वाहतुकीचे नवीन नियम आणि आम्ही...

    दिनांक :20-Sep-2019
डॉ. छाया नाईक
 
नवीन, गुळगुळीत, सिमेंटचे रस्ते, हवेत वेगाने जाणार्‍या दुचाक्या व चार चाक्या हव्यात, परंतु त्या रस्त्यांचा वापर करत असताना आम्ही कोणतेही नियम पाळणार नाही, कायदे पाळणार नाही, असे म्हणणे व वागणे योग्य आहे का? अब्राहम लिंकन यांचे एक वचन प्रसिद्ध आहे. स्वतंत्र राहावे म्हणून आम्ही कायद्याचे गुलाम आहोत. वदतो व्याघाताचे हे उत्तम उदाहरण असले, तरी त्यातील अर्थ लक्षणीय आहे. मला जर स्वातंत्र्य हवे असेल, तर ते सर्वांनाच मिळायला हवे आणि त्यासाठी कायदे पाळायचे ते त्यांचे गुलाम होऊन. गुलामाला स्वतःचे मत नसते. मन मानेल तसे वागण्याचे स्वातंत्र्य नसते. सध्या वाहतुकीचे जे नवीन नियम आले आहेत, मोठ्या प्रमाणात दंडवसुली सुरू झाली आहे आणि त्याविरुद्ध जी ओरड सुरू झाली आहे ती पहिली म्हणजे दुसर्‍यांनाही आपल्यासारखेच हक्क व अधिकार आहेत, हे आम्ही कधी समजून घेणार, असा मला प्रश्न पडतो. समाजासाठी ज्या सुखसोयी निर्माण केलेल्या आहेत, त्यांच्यावर जर सर्वांचा समान हक्क असेल, तर त्यासाठी जे नियम केले आहेत ते सर्वांनी पाळायलाच हवेत. यावर मतभिन्नता कशी असू शकते? 

 
 
सगळ्यांनी सिग्नलचे नियम पाळावेत, मी मात्र सिग्नल तोडून गाडी पळवणार, सगळ्यांनी डावीकडून वाहन चालवावे, मी मात्र घाई आहे म्हणून सिग्नल तोडून उजवीकडून गाडी चालवणार, रार्लीश्ररपी मधील आजारी माणसाचे प्राण जाईनात का मला काय त्याचे, माझे रस्ता न देणे अगदी बरोबर आहे, त्यासाठी दंड आकारणे अगदी चूक आहे, ही मनोवृती सर्वत्र वाढताना दिसत आहे. ज्या पाश्चात्त्य देशांमधून आपण आधुनिक गाड्यांचे तंत्रज्ञान आयात करतो, रस्त्यांच्या बांधणीचे तंत्रज्ञान आणतो, त्यांच्याकडचे वाहतुकीचे नियम व ते तोडल्यावर होणारा दंड पाहिला, तर आपल्याकडे तुलनेने नियम कमी आहेत व दंडाची रक्कम त्यांच्या तुलनेत आपल्याकडे कमीच आहे, हे लक्षात येईल.
 
 
लोकांची हाकाटी काय आहे, तर दंडाची रक्कम खूप जास्त आहे. दंड केव्हा होतो? जेव्हा तुम्ही नियम मोडता तेव्हा! तुम्ही सिग्नल तोडलाच नाही, गाडीची सर्व कागदपत्रे जवळ बाळगली, योग्य जागी गाडी पार्क केली, एकमार्गी वाहतूक असलेल्या रस्त्यावर विरुद्ध बाजूने वाहन चालवले नाही, तर तुम्हाला दंड कशाला होईल? गरीब व्यावसायिकांना दंड परवडणार नाही, तर त्यांनी नियम पाळावेत ना!
 
