सर्वोच्च न्यायालयाचा चुकीचा ‘संदेश!’

    दिनांक :02-Sep-2019
दिल्ली दिनांक  
 
रवींद्र दाणी 
 
सर्वोच्च न्यायालयाने, कलम 370 ला आव्हान देणारी याचिका सुनावणीसाठी स्वीकृत केल्याने, आंतरराष्ट्रीय जगतात चुकीचा संदेश गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करूनच घ्वावयास नको होती. या याचिकेची सुनावणी होऊन ती फेटाळली जाणारच आहे. मात्र, तोपर्यंत काही आंतरराष्ट्रीय शक्तींना भारताच्या विरोधात प्रचार करण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय संसद ही सर्वोच्च आहे. संसदेला नवा कायदा करण्याचा, जुना कायदा बदलण्याचा, त्यात बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून संसदेने कलम 370 बाबत निर्णय घेतला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकालात काढावयास हवी होती. ते झालेले नाही. याची सुनावणी होणार आहे आणि तोपर्यंत भारतविरोधी शक्ती प्रचारही करणार आहेत.
 

 
 
अमेरिकेला चिंता
काश्मीरमध्ये अमेरिका हस्तक्षेप करणार नाही असे स्षष्ट करण्यात आल्यानंतर, केवळ तीनच दिवसांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरमधील घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकन कॉंग्रेसच्या काही सदस्यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे नवी दिल्लीस्थित अमेरिकन व ब्रिटनचे काही अधिकारी खोर्‍यातील स्थितीबाबत आपली चिंता वारंवार भारत सरकारकडे नोंदवीत असल्याचे समजते. खोर्‍यातील स्थिती सामान्य करण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावी, असे प्रतिपादन या दोन देशांकडून केेले जात आहे.
काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे. मात्र, त्याचे परिणाम सीमेबाहेर होत आहेत, असे विधान करून अमेरिकेने या प्रश्नावर मध्यस्थी करण्याची तयारी चालविली होती.
काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, हे अमेरिकेने मान्य केले. पण, त्याच वेळी भारताच्या निर्णयाचे परिणाम सीमेबाहेर होत आहेत असे सांगून, या प्रश्नाला नवा रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांनी अमेरिका हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले होते. त्या भूमिकेत आता पुन्हा बदल झाला असल्याचे दिसून येते.
नवा रंग
काश्मीर प्रश्नात धर्माचा मुद्दाही आहे, असे सांगत अमेरिकेने या मुद्याला नवा रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे. तोच धागा पकडून इराणने काश्मिरी लोकांनाही त्यांच्या अधिकाराचा वापर करता येईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. या बाबी भारतासाठी फार चांगल्या मानल्या जात नाहीत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्याला धर्माचा रंग देता कामा नये, असे अमेरिकेने म्हणावयास हवे होते. ते न होता, अमेरिकेने या मुद्याला धर्माचा रंग दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानशी दोन वेळा चर्चा केल्यावर अमेरिकेच्या भूमिकेत हा बदल झाला असल्याचे समजते.
काश्मीर खोर्‍यात असलेल्या संचारबंदीचे पाकिस्तान भांडवल करीत असल्याचे दिसते. यात काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे मोठी भूमिका बजावीत आहेत. अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रे, काश्मीर खोरे कसे ठप्प आहे, याचे वृत्त वारंवार देत आहेत. हा सारा अपप्रचार थांबण्यासाठी खोर्‍यातील स्थिती शक्य तितक्या लवकर सामान्य होणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. कारण, जोपर्यंत खोर्‍यातील स्थिती सामान्य होत नाही, पाकिस्तान व काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना भारताविरोधात प्रचार करण्याची एक संधी मिळत आहे. काश्मीर खोर्‍यात 3-4 ऑगस्टपासून, संचारबंदीचे वातावरण आहे. ते सौम्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने काही भागातील निर्बंध उठविण्याची घोषणा केली होती. मात्र, याचा गैरफायदा उठवीत स्थानिक लोकांनी हिंसाचार केल्यानंतर ती पुन्हा लावण्यात आली. हे सारे निर्बंध उठविले जाऊन खोर्‍यातील स्थिती सामान्य झाल्यास ती सरकारसाठी एक मोठी समाधानाची बाब ठरेल.
पाकिस्तानचा डाव
काश्मीर खोर्‍यातील संचारबंदी उठताच राज्यात हिंसाचाराची एखादी मोठी घटना घडवावी, असा डाव पाकिस्तानने रचला आहे. खोर्‍यात हिंसाचार झाल्यास, मग त्याकडे जगाचे लक्ष जाईल, हे पाकिस्तान ओळखून आहे. त्यामुळे, खोर्‍यासाठी येणारा काही काळ फार नाजूक राहण्याची शक्यता आहे. काश्मीर खोर्‍यात हिंसाचार घडवून आणण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे भारताच्याही लक्षात आले आहे.
अमेरिकेचे धोरण
अमेरिकेच्या काश्मीर धोरणाला प्रभावित करणारी सर्वात मोठी बाब अफगाणिस्तान असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेला अफगाणिस्तानमधून बाहेर पडावयाचे आहे. आणि त्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. पाकिस्तान यात अमेरिकेला पूर्ण सहकार्य करीत असल्याने, त्याच्या बदल्यात अमेरिकेने काश्मीर प्रकरणात दखल द्यावी, असे प्रतिपादन तो वारंवार करीत आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांच्या विधानांवरून ही बाब सहज लक्षात येत आहे. ट्रम्प यांनी आणखी एक विधान केले आहे. अफगाणिस्तानात दहशतवादाच्या विरोधात अमेरिका लढाई लढत आहे. अफगाणिस्तानपासून 7000 मैलांवर बसून लढत आहे. पाकिस्तान लढत आहे. मात्र, भारत त्यात सहभागी झालेला नाही. भारताने त्यात सहभाग दिला पाहिजे. ट्रम्प यांची ही भूमिका भारतासाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. विशेेषत: ट्रम्प यांनी काश्मीर मुद्याला दिलेला िंहदू-मुस्लिम वादाचा रंग, त्यांनी आणलेला अफगाणिस्तानचा पैलू चिंता जनक असा आहे. काश्मीरमधील स्थिती सामान्य होत आहे, अशी भारताची भूमिका असताना, खोर्‍यातील स्थिती कमालीची स्फोटक आहे, असे विधान ट्रम्प यांनी केले आहे, जे करण्याची आवश्यकता नव्हती. आज इराणने यावर भूमिका घेतली आहे. इराण हा भारताचा मित्र असूनही त्याने घेतलेली भूमिका फारशी चांगली नाही. उद्या आणखी काही मुस्लिम राष्ट्रे यात उडी मारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संबंध विकोपाला
काश्मीर मुद्यावरून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत. पाकिस्तानने भारताशी असलेले राजकीय संबंध कमी करीत, आपल्या राजदूतास माघारी बोलाविले आहे, व्यापारही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारताशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची स्थिती राहिलेली नाही, असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानाने केले आहे. याचा अर्थ, पाकिस्तानी लष्करास पूर्ण मोकळीक दिली जाईल काय? पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराचा मुकाबला करू शकत नाही ही बाब, 1965, 1971, 1999 या तिन्ही युद्धात सिद्ध झाली आहे. पाकिस्तानी लष्कराने काश्मीर खोर्‍यात जे अप्रत्यक्ष युद्ध सुरू केले आहे, त्याचा नवा अध्याय तो सुरू करू शकतो. पाकिस्तानसाठी एक सोयीची बाब म्हणजे काश्मीर खोर्‍यातील जनतेत त्याला काही प्रमाणात पािंठबा मिळत आला आहे. याचाच फायदा उठवीत त्याने आजवर काश्मीर खोरे पेटते ठेवले आहे. शिवाय या भागातील भौगोलिक स्थिती एवढी बिकट आहे की, त्या स्थितीचा फायदा पाकिस्तान उठवीत आला आहे. आता पाकिस्तानची नवी खेळी काय असेल, हे सांगण्याची गरज नाही. काश्मीर खोर्‍यात भारतीय सुरक्षा दलावर हल्ले करण्याची व्यूहरचना तो राबवीत आला आहे. आता त्यात तो बदल करू शकतो. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांचे प्राण जावेत, असे त्याला वाटते. त्यासाठी तो खोर्‍यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात घडवून आणण्याची योजना राबवू शकतो. याचे प्रत्यंतर नुकतेच आले आहे. अतिरेक्यांनी श्रीनगरमधील एका किराणा दुकानदाराच्या दुकानासमोरच त्याची गोळ्या झाडून नुकतीच हत्या केली. श्रीनगरातील कोणतेही दुकान उघडू नये, अशा धमक्या हिजबुलकडून येत आहेत. या दुकानदाराने आपले दुकान का उघडले, यासाठी त्याची हत्या करण्यात आली. यामुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण आहे. एका ट्रक चालकाला दगडाने ठेचून ठार मारण्यात आले. गुज्जर समुदायाच्या दोन भावांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्यात आले. सर्वत्र जनजीवन पूर्वपदावर येत असताना, काश्मीर खोर्‍यात मात्र दहशत कायम असावी, जनजीवन सामान्य होऊ नये, यासाठी आता दहशतवाद्यांनी नागरिकांना ठार मारण्याची नवी योजना हाती घेतली आहे.