यथा दृष्टी तथा सृष्टी...

    दिनांक :19-Sep-2019
अंजली आवारी
 
आपल्या सभोवतालच्या घटना आपल्याला एक दृष्टिकोन प्रदान करीत असतात. एक असा दृष्टिकोन, ज्यातून आपण संपूर्ण जगाकडे बघतो. जेव्हा आपणास एखादा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा हाच दृष्टिकोन आपणास तो निर्णय घेण्यास मदत करीत असतो. पण, हा दृष्टिकोन तयार कसा होतो, यासाठी आपली दोन ज्ञानेंद्रिये कार्यरत असतात- एक, डोळे आणि दुसरे, कान. आपण ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहतो व कानांनी ऐकतो, त्यामुळे आपण एका विचाराची निर्मिती करीत असतो. हाच विचार आपल्या मनावर बिंबविला जातो व आपणास एक दृष्टिकोन मिळतो. 
 
 
एखादा दृष्टिकोन तयार होताना आपल्या आजूबाजूच्या घटना, आपले पूर्वग्रह, आपली विचार करण्याची पद्धत या गोष्टी जबाबदार ठरतात. एखाद्या घटनेबद्दल जो विचार आपण करीत असू तसाच विचार आपल्या आजूबाजूचे लोक करतीलच असं नाही. त्यामुळे जर आपणास दृष्टिकोन बदलायचा असेल, तर तो तयार करणार्‍या घटना बदलाव्या लागतील. जर आपण चांगलं ऐकलं, चांगलं बघितलं तर नक्कीच आपणास एक चांगला व होकारार्थी दृष्टिकोन मिळेल. जर आपणास बदल घडवून आणायचा असेल, तर तो आतून यायला हवा व त्यासाठी आपणास आपली विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपल्या सवयींमध्ये बदल घडवून आणला तरच आपण आपल्या विचारांची दिशा बदलवू शकतो.
 
 
आपल्या वेदांमध्ये एक सुुंदर उपदेश दिला आहे की, ‘यथा दृष्टी तथा सृष्टी.’ म्हणजे तुम्ही ज्या नजरेतून या जगाकडे बघता हे जग तुम्हाला तसंच दिसतं. ते जग कसं आहे, यापेक्षा ते तुम्हाला कसं हवं आहे, हे महत्त्वाचं ठरतं. त्यानुसार जर तुम्ही इनपुटस्‌ दिले तर ते तसंच तयार होईल, जसं आपणास हवंय्‌. आपण आपल्या मेंदूचं प्रोग्रािंमग कसं करतो, यावर सगळ्या गोष्टी ठरतात. आपल्या आयुष्यातील घटना व दिशा ठरतात.
 
 
एखादी कॅन्सरपीडित व्यक्ती आहे. जिला कळलं की, आपल्याला कॅन्सर झालाय्‌. आता आपलं आयुष्य येथेच संपलं. तर ते खरंच तेथेच संपेल. पण, याच्याविरुद्ध विचार करून कितीतरी लोक कॅन्सरवर मात करू शकले आहेत! संगण्याचे तात्पर्य हेच की, तुमचा एक विचार तुमचा दृष्टिकोेन बदलू शकतो व हाच दृष्टिकोन तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणूनच कुणीतरी म्हटलंय्‌-
 
‘‘अरे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे।
नजर बदलो नजारे बदल जायेंगे।
कश्ती को बदलने की जरूरत नही।
कश्ती का रूख बदलो, किनारे बदल जायेंगे।।’’