अवघडलेल्या गर्भवतीची प्रसुतीसाठी 35 कि.मी. पायपीट

    दिनांक :19-Sep-2019
- भामगरागड तालुक्यातील लाहेरी येथील घटना

 
 
गडचिरोली, 
बाळंतपण हा स्त्रीचा पुर्नजन्मच असतो... शहरांत सुखवस्तू भागांत शिंक आली तरी दवाखाने अन्‌ डॉक्टर उपलब्ध असतात. मात्र, छत्तीसगढ- गडचिरोली जिल्ह्यांतील भामरागड सीमेवरील अतिदुर्गम भागांत राहाणार्‍यांनी काय करावे? छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातल्या उसेवाडा येथील मासे कादू दुर्वा या 28 वर्षीय गर्भवतीने अवघडल्या अवस्थेत तब्बल 35 किलो मिटर अंतर पायदळ चालून भामरागड तालुक्यातील लाहेरी आरोग्य केंद्र गाठले. हा प्रवासही काही सोपा नव्हताच.
 
घनदाट जंगल, रस्त्यांचा अभाव, पावसाळ्यात वाहणारे नदी, नाले ओलांडून पायपीट करत त्यांनी आरोग्य केंद्र गाठले. आरोग्य केंद्रात मात्र तिलाल तातडीने आरोग्यसेवा मिळाली. डॉक्टरांनी तिची सुटका केली. बाळ- बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.
 
 
भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. जंगलाच्या वाटेने पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे वाहतुकीची साधनेही जवळपास नाहीतच. एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी आहे. मात्र, रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात दुचाकीचा वापर करणे अशक्य होते. मासे दुर्वा ही गरोदर माता व तिचे कुटुंब पूर्णपणे निरक्षर आहे. गरोदरपणात जे आरोग्य कार्ड काढायला पाहिजे तेसुद्धा काढले नव्हते. यावरून तिने यापूर्वी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नसावी हे स्पष्ट होते. माडिया भाषेशिवाय तिला तिच्या कुटुुंबीयांना दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. प्रसुतीचा कालावधी जवळ आला होता. त्यामुळे एखाद्या आरोग्य केंद्रात भरती होण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांनी दिला. छत्तीसगडमधील रहिवासी असली तरी तिकडे जवळपास आरोग्य केंद्र नसल्याने तिच्यासाठी 35 किलोमीटरवर असलेले भामरागड तालुक्यातील लाहेरी आरोग्य केंद्रच जवळचे होते.
 
पूर्ण दिवस भरलेली गर्भवती, तिचा पती, आई, सासू व गावातील दोघांनी मिळूून पायदळच 35 कि.मी. अंतर गाठले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे, डॉ. संतोष नैताम यांनी तपासणी केली. 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री तिची सुरळीत प्रसूती झाली.