गौरी विसर्जनाकरिता गेलेल्या चौघांचा नदीत बुडून मृत्यू

    दिनांक :02-Sep-2019
 
 
हिंगणघाट ,
विघ्न विनाशक गणरायाचे स्वागत करण्यात गुंतलेले हिंगणघाटकर आज दुपारी एका दुर्दैवी घटनेने पुरते हादरून गेले आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार,येथील रेल्वेउड्डाण पुलाखालील वणा नदीच्या तीरावर गौरीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन मुलांना जलसमाधी मिळाली. आज दुपारी 1 च्या सुमारास ही घटना गावात समजली आणि सर्वत्र एकच कल्लोळ निर्माण झाला.या दुर्दैवी घटनेत शास्त्री वॉर्डातील भगत परिवारातील तीन जीवांना आपला जीव गमवावा लागला.आज दुपारी रिया भगत(वय ३५),ही महिला आपली दोन मुले,शेजारी राहणारी मैत्रीण सौ दीपाली भटे (30) सर्व राहणार शास्त्री वॉर्ड हे सर्व गौरीचे विसर्जन करण्यासाठी रेल्वे उड्डाण पुलाखालील वणा नदीवर गेले.दरम्यान या महिला नदीच्या काठावर पूजाविधी करीत असतानाच मृतक रिया भगत हिचा मुलगा अभय हा नदीच्या पात्रात उतरला.अचानक त्याचा पाण्यात तोल गेला व तो गटांगळ्या खाऊ लागला.मुलगा पाण्यात बुडत आहे हे पाहून त्याच्या आईने व व बहीण अंजु पाठोपाठ दिपाली भटे यांनी नदी पात्रात धाव घेतली परंतु अंदाज न आल्याने या तिघीही पाण्यात पडल्या व नदीच्या प्रवाहात वाहत गेल्या.नदी किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरड केली परन्तु कोणतीही मदत न मिळाल्याने हे चारही नदीच्या प्रवाहात वाहत गेले.घटनास्थळपासून ५० फुटाच्या अंतरावर एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहत जात असल्याचे पोलिस शिपाई रामदास चकोले याला आढळून आल्याने त्याने खळाळत्या नदीच्या पात्रात उडी घेऊन वाहत जात असलेल्या रिया रणजित भगत हिला बाहेर काढले.सदर महिलेला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉकटरानी तिला मृत घोषित केले.अन्य तीन मृतदेह नदीच्या पात्रातून शोधण्यासाठी वर्धा येथून एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे.युध्द पातळीवर अन्य तीन व्यक्तीचा शोध घेतल्या जात असून सदर वृत्त देत पर्यन्त या तिघाचा शोध लागलेला नाही. सदर घटनेने संपूर्ण शहरात खळबळ निर्माण झालेली असून घटनास्थळी जनतेने मोठी गर्दी केली होती.हिंगणघाट पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. वर्धा जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला.