प्रमाण 75 टक्के असतं.
 
 
चिंचेच्या बिया : टरफल काढून चिंचोक्यांच्या बियांचं पीठ पाण्यात काही वेळ भिजत ठेवावं. नंतर पाणी काढून गुरांना 20 ते 25 टक्के या प्रमाणात खाऊ घालता येतं. चिंचोक्याच्या गरामध्ये पचनीय प्रथिनं 1.26 टक्के तर एकूण पचनीय पदार्थांचे प्रमाण 63-65 टक्के असतं. तसंच यात कोणतेही अपायकारक घटक नसतात.
तरोटा बिया : तरोट्याची रोप सहसा जनावरं खात नाहीत. परंतु त्याच्या बिया उकडून दिल्यास गुरं सहज खातात. गुरांच्या आहारात याचा वापर 15 टक्क्यापर्यंत करण्यास हरकत नसते. यात प्रथिनांचं प्रमाण बरंच असल्यानं जनावरांना फायदा होतो.