निवडणूक विषयक कामांना प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी मोडक

    दिनांक :20-Sep-2019
विधानसभा निवडणूक नोडल अधिकार्‍यांची सभा
 
वाशीम,
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होवू शकतो. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी त्यादृष्टीने सज्ज रहावे. तसेच विधानसभा निवडणूक विषयक कामांना प्रथम प्राधान्य देवून या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी विहित कालमर्यादेत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सर्व नोडल अधिकार्‍यांच्या आढावा सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, भूसंपादन अधिकारी राजेंद्र जाधव, सुहासिनी गोणेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, अधीक्षक तथा तहसीलदार प्रशांत जाधव, तहसीलदार शीतल वाणी-सोलट, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
 
जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने नुकताच मुंबई येथे विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला असून, कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होवू शकतो. त्यासोबतच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया, निवडणूक खर्च विषयक विविध पथकांची स्थापना, मतदान यंत्र, मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबी तातीडीने पूर्ण कराव्या लागतील. निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर 15 आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार असून त्याबाबत क्षेत्रीय अधिकार्‍यांचे अहवाल प्राप्त करून घेवून आवश्यक कार्यवाही करावी. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी सुरु राहणार असून या काळात जास्तीत जास्त महिला मतदार व नवमतदारांची नोंदणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
 
प्रत्येक दिव्यांग मतदार मतदानाला यावा, यासाठी त्यांना आयोगाने निश्‍चित करून दिलेल्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याकरिता प्रत्येक मतदान केंद्रांवर किती दिव्यांग मतदार आहेत याची माहिती संकलित करून त्यानुसार वाहतूक व इतर नियोजन करावे. मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात येणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेवून त्यांना मतदान यंत्र हाताळणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. जेणेकरून प्रत्यक्ष मात्दानाप्रसंगी कोणतीही समस्या उद्भवणारा नाही. ‘स्वीप’च्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून मतदारांमध्ये जागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी यावेळी दिल्या.
भारत निवडणूक आयोगामार्फत मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिली. त्यानुसार सर्व संबंधित अधिकार्‍यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.