एका बिजापोटी...

    दिनांक :20-Sep-2019
डॉ. वसुधा पांडे
9011412522
 
कुठल्याही चळवळीकरिता किंवा चांगल्या कामाकरिता योजकाची आवश्यकता असते. मग ती सामाजिक, राजकीय, धार्मिक कोणतीही असो. चळवळ उभी करायला कुणाला तरी आवाज उठवावा लागतो. चांगले व हिताचे काम असेल तर जनताही उचलून धरते. आपल्या देशात सुरू असलेली- गोदरीमुक्त गाव असो, स्वच्छता मोहीम असो, पाणी अडवा पाणी जिरवा असो, जागतिक योगदिन असो, जलयुक्त शिवार असो, बेटी बचाव मोहीम असो... जनता योजकाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतेच. सध्या सर्वत्र पर्यावरणरक्षणाकरिता सुरू केलेली वृक्षसंवर्धनाची चळवळ जोमात सुरू आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रत्येक हाकेला देशवासीच काय, परदेशवासीही साद देतात. या सर्व मानव कल्याणकारी चळवळी असून त्यातच मानवाचे भले आहे, हे सर्वांना कळले आहे. स्वत: पंतप्रधानांपासून, आपले मुख्यमंत्री, वनमंत्री मुनगंटीवार, सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणांपासून सामान्य जनतेपर्यंत ही चळवळ रुजली आहे. योजकाचा द्रष्टेपणा महत्त्वाचा आहे. आधी केले मग सांगितले तरच हे सर्वमान्य होते. 

 
 
पर्यावरणरक्षण करणे आजघडीला अत्यावश्यक असे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. त्याशिवाय पुढची पिढी माफ करणार नाही. पर्जन्य भरपूर प्रमाणात पडणार नाही. शेतीपण पिकणार नाही. एवढेच काय, पिण्याला पाणी मिळणार नाही. पाण्यासाठी तिसरे महायुद्धही टाळता येणार नाही. झाडेच नसतील तर नापिकी, अवेळी येऊन नुकसान करणारा पाऊस, जमिनीची प्रचंड धूप होऊन ऋतुचक्राला छेद देणारे वाढते तापमान, अनेक आजार, रोगराई सहन करावी लागणार आहे. पंतप्रधानांचा मंत्र आहे- ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास!’ सर्वांची साथ मिळायला हवी. शासनाबरोबर जनतेचीही साथ आवश्यक आहे. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हा मंत्र ध्यानात ठेवायला हवा. वृक्षारोपण-वृक्षसंवर्धनाशिवाय तरणोपाय नाही. वृक्षवल्ली आपले सगे सोयरे आहेत. त्यांच्याशिवाय सृष्टीला शोभा नाही.
 
 
मागील वर्षीपासूनच वनसंवर्धनाची चळवळ आपल्या देशात जोमाने उभी राहिली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, ज्याला जगण्यासाठी ऑक्सीजन हवा त्याने आपल्यासाठी एक झाड लावावे, असे आवाहन केले होते. वसुंधरेच्या या आराधनेत आणि हिरव्या महोत्सवात आपला सहभाग असायलाच हवा. हरितक्रांतीचा आपला देश सुजलाम्‌ सुफलाम्‌ व्हायलाच हवा. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘जल है तो कल है’ अशी बोधवाक्ये आपण रोज ऐकतो, वाचतो. जलयुक्त शिवाराची कल्पनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. हे घडावे म्हणून एकच उपाय आहे आणि तो म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन! महाराष्ट्रालाही तेहतीस कोटी वृक्षांची लागवड आणि संवर्धन करायचे आहे. ही मोहीम 1 जुलैपासून युद्धस्तरावर सुरू आहे. संपूर्ण राज्यातील वनविभाग, शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिश: आपण सर्व मिळून हे शिवधनुष्य पेलायचे आहे. पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार आपल्या पाठीशी आहेतच. त्याांचा सहभाग असल्यामुळे जनतेलाही उत्साह येणारच. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.’ नाहीतर ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषण!’ असे आपल्या बाबतीत व्हायला नको. आपली भरतभूमी उपजाऊ आहे. पेरले ते उगवणारच. नुसते पेरून होणार नाही, तर त्याचे रक्षणही करयचे आहे. म्हणजे ‘उत्तम बिजापोटी फळे रसाळ गोमटी येणारच!’ सौंदर्यवर्धक उपयुक्त वृक्ष लावायचे आहेत. वृक्ष आपले सगेसोयरे, मित्र आहेत. त्यांना आपल्या भावना कळतात. एका बिजापासून असंख्य वृक्ष, फळे निर्माण होतात. वृक्षिंदडीमुळे या अभियानाचा खूप प्रचार होतो आहे.
 
