पिढ्यांमधील संघर्ष...

    दिनांक :20-Sep-2019
प्रा. मधुकर चुटे
 
 
आपल्या समाजात, पालकत्व म्हणजे पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणे आणि मागच्या पिढीच्या चुका माफ करणे. हे विधान कुठल्याही देशातल्या, कुठल्याही पिढीसाठी अगदी समर्थक यासारखे आहे. नवी पिढी निर्माण करत असताना एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे समाजाचा प्रवास सुरू होत असताना, मागचे मागे ठेवून पुढे पाहण्याची आणि त्याचसोबत आपल्या अनुभवामधून पुढच्या पिढीला सतर्क करण्याची मोठी जबाबदारी विद्यमान पिढीवर येते. ही जबाबदारी समजायला अनेकदा थोडा वेळ लागत असतो आणि तेव्हा सुरू होते ते दोन पिढीमधले द्वंद युद्ध! दोन पिढ्यांमधली तफावत ज्याला आपण सहजपणे जनरेशन गॅप असे म्हणतो, तीच घरातल्या कौटुंबिक स्वास्थ्याचा िंकवा अस्वास्थ्याचा पाया आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे वडील-मुलगा, आई-मुलगी आणि अगदी सासू-सुनेच्या नात्यावरही या तफावतीचा सर्वाधिक जास्त परिणाम झालेला पाहायला मिळत असतो. या दोन पिढ्यांमधले मतभेद आणि वाद सहसा या जनरेशन गॅपमुळेच उद्भवत असतात. 
 
 
मी म्हणेन, आता माझ्या आधीची पिढी आणि आमच्या पिढीत प्रचंड तफावत आहे. पण, कदाचित असे प्रत्येकच पिढीला वाटत असेल. आधीच्या पिढीचे सिनेमे, कपड्यांच्या पद्धती, सणवार साजरे करण्याच्या पद्धती, सुख-दुःख व्यक्त करण्याच्या पद्धती, देव, श्रद्धा, खाण्या-पिण्याच्या सवयी, संगीत, साहित्य, खेळ, अभ्यास, पर्यटन, गणित सोडविण्याच्या पद्धती... सगळे वेगळेच, पुढच्या पिढीकडे जाईपर्यंत पूर्णपणे बदलून गेलेले असते. जे हा बदल स्वीकारू शकत नाहीत ते स्वतः कायम अडकून बंधनात राहतात आणि पुढे समाजालाही मागे ओढत राहतात.
 
 
प्रत्येकांच्या घरात सात ते साठ दरम्यानच्या प्रत्येक वयोगटातली माणसे राहतात. हे ज्या वेळी लक्षात येते तेव्हा फार गंमत वाटते. मग त्यांच्या बोलण्याकडे, वागण्याकडे आणि अर्थात विचार करण्याच्या पद्धतीकडे थोडे बारकाईने पाहू लागतो. त्यातही मजा अशी असते की, सर्वात लहान पिढीचे वयाने सर्वात मोठ्या असलेल्या पिढीशी जास्त चांगले जमत असते. कारण त्यांच्या विचारांवर आणि कृतींवर या दोन्ही पिढ्या ठामपणे उभ्या असतात. मधल्या सर्व पिढ्या मात्र ना इथले ना तिथले म्हणून कधी आर तर कधी पार असा खेळ खेळत असतात.
 
 
म्हणजेच सर्वात मोठी पिढी असलेली घरातली मोठी माणसे आपणाला जे काही सांगत असतात त्यावर फार मोठा वाद-विवाद न करता मोठ्यांची आज्ञा म्हणून आपण निमूटपणे पळत असतो आणि त्याच वेळी काळासोबत धावताना आणि लहानांच्या पिढीला मागासलेले वाटू नये म्हणून आधुनिकतेची कास धरण्याचीही आपली सतत धडपड सुरू असते. सर्वात लहान असलेली पिढी मात्र आपण हे करणार नाही किंवा हेच करणार, असे ठामपणे सांगून चिघळलेला विषय संपवून मोकळी झालेली असते. मोठेदेखील ती नवीन पिढी आहे, ती अशीच वागणार म्हणून सोडून देत असतात. पण, अनेकदा त्यांच्या आणि लहानांच्या पिढीदरम्यान एक पिढी आहे आणि आपल्या पिढीचीही काही तत्त्वे आणि मर्यादा असू शकतात, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या बोलण्याला किंवा सूचनांना अनुभवाचे पाठबळ आहे, हे त्यांच्याही लक्षात यायला अनेकदा वेळ लागत असतो.
 
 
बर्‍याचदा ते त्यांच्या जागी आणि आपण आपल्या जागी योग्यच असतो. गरज असते ती फक्त दोघांनीही आपापल्या पिढीच्या कुंपणांचे काटेरी वेल अलगद बाजूला ठेवून दुसर्‍याच्या कुंपणात डोकावण्याची. प्रत्येक पिढीचा स्वतःचा संघर्ष असतोच. मग तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो. स्थैर्य आणि अस्तित्वासाठी आपल्या आधीच्या पिढीला म्हणजेच आपल्या आई आणि सासूच्या पिढीला जेवढा संघर्ष करावा लागला तेवढा आपल्याला करावा लागत नाही िंकवा करावा लागणार नाही. कारण ही पिढी त्या काळातली आहे, जेव्हा समाजरचनेत आमूलाग्र बदल घडत होते, औद्योगिक क्रांती होत होती, महागाई वाढत होती.
 
 
पूर्वीच्या वीस-पंचेवीस जणांच्या एकत्र कुटुंबाच्या गोतावळ्यातून बाहेर पडून आपली विभक्त कुटुंबे चालवण्याची पद्धत हळूहळू मान वर ओढत होती. हे सगळे त्या काळी अगदी नवीन असल्यामुळे नवे घर शोधण्यापासून घरच्यांचा रोष पत्करण्यापर्यंत सारेकाही त्यांना सहन करावे लागत होते. पण, तेव्हा जर त्यांनी ते सहन केले नसते तर कदाचित आज आपली पिढी वेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेली असती. विभक्त कुटुंब पद्धतीत वाढ झाल्यामुळे आपल्या पिढीत अधिक मोकळेपणा आलेला पाहायला मिळतो.