 
अल्पवयीन मुलांचे अतिरिक्त लाड करणारे पालक जर त्यांच्या हातात आपल्या गाड्या देत असतील, तर अशा आई-वडिलांना जर दंडाबरोबर जेलची हवा खावी लागली, तर त्यात हाकाटी करण्यासारखे खरेच काही आहे का? मुले ऐकत नाहीत ही पालकांची, त्यातही आयांची लाडकी तक्रार असते. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्या गोष्टी आम्ही अभिमानाने सांगतो, तो/ती मुळीच ऐकत नाही हो. वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत लायसेन्स द्यायचे नाही, यामागे काही विचार, काही अनुभव असतील की नाही? लायसेन्स म्हणजे गाडी चालवायचा परवाना, तुम्हाला गाडी चालवता येत असेल तरच दिला जातो. त्यातील भ्रष्टाचार, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीच एकदा उघड केला होता. आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या व्यवस्थेत बदल करायला सुरुवात केली आहे, हे आपण लक्षात घेऊ या. पण, त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे लायसेन्स नसताना गाडी चालवायचे धोके आपण आपल्या मुलांना पटवून देऊ शकत नाही का? मी तर एक पाउल पुढे जाऊन असे म्हणेन की, अशा न ऐकणार्‍या मुलांना काही दिवस बाल सुधारगृहात ठेवा. म्हणजे त्यांना कळेल की नियम पाळणे किती आवश्यक आहे आणि मग ती सरळ मार्गावर येतील.
 
 
हेल्मेटची सक्ती नको, असे म्हणणारा एक फार मोठा वर्ग आहे. जवळ बाळगायला त्रास होतो. माझी एक मैत्रीण म्हणाली, अगं, बाजारात जर मला चार दुकानं हिंडून खरेदी करायची असेल तर हेल्मेट हातात धरून कशी खरेदी करणार? साखळी असलेले एक कुलूप घ्या अन्‌ गाडीला अडकवा.
 
तू म्हणतेस गुळगुळीत रस्ते. आपल्याकडचे रस्ते खड्‌ड्यांनी भरलेले असतात. गाडी तर 20 च्या स्पीडनेच चालवावी लागते. मग काय गरज आहे हेल्मेटची? हे आणखी एक ऑब्जेक्शन.
 
आपला देश बदलतोय. हळूहळू सिमेंटचे रस्ते सगळीकडे तयार होत आहेत. मग अशा वेळी आपण काय हेल्मेट नाही म्हणून 20 च्या स्पीडने जाणार आहोत?
 
जाईल तर आमचा जीव जाईल, तुम्हाला काय त्याचे? असे म्हणणारे अनेक तरुण-तरुणी भेटतात. अशा बेपर्वा लोकांना मला विचारावेसे वाटते की, तुमचा जीव ही तुमची वैयक्तिक संपत्ती आहे असे तुम्ही कसे म्हणू शकता? नागपूरमधील काही घटना, ज्या अनेकांना माहीत आहेत, त्यांचाच उल्लेख करते.
 
माझे काका, विनायक नेउरगावकर सैन्यात होते. 1962, 1967, 1971 या तीनही युद्धांत लढले होते. निवृत्तीनंतर नागपुरात स्थायिक झाले. श्रावणी सोमवारी लेक-जावयाला जेवायला बोलावले होते, त्यांना काही भेटवस्तू आणायला घराबाहेर पडले, नरेंद्रनगरच्या रेल्वे पुलाखाली त्यांना ट्रकने धडक मारली, डोक्यावरून ट्रकचे चाक गेले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी बाब म्हणजे त्यांच्या मृतदेहाला डोके नव्हते. इतका त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. या माणसाने तीन तीन युद्धे आपल्या मातृभूमीसाठी लढली, तेव्हा त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही, त्याला असा मृत्यू यावा?
 
माझी जीवश्च कंठश्च मैत्रीण, माधवी म्हैसाळकर अशाच एका अपघातात मृत्युमुखी पडली. बँक ऑफ महाराष्ट्रमधील अधिकारी, श्री. कोलते, त्यांच्या वाढदिवसादिवशी जरा लवकर घरी यायला निघाले, त्यांनाही ट्रकने धडक दिली आणि त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीची तयारी करणार्‍या त्यांच्या पत्नीच्या नशिबी त्यांचा मृतदेह बघणे आले.
 
नागपूरमधील एका प्रथितयश कवयित्रीचा मुलगा, रस्त्यावरच्या खांबावर डोके आपटून गेला. त्या मातेच्या हृदयाचे आक्रंदन कसे विसरता येईल?
अगदी अलीकडील घटना म्हणजे प्रा. डॉ. बच्चुजी व्यवहारे यांचा अपघात व त्यानंतर त्यांची मृत्यूशी झुंज व त्यात त्यांचा झालेला पराभव. या सर्वांचे कुटुंबीय दुःखाच्या वावटळीत गरगरताना मी पाहिले आहेत. त्यांनी हेल्मेट घातले असते तर...
दरवर्षी डिव्हायडरवर डोके आपटून अनेक जण मृत्युमुखी पडतात. त्यांचा जीव त्यांचाच असतो की त्यांना जीव लावणार्‍या नातेवाईकांचाही त्यावर हक्क असतो? ज्या समाजात ते लहानाचे मोठे झाले, त्याचे काही देणे ते लागतात की नाही? मग केवळ हेल्मेट आवडत नाही, त्याचे ओझे होते, त्याने मान दुखते, अशी कारणे सांगत हेल्मेट न घालणे व त्यांनी सुधारावे म्हणून त्यांना दंड करणार्‍या सरकारवरच ताशेरे ओढणे समर्थनीय ठरते का?
 
आमचे एक स्नेही अनिल ढवळे, कार चालवताना, रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार आपटून, स्टीअरिंग पोटात घुसल्याने मृत्यू पावले. यांनी जर सीट बेल्ट घातला असता तर ते नक्कीच वाचले असते. सगळ्यांच्या अवतीभोवती अशी शेकडो उदाहरणे असतील. पण, मनमानी करायची सवय आपल्या हाडीमांसी इतकी रुजली आहे की, त्यातून बाहेर पडणे भल्याभल्यांना कठीण जाते.
 
मुळात कायदे हे आपल्या सोयीसाठी आहेत, सुरक्षेसाठी आहेत, यावर आमचा विश्वास नाही. एकेकाळी या सविनय कायदेभंगाचा इंग्रजांविरुद्ध हत्यार म्हणून आम्ही उपयोग केला. पण, त्यानंतर कायदे हे मोडण्यासाठीच असतात, अशी आमची धारणा कायम झाली आहे आणि आता तेच हत्यार आमच्यावर भस्मासुरासारखे उलटू पाहात आहे. त्यामुळे आता गरज आहे ती कडक कायद्याचे सुदर्शनचक्र हाती घेतलेल्या मोहिनी रूप विष्णूची नव्हे, ते राबवणार्‍या प्रामाणिक हातांची!
 
भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण या नियमांनी पोलिस खात्याला खाण्यासाठी मोकळे झाले आहे, ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. पण, नियम मोडणारे आपणच आणि लाच देणारेही आपणच. आज रस्तोरस्ती सीसीटीव्ही कॅमेरे लागत आहेत. शिवाय प्रत्येकाजवळ मोबाईलमध्ये कॅमेरा असतोच. आपण सगळे मिळून अशा भ्रष्टाचाराचा सामना करू या.
 
कुठल्याही सवलती न देता हे बदलले नियम राबवण्याबाबत मा. नितीन गडकरी आग्रही दिसत आहेत. त्यांच्यावर दडपण आणणारे अनेक आहेत. त्यांनी या दडपणाला भीक घालू नये, असे मनापासून वाटते. त्यामुळे त्यांना माझ्यासारख्या संवेदनशील नागरिकांचे हेच सांगणे आहे, नितीनजी, आपल्या निर्णयावर ठाम राहा. आमचा तुम्हाला पूर्ण पािंठबा आहे!
 
9890002282