अखेर उपद्रवी ई- 1 वाघीण जेरबंद

    दिनांक :02-Sep-2019
गोरेवाडी प्राणी संग्रहालयात रवानगी
 
अमरावती/ धारणी,
मानवी जीवितास असलेला धोका लक्षात घेऊन वनअधिकारी- कर्मचार्‍यांनी शर्थीने प्रयत्न करून ई-1 या वाघिणीला जेरबंद केले. आता तिची रवानगी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात केली जाणार आहे. या कामी वनविभागाला गोलाई येथील युवकांनीसुद्धा बरीच मदत केली.
यापूर्वी ही वाघीण ब्रम्हपुरी विभागातील वनक्षेत्रात वावरत होती. तिला मेअखेरीस जेरबंद करण्यात आले होते. तिच्या पुनर्वसनासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डोलार या गाभा क्षेत्रात मुक्त करण्यात आले. मात्र, मेळघाटातही तिचा लोकवस्तीनजिकच वावर राहिल्याने व तिच्यापासून धोका असल्याने या वाघिणीला वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार रविवारी सायंकाळी बंदिस्त करण्यात आले.
गाभा क्षेत्रात ही वाघीण दोन महिने मुक्तपणे वावरत होती. गाभा क्षेत्रात असतानाही या वाघिणीने लोकवस्तीनजिकच्या जंगलात राहणे पसंत केले. या वाघिणीने 30 ऑगस्ट रोजी दादरा येथील रहिवासी शोभाराम चव्हाण यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचे निधन झाले. त्यानंतर मृतकाच्या शोधार्थ गेलेल्या दिलीप चव्हाण यांच्यावरही वाघिणीने हल्ला करून जखमी केले. वनविभागाद्वारे शासकीय रुग्णालयाद्वारे दिलीप चव्हाण यांच्यावर उपचार होत आहेत.
 

 
 
केकदाखेडा येथील सात वर्षांच्या बालिकेवरही या वाघिणीने 2 जुलैला हल्ला केला होता. वाघिणीकडून झालेली मनुष्यहानी व संभाव्य जीवितहानी लक्षात घेऊन तिला जेरबंद करण्याची परवानगी वन्यजीव कार्यालयाकडून मिळाली. त्यानुसार वनविभागाने तत्काळ हालचाली करून पथक नियुक्त केले. हे पथक उपग्रह संकेत व प्रत्यक्ष अँटेनाकडून मिळणार्‍या माहितीनुसार तिचा मागोवा घेत होते. चंपाकली, लक्ष्मी, जयश्री या हत्तीणही तिच्या मागोव्यावर होत्या. रस्ते खराब असल्याने वन्यजीव विभागाचा ट्रक परत पाठवावा लागला. अखेर गोलाई गावातील युवक सुदाम गट्टे याने आपला ट्रॅक्टर दिला व तो स्वत:च चालविला. याच गावातील युवक कोंडीराम मुंडे, लक्ष्मण मुंडे, विष्णू मुंडे व विठ्ठल डाबक हे सुद्धा या मोहिमेत सामील झाले. 31 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता गोलाई गावाजवळ हे श्वापद वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 1 सप्टेंबरला सकाळपासून पशुवैद्यकीय अधिकारी, जलद बचाव कृती दल, मेळघाट व गुगामल अभयारण्याचे पथक यांनी जंगलात तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. जनावर बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन व आवश्यक उपकरणे घेऊन निघालेल्या या पथकाला दुपारपर्यंत तिचे अचूक स्थान कळले. त्यानुसार सर्वांनी तातडीने हालचाली करून वाघिणीला गाठले व तिला बेशुद्ध करण्यात आले. ही बेशुद्ध वाघीण तत्काळ पिंजर्‍यात बंद करण्यात आली. नंतर गोलाईच्या सुदाम गट्टे याच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून तिला वनविभागाच्या मोठ्या गाडीपर्यंत नेण्यात आले. जेरबंद झालेली ही वाघीण आता सुखरूप आहे. सोमवारी तिला गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाकडे पाठविण्याची तयारी सुरू होती.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी, विभागीय वनाधिकारी एच. एस. वाघमोडे, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी मोहिमेसाठी मार्गदर्शन केले. हिरालाल चौधरी, एस. बी. मोरे, डॉ. रश्मी गोखले, डॉ. सुबोध नंदगवळी, डॉ. चेतन पातोंडे, डॉ. शरद पलखाडे, संतोष कासदेकर, अमोल गावनेर, राजेश धिकार, मंगेश मावस्कर, मनीराम चतुरकर, तुलसीराम कासदेकर, जीवन दहीकर, संजय धिकार, श्रीकांत गवई, वैभव गुरव, फिरोज खान, आसिफ पठाण, मुकेश जावरकर, अनिल चिमोटे आदींनी मोहीम यशस्वी केली.