अमरावतीत गणरायाचे हर्षोल्हासात आगमन

    दिनांक :02-Sep-2019
ढोल-ताशांचा निनाद
मिरवणूकांनी वेधले लक्ष
 
अमरावती,
विघ्नहर्ता श्री गणेशाचे दरवर्षी प्रमाणे यंदाही धुमधडक्यात आगमन झाले. पारंपारीक वेशभुषेतले गणेश भक्त व ढोल-ताशा पथकांच्या निनादात आणि फटक्यांच्या आतषबाजीत अन् गुलालाची उधळण करीत गणरायाच्या मिरवणुका सोमवारी दूपारपासून निघाल्या. या मिरवणुकांनी सर्वांचे लक्ष वेधले. सांयकाळपर्यंत घराघरात आणि सार्वजनीक मंडळांमध्ये रात्री पर्यंत श्री गणेश विराजमान झाले होते. गणोशोत्सवाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण शहरासह जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
 

 
 
दरवर्षीच गणोशोत्सव येतो पण, यंदाच्या वर्षीच्या उत्सवाची सुरूवातच चैत्यनमय वातावरणाने झाली. सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागामध्ये गणेशाच्या आगमनाची लगबग सुरू होती. नेहरू मैदान, राजापेठ, दस्तूरनगर, गांधी चौक अशा विविध ठिकाणी लागलेल्या दुकानांमधून गणरायाच्या आकर्षक मुर्ती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे मातीच्या मुर्ती घेण्याला प्रत्येकांनीच प्राधान्य दिले. तसेच मुर्ती मातीची आहे की, नाही याची खातरजमा भक्त करीत होते. त्यांची ही तळमळ पाहून जनजागृतीचा प्रभाव जाणवत असल्याचे स्पष्ट झाले. मिठाई, हार, फुले, दुर्वासह अन्य पुजेचे साहीत्य मिळणार्‍या दुकानातही आज दिवसभर गर्दी होती. सांयकाळी 6 वाजेपर्यंत घराघरातले गणराय विराजमान झाले होते. दुपारी सार्वजनीक गणोशोत्सव मंडळांच्या आकर्षक मुर्तीच्या मिरवणुका सुरू झाल्या. प्रत्येक मिरवणुकीचे आपले एक वैशिष्ट होते. प्रत्येक मिरवणूकीत स्थानिक युवकांचे ढोलताशा पथक तर होतेच पण प्रत्येक पथकाची वाजवण्याची लय वेगळी होती. या पथकातील युवतींची उपस्थिती सर्वांना आश्चर्यकारक वाटत होती. प्रत्येक पथकाचे वेगळेपण नागरिकांचे लक्ष वेधत होते.
 

 
 
चिमुकल्याचे लेझीम पथक व लाल, भगवे, गुलाबी रंगाचे फेटे बांधलेल्या कार्यकर्त्यांचे थिरकणेही पाहण्यासारखे होते. फेटे बांधलेल्या महीलांचाही त्यात सहभाग होता. लक्षवेधणार्‍या मिरवणुकांमुळे श्री गणेशाच्या आगमनाचा आनंद द्विगणीत होत होता. श्री गणरायाची सुमधुर गाणी उत्सवाची रंगत अधिकच वाढवित होते. आझाद हिंद मंडळ, लक्ष्मीकांत गणेश मंडळ, निळकंठ मंडळ, श्री कृष्णपेठ मंडळ, श्री गणोशोत्सव मंडळ टोपेनगर, रुख्मिनी गणेशोत्सव मंडळ, राजकमल चौकातले युवा उत्कर्ष मंडळ यांच्यासह अन्य काही मंडळांच्या मिरवणुका लक्षवेधी होत्या. या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत बहुतांश मंडळांच्या मिरवणुका आटोपल्या होत्या. अमरावती शहरात यावर्षी पाचशेच्यावर गणेश मंडळांची नोंदणी झालेली आहे. तसेच ग्रामीण भागातही एक हजाराच्या आसपास गणेश मंडळांकडून गावागावांमध्ये गणेशाची स्थापना होणार आहे. त्यातल्या काही गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची झालेली तयारी पहाता जिल्हा प्रशासनानेही संभाव्य अनुचित प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातल्या मुख्य चौका-चौकात व मोक्याच्या ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष होते. वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली.