सावरगाव शेतशिवारात कृषी पंप व केबल चोरांची टोळी सक्रीय

    दिनांक :19-Sep-2019
शेतकर्‍यामध्ये भितीचे वातावरण 
पोलिसांनी छडा लावण्याची मागणी
मंगरूळनाथ,
सावरगाव कानोबा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकरी शेतीला संचित करण्यासाठी विद्युत मोटर पंप आणि त्याला लागणारी शेकडो मीटरची थ्री फेज केबल वापरत असतो. अनंत अडचणींचा सामना करून या मौल्यवान वस्तू शेतकर्‍यांनी घेतलेले असतांना त्याच्यावर राजरोसपणे चोरांकडून डल्ला मारण्यात येण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
 
सावरगाव कानोबा येथील एका शेतकर्‍यांची दहा दिवसापूर्वी गावातीलच काही संशयितांनी केबल चोरली असल्याची तक्रार आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. सावरगाव कान्होबा, खापरी कान्होबा, साळंबी, जोगलदरी, कोळंबी, चिखला गड या व इतर गावांमध्ये लघु सिंचन विभागाचे प्रकल्प असल्यामुळे 80 टक्के शेती ही सिंचित केली जाते. शेतकर्‍यांनी आपल्या शेतीला ओलीत करण्यासाठी पारंपारिक कालव्यावर विसंबून न राहता नदी नाले आणि विहिरीद्वारे सिंचनाची सोय केलेली आहे. शेती सिंचन करीत असताना शेतकर्‍यांना आपसूकच विद्युत पंप विकत घ्यावा लागतो व हे विद्युत पंप चालवण्यासाठी केबल घेणेही तेवढेच गरजेचे असते. आजच्या घडीला बाजारामध्ये विद्युत मोटर ला लागणार्‍या केबल ह्या प्रचंड महाग आहेत आणि विद्युत मोटर उचलून नेणे कठीण असल्यामुळे चोर सहजसोपे असणार्‍या विद्युत केबल चोरून घेऊन जात आहेत. संबंधित चोरांना पकडण्यात आल्यास त्यांनी यापूर्वी केलेल्या विद्युत मोटर आणि केबल चोरीचे अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
 

 
 
सावरगाव कानोबा शिवारामध्ये मागील 10 सप्टेंबर रोजी विद्युत मोटर पंप केबल चोरीचा प्रकार घडला असून, येथील शेतकरी अनिल दयाराम चव्हाण यांनी आपल्या शेतामधील विद्युत पंपाला जोडलेल्या हजारो रूपये किमतीच्या मोटर केबल वायर गावातीलच आणि गावाच्या शेजारच्या एका व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार आसेगाव पोलिस स्टेशनला केली आहे. बहुतांश शेतकर्‍यांच्या शेतामध्ये विद्युत मोटर पंप आणि केबल लावलेल्या असून रात्रंदिवस शेतकरी हा शेतामध्ये राहत नसल्याने हेरून चोरटे केबल आणि मोटारीवर हात साफ करीत आहेत. अनेक शेतकरी चोरी झालेल्या प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशनला करीत नाहीत अशाच प्रकारची घटना सावरगाव कानोबा येथील विद्यमान सरपंच भिमराव इंगोले यांच्या बाबत ही घडलेली आहे.
सरपंच इंगोले यांनी आपल्या विद्युत मोटर पंपला लावलेली नवी कोरी केबलवर सुद्धा अशाच प्रकारे चोरांनी हात साफ केले. आसेगाव पोलिस स्टेशनला तक्रार करूनही पोलिस प्रशासन संबंधितांच्या तक्रारीला गंभीरतेने घेत नसून चोरटे अद्यापही मोकाट फिरत आहेत. केबल आणि विद्युत मोटर सोडणार्‍या चोरांना संशयितांना तात्काळ अटक करण्यात यावी जेणेकरून असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत अशी मागणी सावरगाव कानोबा आणि परिसरातील असंख्य शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.