 
वृक्ष लावणे आणि संवर्धन करणे हा माझा आवडता छंद आहे. बी पेरल्यानंतर त्याच्या अवस्था बघताना होणारा आनंद अवर्णनीयच असतो. सुमारे 25-30 वर्षांपूर्वी मी उन्हाळ्यात आंब्याची एक कोय माझ्या अंगणातील िंभतीजवळ लावली. रोज पाणी घातले. काही दिवसांनी दोन कोवळी लुसलुशीत किरमीजी पाने हात जोडून दुनिया न्याहाळत वर येत होती. माझा आनंद काय वर्णू? अपत्यप्राप्तीचाच आनंद होता तो. पुढे वर्षाऋतूचे पाणी मिळताच ते रोपटे वर वाढू लागले. त्याला आणखी पाने फुटली. ती हिरवीकंच तुकतकीत दिसत होती. आजवर मी घातलेले पाणी दाईचे होते, पण पर्जन्याचे पाणी आईचे होते. भराभरा वर येऊन त्याचा विस्तार वाढत गेला. तो डेरेदार वृक्षात रूपांतरित झाला. सृष्टीचं संदर अपत्य आता वाढत गेलं आणि यथावकाश त्याचे यौवनात पदार्पण झाले. चैत्राचा चित्रासारखा सुरेख महिना सुरू झाला. त्याला लागलेल्या मोहराने माझे मन मोहरून गेले. गुढी, तोरणाकरता त्याची पाने शेजारी घेऊन गेले. मंदिरात, देवघरात पानांचे तोरण तयार झाले. प्रवेशद्वार तोरणाने शोभू लागले. चैत्रात तर त्याला सुंदर बाळकैर्‍या लागल्या. या बाळकैर्‍या पानांच्या अडून भिरभिरत्या नजरेने बघू लागल्या. तसा समीर येऊन त्यांना समजावू लागला, ‘‘थांबा, घाई करू नका. तुम्ही अजून लहान आहात. एखादा व्रात्य मुलगा नेमबाजीने तुम्हाला घायाळ करेल.’’ त्यांना त्याने पानांच्या आड झाकून टाकले. हळूहळू त्या मोठ्या होत गेल्या. त्यांच्या फांद्या अंगाखांद्यावर मुलांना सांभाळणार्‍या लेकुरवाळीसारख्या दिसत होत्या. नम्रपणे वाकल्या होत्या म्हणून ‘वृक्ष फार लवती फळभारे’ असे म्हटले जाते. आपले वैभव त्यांना दानच करायचे असते. किती ही नम्रता!
 
