कपड्यांचा पुनर्वापर!

    दिनांक :20-Sep-2019
अवंतिका तामस्कर
 
 
कपाटातील बरेचसे कपडे अनेक वेळा वापरल्यामुळे त्यांचा कंटाळा येतो. पण, तरीही आठवणींमुळे किंवा आवडले म्हणूनही ते टाकले जात नाहीत. ते कपाटातील गाठोड्यामध्ये पडून राहतात; मात्र थोडी कल्पकता दाखवून, कलाकुसर करून अशा कपड्यांना योग्य पुनर्वापर करता येतो. 
 
 
 
हल्लीच्या काळात एका व्यक्तीमागे कपाट भरभरून कपडे असतात. कधी कोणी प्रेमाने घेतलेले, लग्नकार्यात मिळालेले आणि आपणच हौसेने घेतलेले कपडे अशी कपड्यांची भाऊगर्दी असते. त्यामुळे ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ अशी एक म्हण आपल्याकडे सांगितली जाते. ती तंतोतंत लागू पडते. कपाटातील बरेचसे कपडे खूपदा वापरल्यामुळे त्यांचा कंटाळा येतोे. पण, तरीही आठवणींमुळे किंवा आवडले म्हणूनही ते टाकले जात नाहीत. ते गाठोड्यात पडून राहतात, मात्र थोडी कल्पकता दाखवून, कलाकुसर करून अशा कपड्यांचा पुनर्वापर करता येतो.
 
शर्ट किंवा कुर्त्यांपासून बनवा उशीचे कव्हर
वापराविना पडून असलेले शर्ट किंवा कुर्ते उशीच्या आकारात कापा. त्यापासून खोळ बनवता येईल. तसेच उशीच्या आकाराचे काप करून त्यात कापूस भरून नव्या उशाही बनवता येतील. यामध्ये फाटलेल्या पण चांगल्या सुती कपड्यांचे तुकडेही भरता येतात.
 
 
टेबल कव्हर
उत्तम कलाकुसर केलेल्या कपड्यांपासून खुर्च्यासाठी कव्हर तयार केले, तर ते देखणे दिसते. त्याशिवाय लेस किंवा फ्रिल काढून टेबलच्या कव्हरला, पडद्यांना लावता येतात. मुलांच्या कपड्यांवर काही वेळा कार्टूनचे पॅच असतात, तेही टेबल कव्हर किंवा बेडच्या कव्हरला लावून त्यांचा सुंदर पुनर्वापर करता येतो. काही कपड्यांवर देखणी कलाकुसर केलेली असते. काहींना लेस, फ्रिल्स लावलेल्या असतात. हे पुन्हा वापरात आणून छान काही तरी करू शकतो.
 
 
बॅग
जुन्या जिन्स किंवा कार्गो पॅण्ट या खूप दिवस वापरूनही फाटत नाहीत. काही वेळा रंग उतरतो. त्याही न फेकता कपाटाच्या तळाशी ठेवलेल्या असतात. या पॅण्टच्या खिशापर्यंतचा भाग कापून वेगळा करा. वरच्या भागाच्या तळाशी व्यवस्थित टीप मारा. मग या पॅण्टची छोटी शॉर्ट्स होईल किंवा वरच्या भागाला चेन लावून घेतलीत तर चांगली बॅगही होऊ शकते. तशाच प्रकारे जीन्सच्या स्कर्टचीही बॅग तयार करता येईल.
 
 
जुन्या कपड्यांचे अन्य उपयोग पुढीलप्रमाणे आहेत
जुन्या कपड्यांमधील होजिअरीच्या टी-शर्ट्सनी स्वच्छता करता येते. विशेषत: काच साफ करताना मऊ झालेला टी-शर्ट वापरला, तर काचेवर ओरखडे उठत नाहीत. कपड्यांवरील मोठ्या आरेखनापासून फ्रेम बनवता येते. साडीपासून पंजाबी ड्रेस किंवा कुडता किंवा मॅक्सी गाऊनही तयार करू शकतो. प्रिंटेड कपड्यांपासून लॅम्प शेड बनवू शकतो.
 
 
जुन्या कपडयांचे काय करावे? असे कपडे कोणाला आणि कधी द्यावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. फाटके कपडे घातल्याने आजार, दु:ख आणि अनिष्ट परिणाम भोगावे लागतात. अंडरगारमेंट देखील फाटके घालू नये. भोके पडलेले, फाटलेले किंवा उसवलेले अंडरगारमेंट घातल्याने मानसिक आजार, हृदयासंबंधी आजारांना सामोरे जावे लागू शकते. फाटके कपडे घातल्याने ऊर्जा क्षय होते. शुक्रवार किंवा शनिवार या दिवशी असे कपडे घराबाहेर करावे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शनिवारचा दिवस सर्वश्रेष्ठ ठरेल. असे कपडे सन्माननीय किंवा संपन्न व्यक्तीला देऊ नये. जुने कपडे केवळ गरजू व्यक्तीला देणे योग्य ठरेल. घरात स्वच्छतेसाठी जपून ठेवलेले जुने कपडे देखील खूप दिवस एका जागी राखून ठेवू नयेत. त्यांना अधूनमधून बाहेर काढून ऊन दाखवावे. याने नकारात्मकता दूर होते. या व्यतिरिक्त हिवाळ्यातील कपडे, रजई, गाद्या यांना देखील वेळोवेळी ऊन दाखवावे. तसेच निरुपयोगी अंडरगार्मेट्स कुणालाही देऊ नये. असे कपडे एकत्र करून जाळून द्यावे.