...अन वाहत्या नाल्याकाठीच 'तिने' सोडला प्राण

    दिनांक :19-Sep-2019
आर्वी, 
देशाच्या शहरी भागात एकीकडे विकासाचे गुणगान गायल्या जात असले तरी ग्रामीण भागात मात्र मुलभूत सुविधे अभावी लोकांना नाहक आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातली विकासाची ही दरी लज्जास्पद प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस आहे. अशाच हलगर्जीपणामुळे आर्वी तालुक्यात एका मुलीला आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. आर्वी तालुक्यातील सावद(हेटी) येथे नाल्यावरून पाणी वाहत असल्याने सर्पदंश झालेल्या मुलीने उपचाराअभावी नाल्या काठीच प्राण सोडले. जयती गेंदालाल सोलंकी असे मृत मुलीचे नाव आहे.

 
जयतीला रात्रीच्या वेळी सर्पदंश झाला. हे लक्षात येताच कुटुंबियांसह गावकऱ्यांनी दवाखान्याकडे धाव घेतली. पण, नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी होते. पाण्यातून वाट काढता न आल्याने जयतीने नाल्याच्या काठावरच जीव सोडला. अखेर तिचा मृतदेहच घरी न्यावा लागला. या घटनेमुळे सोलंकी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सावद हेटी या वस्तीतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी नाला पार करावा लागतो. पावसाळ्याचा दिवसात अनेकदा या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडते. यासाठी अनेकदा मागणी करूनही या नाल्यावरील पुलाची उंची वाढण्यात आलेली नाही. या गावातून जवळपास २५ विद्यार्थी दररोज शाळेत जातात. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतच थांबाण्याची वेळ अनेकदा आली आहे. पावसाळ्यात मुले घरी परत येईपर्यंत आई-वडिलांचा जीव टांगणीला लागलेला असतो.
  
नाल्याच्या वरच्या बाजूला दहेगाव लघु धरण आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर पुलावरून पाणी वाहत राहते. दुसरा पर्याय नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दरम्यान, जयतीच्या मृत्यूने तरी निद्रिस्थ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जगतील का, असा संतप्त सवाल स्थनिक नागरिक प्रशासनाला करत आहेत.