सात बहिणींनी दिला पित्याला खांदा; मुलाची उणीव काढली भरून

    दिनांक :19-Sep-2019
वरुड,
शहरातील पोस्ट ऑफीस परिसरात वास्तव्यास असलेले विठ्ठल सदाशिवराव लोखंडे यांचे वृद्धपकाळाने निधन झाल्यानंतर वृद्ध पित्याला खांदा देवुन, तिरडी पकडुन सातही मुलींनी मिळुन शहरातील नगरपरिषद मोक्षधाम येथे मुखाग्नी दिली. सर्व सोपस्कार पार पाडुन मुली सुद्धा मुलांपेक्षा सक्षम असल्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला.
 

 
 
प्राप्त माहितीनुसार, शहरातील विठ्ठलराव लोखंडे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांना ७ मुली असताना सुद्धा त्यांनी टेलर काम तसेच कबाडकष्ट करुन सातही मुलींचे पालन-पोषण करुन शिक्षण व नंतर सर्वच मुलींचे लग्नसमारंभ पार पाडुन वडीलांचे कर्तव्य पुर्ण केले. दरम्यान त्यांच्या पत्नीचे मृत्युनंतर त्यांची मुलगी ताई लोखंडे हिनेच वडीलांचे शेवटपर्यंत संगोपन केले. त्यांना कधीच एकटे सोडले नाही. अश्यातच ९२ वर्षीय विठ्ठलराव सदाशिव लोखंडे यांचे वृद्धपकाळाने सोमवारी निधन झाले.
 
 
 
त्यांना मुलगा नसल्याने शोभा सावरकर-नागपुर, पुष्पा कांडलकर-पुसला, ताई लोखंडे- वरुड, सुलोचना रोही-आकोट, माला हिवसे-रहिमापुर (चिंचोली), स्वाती साऊरकर-अमरावती व सुधा मावदे-अमरावती या सातही मुलींनी वृद्ध पित्याला खांदा देवुन नगरपरिषद मोक्षधाम येथे मुखाग्नी देत शेवटचा निरोप दिला. सर्व सोपस्कार पार पाडले. यावेळी विठ्ठल लोखंडे यांच्या सर्व जावायांनी सुद्धा मुलींना सहकार्य केले. अंत्ययात्रेत उपस्थित नागरीकांनी सातही मुलींचे कार्य अभिमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया देवुन मुली सुद्धा मुलांपेक्षा कमी नाही हा संदेश त्यांनी दिला असल्याचे सांगितले.
 
वडीलांनी आम्हाला सन्मानाने वागायला शिकविले. त्यांनी कायम आम्हाला भाऊ नसताना सुद्धा चांगली वागणुक व प्रेम दिले. जावाईं म्हणुन आमचे पती खांदा देतील पण आम्हाला त्यांनी दिलेले प्रेम आणि वागणुकीमुळे आम्ही सातही बहीनी देखील खांदा देवुन सर्व सोपस्कार पार पाडण्याचा निर्णय घेतला. आणि कुटुंबियांनी सुद्धा संमती दाखविली, असे ताई लोखंडे यांनी सांगितले.