 
आता तर त्याचे विशाल वृक्षात रूपांतर झाले आहे. त्याचा अर्धा भाग शेजार्‍यांच्या अंगणात गेला आहे. त्यांना तो उदारपणे दान करत असतो. हे सर्व बघून मलाही खूप आनंद वाटतो. ‘लाविला आम्रवृक्ष दारी फळे का पडती शेजारी?’ असे कधीच वाटत नाही. थंडीत दडून बसलेले पक्षी त्यावर मस्त विसावतात. वैशाखाच्या भर उन्हातही तो छाया धरून एखाद्या तटस्थ साधूुपुरुषाप्रमाणे उभा असतो. दुपारच्या निवांत वेळी पक्षी मात्र एकमेकांना साद देत असतात. त्यांची बोली कानांना गूढ वाटते. आपल्याला पक्ष्यांंची भाषा कळायला हवी असे वाटते. ‘टोविट प्रिटी, टोविट प्रिटी’- ‘एक मिनिट, एक मिनिट’ असे काही बोलत असतात. खारूताईंची शेपूट उंचावून वरखाली धावपळ सुरू असते. कबुतरे मान डोलावत अंगणात उतरतात. विविधरंगी पक्षी मुक्कामाला येतात. छोटे छोटे पक्षी धीटपणे उडायला लागतात. आता पाडाला आलेले आंबे पोपट-पोपटीणबाईंना अचूक कळतात. कोकीळ पंचम लावून असतो. सारी सृष्टी बहरलेली, जिवंत होऊन जाते. उन्हाची काहिली कमी होते. त्यांना न्याहाळण्याचा मला छंद लागतो. निर्मनुष्य रस्ते आणि विराण दुपार त्यांच्यामुळे सजीव, सुंदर भासते. गोटमार करणार्‍या व्रात्य मुलांनाही तो भेदभाव न करता फळे देत असतो. वाटसरूंची नजर खिळून असते. वार्‍याच्या झोताबरोबर तो सारे दान देऊन मोकळा होत जातो. ‘फळे मुखी सर्वांच्या वृक्ष हळूच देई’ असा तो उदारदिल आम्रवृक्ष माझा आवडता आहे.
 
 
परोपकारातच त्याला धन्यता वाटते. बीज मातीत सडून नष्ट होण्यापेक्षा असंख्य रूपाने पुन्हा जन्म घेण्यातच त्याचे साफल्य आहे. मूळ, खोड, पाने, फुले, साल सारेच उपयुक्त. मानवावर उपकार करणारा तो कोणी वेदान्तीच आहे, असे मनाला वाटते. प्रत्येक मंगलप्रसंगांचा तो साक्षीदार असतो. मग मला आंब्याचे झाड कल्पवृक्षाप्रमाणेच वाटते.
 
 
ज्येष्ठ-आषाढात मृगधारा बरसू लागतात. वारकरी दिंड्या-पताका घेऊन विठू माउलीला भेटायला नाचत, गात, फेर धरत मुक्काम दर मुक्काम भेदभाव विसरून करीत असतात. अशा वातावरणात आम्रवृक्षही रिता होऊ लागतो. वार्‍याच्या झोतात जीर्ण पाने ही नव्यांना जागा करत कुठल्या कुठे उडून गेलेली असतात. आता तो पावसापासून रक्षण करतो. संतासारखे दुःख दूर करणारे वृक्ष हे आपले सगे सोयरेच असतात. म्हणूनच सावता माळ्याला आपल्या मळ्यातच विठ्ठलाचे दर्शन होत होते. ‘कांदा, मुळा, बाजी, अवघी विठाई माझी’ असे वाटते. मला हा वृक्ष विठ्‌ठलासारखाच वाटतो. म्हणूनच ‘वृक्ष माझा लेकुरवाळा संगे आंब्यांचा मेळा’ असे वाटते. त्याचा उदारपणा पाहून माझ्यातले मीपण नाहीसे होते. मी कोय लावली, मी पाणी घातले, हा स्वार्थी विचार नाहीसा होतो. तो उदार, महान तत्त्ववेत्ताच वाटतो. तो मलाही माझ्या गच्चीत आंब्याचे दान करीत असतो. ते दान इतरांना वाटताना, ती गोड-रसाळ फळे देताना धन्यता वाटते. ‘उत्तम बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ हे अगदी खरे आहे.
 
 
हा आम्रवृक्ष आमच्या गृहस्थजीवनाचा, सुखदुःखाचा साक्षीदार आहे. मुले मोठी होत बाहेर भरार्‍या मारताहेत, तो मात्र जीवनाच्या संध्याकाळी साथीला आहे. वृक्षसंवर्धन करून आपण खारीचा वाटा उचलला, याचे समाधान मिळते. पद्मपुराणातील आठव्या खंडात, वृक्षलागवडीमुळे स्वर्गाची प्राप्ती होते, असे म्हटले आहे. पर्यावरणहित व समाजहिताबरोबरच स्वहित होते. आणखी काय हवे माणसाला!