शेअर बाजारात व्यवहार करताय?

    दिनांक :02-Sep-2019
 
अनेक नोकरदारांना शेअर बाजाराचं आकर्षण असतं. बरेचजण सहज म्हणून ‘इन्ट्रा डे ट्रेंडिंग’ करतात तर काही थोडीफार रक्कम गुंतवतात. ही रक्कम फार जास्त नसते. त्यांना यातून नफा किंवा तोटा होत असतो. पण ही गुंतवणूक फार गांभीर्याने घेतली जात नसल्याने तसंच यातून होणारा लघुकालीन किंवा दीर्घकालीन नफा त्यांच्या पगाराच्या तुलनेत नगण्य असल्यामुळे नोकरदार आयकर विवरणपत्र भरताना अशा व्यवहारांची नोंद करत नाहीत. या व्यवहारांचं त्यांच्या लेखी फार महत्त्व नसतं. त्यातच शेअर बाजारातल्या व्यवहारांमुळे अत्यंत सोप्या आयटीआर एक ऐवजी गुंतागुंतीचा आयटीआर दोन भरावा लागण्याची धास्तीही त्यांना असते. 

 
 
मात्र अशा प्रकारे शेअर बाजारातले व्यवहार उघड न करणं चुकीचं आहे. एका आर्थिक वर्षात करमुक्त मर्यादेपेक्षा म्हणजे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍यांनी शेअर बाजाराशी संंबंधित व्यवहार आयकर विवरणपत्रात नमूद करणं बंधनकारक आहे. गुंतवणूकदारांना नफा झाला काय किंवा तोटा झाला काय याबाबतचा उल्लेख आयटीआरमध्ये करायलाच हवा. अन्यथा, आयकर विभाग करदात्याला नोटिस पाठवू शकतो.
 
शेअर बाजाराशी संंबधित व्यवहार आयटीआरमध्ये उघड केल्याने करदात्याला बरेच लाभ होऊ शकतात. पण हे व्यवहार उघड न केल्यास भांडवाली नफा कर न भरल्याच्या कारणास्तव त्याला किंवा तिला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. शेअर्स किंवा शेअर्सशी संबंधित मालमत्ता किंवा फंडांच्या विक्रीवर होणार्‍या लघुकालीन भांडवली नफ्यावर 15 टक्के कराची तरतूद आहे तर एका आर्थिक वर्षात अशा मालमत्तेच्या विक्रीतून झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास 10 टक्के कराची तरतूद आहे.