या जीवनसत्त्वांचं अतिप्रमाण ठरतं घातक

    दिनांक :20-Sep-2019
 
आरोग्य जपण्यासाठी शरीराला विविध पोषक घटकांची आवश्यकता असते. जीवनसत्त्व हा त्यातला एक महत्त्वाचा घटक. शरीराला विशिष्ट प्रमाणातच जीवनसत्त्वं मिळायला हवीत. काही जीवनसत्त्वांचं अतिरिक्त प्रमाण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. कोणती आहेत ही जीवनसत्त्वं? 
 
  • शरीराला दर रोज 4800 मायक्रोग्रॅम 'अ' जीवनसत्त्वाची गरज असते. याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे बरंच नुकसान होऊ शकतं; डोकेदुखी, केस कोरडे होणं, त्वचेचा जंतूसंसर्ग, हाडांचा अशक्तपणा, भूक न लागणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. हे जीवनसत्त्व शरीराला ठराविक प्रमाणात मिळालं तर डोळे चांगले राहतात तसंच त्वचेचं आरोग्य उत्तम राहतं.
  • दिवसभरात शरीराला 10 मिलिग्रॅम ’ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे हृदयविकार, बद्धकोष्ठता, उलट्या, किडनी निकामी होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 'ड' जीवनसत्त्वामुळे हाडं बळकट होतात तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय स्नायू बळकट व्हायला मदत होते.
  • 'क' जीवनसत्त्वाचं अतिप्रमाण शरीराला घातक ठरू शकतं. दिवसभरात शरीराला 40 मिलीग्रॅम 'क' जीवनसत्त्वाची गरज असते. अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरात बी 12 जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. 'क' जीवनसत्त्वाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. 'क' जीवनसत्त्व मर्यादित प्रमाणात घेतल्यास कॅन्सर, हृदयविकार, अस्थमा, ॲलर्जी, गुडघेदुखीसारख्या विकारांना आळा घालता येतो.